Tarun Bharat

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडं

पंढरपूर/ प्रतिनिधी

महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी आज पहाटे घातले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे अराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.

विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरु झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि अनुसया बढे (मु. चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली.


मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करुन महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्यावतीने वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.



Related Stories

तृणमूलकडून माजी मंत्री शत्रुघ्न सिन्हा, बाबुल सुप्रियोंना उमेदवारी

Archana Banage

कराडला कोयना पुलालगत होणार दोन नवीन पूल

Patil_p

अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करा- अजित पवार

Abhijeet Khandekar

बीएमटीसी शनिवार-रविवार ४५० ते ५०० बसेस चालविणार

Archana Banage

कनेडी राड्याप्रकरणी 10 जणांना अटक

Anuja Kudatarkar

प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन

datta jadhav