Tarun Bharat

बाद फेरी गाठणारा ब्राझील दुसरा संघ

वृत्तसंस्था/ कतार

कॅसेमिरोने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या बळावर ब्राझीलने कडवा प्रतिकार करणाऱया स्वित्झर्लंडचा 1-0 असा पराभव करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश मिळविला. फ्रान्सनंतर ब्राझील हा बाद फेरी गाठणारा दुसरा संघ बनला आहे.

स्टेडियम 974 वर झालेला गट ग मधील हा सामना संस्मरणीय ठरावा असा झाला नसला तरी स्वित्झर्लंडने ब्राझीलला तब्बल 83 मिनिटे गोलसाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. 83 व्या मिनिटाला कॅसेमिरोने नोंदवलेला गोल मात्र लक्षात राहण्यासारखा होता. व्हिनिसियस ज्युनियरने डाव्या बगलेतून कॅसेमिरोला सुरेख पास पुरविला. त्यावर बॉक्समधून जोरदार फटका मारत चेंडू जाळय़ाच्या टॉप कॉर्नरमध्ये मारला. स्वित्झर्लंडचा गोलरक्षक सोमरला चेंडू अडविण्याची संधीच मिळाली नाही. त्याआधी दोन्ही संघांनी प्रयत्न केले तरी पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला होता.

उत्तरार्धात 64 व्या मिनिटाला व्हिनिसियस ज्युनियरने ब्राझीलचा पहिला गोल नोंदवला होता. पण व्हीएअर चेकिंगमध्ये हा गोल ऑफसाईड असल्याचे दिसल्याने   रेफरीनी तो गोल रद्द केला. दोन्ही संघांना अनेक संधी मिळाल्या. पण अप्रतिम गोलरक्षण व सदोष नेमबाजी यामुळे अखेरच्या टप्प्यापर्यंत दोन्ही संघांना गोल नोंदवता आला नव्हता. ब्राझीलला या सामन्यात 8 तर स्वित्झर्लंडला 3 कॉर्नर्स मिळाले. ब्राझील तीनदा तर स्विस एकदाच ऑफसाईड ठरले. रेड कार्ड मात्र कोणालाही मिळाले नसले तरी दोन्ही संघातील एकेक खेळाडूला पिवळे कार्ड मिळाले. ब्राझीलने 10 व स्विसने 17 वेळा फाऊल केले. बॉल पझेशनच्या बाबतीत ब्राझील (54 टक्के) स्विसपेक्षा (46 टक्के) किंचित सरस ठरले. ब्राझीलने 13 वेळा तर स्विसने 6 वेळा टार्गेटच्या दिशेने फटके मारले होते.

ब्राझीलचे दोन विजयासह 6 गुण झाले असून ते गटात अग्रस्थानी आहेत, स्विस 3 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. या गटातील प्रत्येक संघाचे दोन सामने झाले असून स्विस, सर्बिया, कॅमेरून या तिघांनाही बाद फेरी गाठण्याची संधी आहे. ब्राझीलचा पुढील सामना कॅमेरूनविरुद्ध तर स्विसचा सामना सर्बियाविरुद्ध होणार आहे.

Related Stories

भारत-न्यूझीलंड अखेरची टी-20 आज

Patil_p

शिखर धवनचे मुंबईत आगमन

Amit Kulkarni

फवादचे शतक, पाकिस्तान 88 धावांनी आघाडीवर

Patil_p

आयपीएलच्या उर्वरित स्पर्धेत कमिन्सचे पुनरागमन अशक्य

Patil_p

पाक संघ सेमीफायनल निश्चितीसाठी सज्ज

Patil_p

जगातील सर्वात वयस्कर महिलेची टॉर्च रिलेतून माघार

Patil_p