Tarun Bharat

बिजलिमल्ल माजी आमदार संभाजी पवार यांचे सांगलीत निधन

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

प्रतिस्पर्धी मल्लाला कुस्ती सुरू होऊन डोळ्याचे पाते लवते न लवते तोच धोबीपछाड देण्याची खासियत असणारे बिजली मल्ल आणि माजी आमदार संभाजी पवार यांचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले.

गेले काही वर्षे ते पार्किन्सनच्या जुनाट आजाराने त्रस्त होते. गतवर्षी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना करोनाची लागण झाली होती. मात्र त्यावरही त्यांनी हिमतीने मात केली होती. वज्रदेही मल्ल हरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली. मात्र एकाहून एक सरस कुस्त्या क्षणार्धात निकाली लावायच्या त्यांच्या खासियतीमुळे बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध झाले.

महाराष्ट्र कर्नाटक पंजाब हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. याच क्रीडा कामगिरीच्या जोरावर त्यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब आजमावले आणि स्व. वसंतराव दादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णु अण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करून त्यांनी जायंट किलर अशी ख्याती मिळवली. शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभा दणाणून सोडणाऱ्या संभाजी पवार यांना जनता दलाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती.

2009 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. 2014 साली पक्षातील स्थानिक नेत्यांशी झालेल्या मतभेदानंतर ते राजकीय दृष्ट्या बाजूला झाले होते. मात्र तरी सातत्याने विविध प्रश्नांवर ते आपली मते मांडत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे. सर्वसामान्यांचा नेता हरपल्याची हळहळ सांगलीत व्यक्त होत आहे. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

Related Stories

महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’चे 27 नवे रूग्ण; एकूण रूग्णसंख्या 103 वर

Rohan_P

एमपीएससी परिक्षेला अखेर मुहुर्त मिळाला

Patil_p

मोबाईल, टीव्ही, फ्रिजची ऑनलाईन विक्री सोमवारपासून

prashant_c

सांगली : आंदोलनकर्त्या महिलेची प्रसूती, मुलाचे नाव ठेवले..

Abhijeet Shinde

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांना कोरोना, आज बाधितांचा आकडा 188च्या पुढे

Abhijeet Shinde

शरद पवारांचा उपचारांना चांगला प्रतिसाद – नवाब मलिक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!