Tarun Bharat

बारावीची परीक्षा रद्द करु नका

पालकवर्गाची मागणी : विद्यार्थ्यांच्या नुकसानीची भीती

प्रतिनिधी / पणजी

गोवा सरकारने दहावीची परीक्षा रद्द केली असली तरी बारावीची परीक्षा रद्द केली जाऊ नये, अशी मागणी आता पालकवर्गातच वाढू लागली आहे. दरम्यान, गोवा शालान्त मंडळाने सर्व तयारी पूर्ण केली असून सरकारने परवानगी दिल्यास केवळ 8 दिवसात देखील परीक्षा घेता येईल एवढी सज्जता दाखविली आहे.

दहावीची परीक्षा जरी सरकारने रद्द केली तरी भविष्यात त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाते. नववी इयत्तेत विद्यार्थ्यांची कसोटी लागते व अनेक शाळा दहावीचा निकाल 100 टक्के लागावा यासाठी नववीमध्ये चाळण लावतात व हुशार विद्यार्थ्यांना दहावीत पाठविले जाते. गेल्यावर्षी कोविडमुळे इयत्ता नववीची परीक्षा रद्द झाली व जे विद्यार्थी दहावीत गेले तेथेही अंतिम परीक्षा रद्द करण्यात आली व सर्वांनाच उत्तीर्ण करण्यात आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. यानंतर 2021 मध्ये जो कोणी विद्यार्थी दहावीत पास झालेला असेल त्याला सरकारीदरबारी असो वा खासगी क्षेत्रात नोकरीसाठी जाताना ‘कोविड बॅच’चा विद्यार्थी म्हणून त्याकडे पाहिले जाईल.

मंडळाकडून बंधने घालून परीक्षा घेण्याची तयारी

पालकांनी याबाबत चिंता व्यक्त केली व बारावीच्या इयत्तेत देखील परीक्षा रद्द केली तर त्याचे दुरगामी परिणाम होतील, अशी भीती अनेक पालकांनी सरकारकडे व्यक्त केली आहे. केंद्रीय बोर्डाने जरी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या तरी त्यांचा निर्णय कोणत्याही राज्य सरकारांवर सक्तीचा नसतो. राज्यांना स्वतःचा निर्णय घेण्याची मुभा आहे. सध्या राज्यात कोविडचे प्रमाण घटतेय आणि गोवा शालान्त व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने असंख्य बंधने घालून परीक्षा घेण्याची जी तयारी दर्शविली होती त्यामुळे एकेका वर्गात जास्तीत जास्त 12 विद्यार्थ्यांना घेणे, परीक्षा झाल्यानंतर देखील एकेका वर्गातील विद्यार्थ्यांना पाठविताना 5 मिनिटांचा अवधी ठेवणे सरकारने ठरविले तर कमी वेळेत व कमी मार्कांचा पेपर सादर करण्याची तयारी देखील मंडळाने ठेवली आहे.

बारावीच्या परीक्षा घेतल्या नाहीत व विद्यार्थ्यांना पुढे ढकलले तर विद्यार्थीवर्गाचेच नुकसान होईल असे पालकांचे त्याचबरोबर शिक्षकवर्गाचेही म्हणणे आहे. सरकारने गोवा शालान्त मंडळ आणि बारावीच्या मुख्याध्यापकांबरोबर बैठक घेऊन परीक्षा कशा पद्धतीने घेता येतील याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पालकवर्गातून होऊ लागली आहे. परीक्षा होत नाहीत म्हणून विद्यार्थीवर्गाचीही अडचण वाढत आहे.

Related Stories

इंग्लंडात नोकरी देतो सांगून फसवणूक

Amit Kulkarni

वास्कोत पावसापूर्वी डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरवात

Amit Kulkarni

फोंडय़ात डेंग्यूचे 38 सक्रिय रूग्ण; दत्तगड बेतोडा सर्वाधिक रूग्णांसह हॉटस्पॉट

Amit Kulkarni

जल वितरणात दर्जा, मुबलकता, आणावी

Amit Kulkarni

अकरा आमदारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची

Amit Kulkarni

गोव्याच्या निसर्गाकडे खेळू नये

Patil_p