Tarun Bharat

बार्देशात लईराई देवीच्या धोंडचे व्रतास प्रारंभ

Advertisements

प्रतिनिधी /म्हापसा

शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धोंड भक्तगणांच्या सोवळय़ा व्रतास प्रारंभ झाला असून डिचोली तालुक्यातील बहुतेक गावोगावी धोंड भक्तगण कडकपणे व्रत पाळताना दिसून येत आहेत. शिरगावच्या लईराई देवीचा प्रसिद्ध जत्रोत्सव यंदा गुरुवारी दि. 5 रोजी होणार आहे.

कोविड महामारीमुळे गेली दोन वर्षे जत्रोत्सव आणि धोंड भक्तगणांच्या सोवळय़ा व्रतावर निर्बंध आले होते. यंदा जत्रोत्सव परंपरेप्रमाणे उत्साहात साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. त्यामुळे धोंड भक्तगणांनी परंपरेप्रमाणे कडक व्रत पाळण्यास सुरुवात केली आहे. लहान थोरांसह नवीन धोंड भक्तगण व्रत पाळत आहेत. काही ठिकाणी महिला धोंडही आहेत. धोंड भक्तगणांच्या व्रतामुळे गावोगावी मंगलमय वातावरण पसरले आहे. श्री लईराई देवीचे गावोगावी धोंड भक्तगण विखुरलेले आहेत.

गेली 45 वर्षे वठार देवीच्या मंदिरात व्रत करतो- भारती पार्सेकर

दरम्यान यावेळी बोलताना मरड म्हापसा येथील गावच्या नागरिक भारती पार्सेकर म्हणाल्या की, येथे वठारीचे देऊळ आहे. पारंपरिक पद्धतीने गेल्या 40 वर्षाहून अधिक काळापासून येथे धोंड आपले व्रत करतात. काहीजण 3 दिवसांचे व्रत करतात. आम्ही जत्रेदिवशी सकाळी फराळ करून शिरगावला जातो. देवीचे दर्शन घेऊन आम्ही रात्री तेथे राहतो व आंघोळ करून आम्ही अग्नीतून जातो. आमचे वयोवृद्ध 10 जण होते त्यांनी ही प्रथा सुरू केली. आज 40 ते 45 तरुण मुले येथे राहतात. यापूर्वी आरोलकर नामक इसमाचे येथे घर होते तेथे सर्वजण राहत होतो. प्रथम चार पाच जण होते त्याचा आकडा आज पन्नासवर गेला आहे असे त्या म्हणाल्या.

दरवर्षी आम्ही तरुण व्रत करतो- जयेश गडेकर

यावेळी बोलताना काणका डिमेलवाडा येथील धोंड जयेश हरिश्चंद्र गडेकर म्हणाले की, दरवर्षी आपण आपल्या इतर धोंड बंधू समवेत येथे मरड म्हापसा येथे वठारेश्वराच्या देवस्थानात येतो. आम्ही येथे कित्येक वर्षे झाली येथे धोंड म्हणून राहतो. श्री देवी लईराईची दैवीशक्ती अपार आहे. आम्ही दरवर्षी येथे पाच दिवस राहून व्रत करतो. पाचही दिवस ओल्या अंगावर आंघोळ करून पराळ करतात व शिरगाव जत्रेला जातो. देवी दर्शन घेऊन तळीत आंघोळ करून अग्नीत प्रवेश करतो. प्रवेश झाल्यावर समारोह होतो. आम्ही सर्वजण एकत्रित दरवर्षी देवीचा उत्साह साजरा करतो.

Related Stories

मरिना प्रकल्पाची सुनावणी रद्द करा

Patil_p

पंधरा लाखाच्या ड्रग्जसह नायजेरियनास अटक

Omkar B

तीस वर्षांत गोवा गाठणार अक्षय उर्जा प्राप्तीचे ध्येय

Amit Kulkarni

शेतकऱयांनी शेतीकडे उद्योगाच्या दृष्टीने पहावे यासाठी सरकारचे प्रयत्न

Patil_p

पणजीतील सर्वच रस्ते पडले ओस

Amit Kulkarni

पर्यटनाच्या संर्वधनासाठी पर्यटन धोरण तयार करणार

Patil_p
error: Content is protected !!