Tarun Bharat

बिबटय़ाच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

प्रतिनिधी/ उंब्रज

शितळवाडी (चरेगाव, ता. कराड) गावच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांवर बिबटय़ाने हल्ला केल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. संदीप रामचंद्र चिकुडवे राहणार (सोनवडे, ता. पाटण) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तासवडे एमआयडीसीत नाईट शिफ्टला कामासाठी जात असताना बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, बिबटय़ाच्या हल्ल्याने भयभीत झालेल्या दुचाकीस्वाराने उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर कराड येथे उपचार घेतले आहेत.

  दरम्यान, खालकरवाडी येथील दुचाकीस्वार पांडुरंग मारुती खालकर यांच्यावरही बिबटय़ाने हल्ला केल्याची घटना रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने चरेगाव, शितळवाडी परिसरात घबराट निर्माण झाली आहे. बिबटय़ा व त्याच्या दोन बछडय़ांचे दर्शन या परिसरातील नागरिकांना झाले आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी की, सोनवडे येथील संदीप चिकुडवे हे बुधवारी रात्री रात्रपाळीच्या कामानिमित्त तासवडे येथील एमआयडीसीकडे निघाले होते. त्यांच्यासोबत इतर दुचाकीवरुन अन्य तिघे निघाले होते. रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास शितळवाडी गावच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीवर अचानक बिबटय़ाने हल्ला केला. बिबटय़ाने दुचाकीवर झेप टाकली. मात्र दुचाकी वेगात असल्याने संदीप चिकुडवे यांच्या पायाला बिबटय़ाचा पंजा लागून जखम झाली आहे. अचानक झालेल्या हल्ल्याने संदीप हे गांगरून गेले. त्यांना नेमके काय झाले हे लक्षात आले नाही. मात्र त्यानंतर त्यांना व त्यांच्या मित्रांना बिबटय़ा व त्यांच्या तीन बछडय़ांचे दर्शन झाले. जखमी अवस्थेत संदीप चिकुडवे यांनी उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर कराड येथे जाऊन उपचार घेतले.

  दरम्यान, शितळवाडी, चरेगाव, खालकरवाडी याठिकाणी बिबटय़ाचे अनेक दिवसांपासून वास्तव्य आहे.  रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास पांडुरंग मारुती खालकर (रा. खालकरवाडी) यांच्यावरही दुचाकीवरुन जात असताना बिबटय़ाने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनांमुळे या परिसरात बिबटय़ाची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वराडे येथील वनरक्षक दीपाली अवघडे यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.

Related Stories

महागाईचा भडका : जीवनावश्यक वस्तु ही महागल्या

Abhijeet Khandekar

विजेचा धक्का बसून शाळकरी मुलगा ठार

Archana Banage

शरद पवार हे अर्धसत्य सांगत आहेत-देवेंद्र फडणवीस

Archana Banage

शिवसेना सर्टिफाईड गुंड असल्याच्या राऊंतांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

Archana Banage

तामजाईनगर येथे भारतीय बैल बेडकाचे दर्शन

Patil_p

चीन, जपानसह 5 देशांतून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य

datta jadhav