Tarun Bharat

बाधितांनी ओलांडला दहा लाखाचा टप्पा

देशात दिवसभरात 34 हजार 956 नवे रुग्ण : मृतांचा आकडाही 25 हजारांच्या पार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोना बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने शुक्रवारी देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने दहा लाखांचा टप्पा ओलांडला. शुक्रवारी दिवसभरात विक्रमी 34 हजार 956 नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या 10 लाख 3 हजार 832 इतकी झाली आहे. तसेच मृतांचा आकडाही 687 ने वाढल्याने एकूण मृतांचा आकडाही 25 हजारांच्या पुढे गेला आहे. बाधितांबरोबरच मृतांचा आकडा वाढत असल्यामुळे देशासमोरील चिंता वाढली आहे.

देशात शुक्रवारी महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये बाधित आणि मृतांच्या आकडय़ामध्ये मोठी वाढ नोंदवली गेली. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिवसभरात तब्बल 22 हजार 942 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारत असल्यामुळे आतापर्यंत निगेटिव्ह झालेल्यांचा एकूण आकडा 6 लाख 35 हजार 757 इतका झाला आहे.

रिकव्हरी रेट 63.25 टक्के

गेल्या तीन दिवसांपासून साधारणतः 30 हजारांहून अधिक नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक असल्याने रिकव्हरी रेट 63.25 टक्क्यांवर पोहोचल्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे. देशातील कोरोना रुग्णांमध्ये बहुतांश जण किरकोळ लक्षणे असलेलेच आहेत. त्यामुळे उपचाराअंती करण्यात आलेल्या पुनर्तपासणी अहवालात ते ‘निगेटिव्ह’ ठरत आहेत. मात्र, अन्य गंभीर आजार असलेल्या 0.32 टक्के रुग्णांना सध्या व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. तसेच देशात जवळपास 3 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटकात वेगाने प्रसार

महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये 8 हजार 641 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 84 हजार 281 इतकी झाली आहे. तसेच मृतांमध्ये 266 ने वाढ झाल्यामुळे एकूण मृत्युमुखींचा आकडा 11 हजार 194 इतका झाला आहे. शुक्रवारी तामिळनाडूतही 4,549 तर कर्नाटकात 4,169 नवे रुग्ण आढळले. तामिळनाडूत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 1 लाख 56 हजार 369 इतके झाले आहेत. त्याखालोखाल दिल्ली (1,18,645), कर्नाटक (51,422), गुजरात (45,481), उत्तर प्रदेश (43,441), तेलंगणा (41,018), आंध्रप्रदेश (38,044), पश्चिम बंगाल (36,117) या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

कोरोनाबाधित मृतांचा विचार केल्यास महाराष्ट्र (11,194) आघाडीवर असून दिल्ली (3,545), तामिळनाडू (2,236), गुजरात (2,089) आणि उत्तर प्रदेश (1,046) या राज्यांचा क्रमांक लागतो.

Related Stories

भारत-चीन तणावावर आज कोअर कमांडर स्तरावरील सातवी बैठक

datta jadhav

बंडखोर अदिती सिंह काँग्रेसमधून निलंबित

Patil_p

“पूर्वी संसदेत अभ्यासपूर्ण चर्चा व्हायच्या, सध्याची परिस्थिती वाईट” – सरन्यायाधीश

Archana Banage

आरक्षणवाढीचा अध्यादेश जारी

Patil_p

आता उरल्या केवळ स्मृती…

Amit Kulkarni

छत्रपती संभाजीराजें आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटमुळे नव्या राजकिय चर्चांना उधाण

Abhijeet Khandekar