Tarun Bharat

बिबटय़ाच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

आईच्या बोटाला धरुन चाललेल्या बालकावर हल्ला, येणके येथील हृदयद्रावक घटना

वार्ताहर/ कराड, कोयना वसाहत

येणके (ता. कराड) येथे ऊसतोड मजूर महिलेच्या बोटाला धरून चाललेल्या चार वर्षीय बालकावर बिबटय़ाने हल्ला करीत बालकाला सुमारे दीडशे मीटर उसाच्या शेतात फरफट नेले. यात बालकाचा जागेवरच मृत्यू झाला. आकाश दिगाश भिल (वय 4, रा. कात्रा, ता. घडगाव, जि. नंदुरबार) असे मृत बालकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भयानक घटनेने येणकेसह परिसर हादरून गेला आहे. वारंवार मागणी करूनही वन विभाग बिबटय़ांचा बंदोबस्त करीत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रारंभी आकाशचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. दरम्यान, पोलीस व वन विभागाने बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याचे मान्य केल्यानंतर उपजिल्हा रूग्णालय कराड येथे शवविच्छेदन करून येणके येथे वन विभागाच्या हद्दीत आकाशच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्हय़ातील मजुरांची टोळी ऊसतोड करण्यासाठी येणके येथे आली आहे. याच टोळीतून दिनाश गेदा भिल हे पत्नी चिण्या भिल, मुलगा आकाश व आणखी एका दीड वर्षाच्या मुलासमवेत ऊसतोड मजुरीसाठी येणके येथे आले आहेत. येथील बसस्थानकाशेजारी असलेल्या शेतात झोपडी घालून हे सर्व मजूर राहत आहेत. सोमवारी सकाळी येणके-किरपे रस्त्यालगत असलेल्या इनाम नावाच्या शिवारात सर्व मजूर नेहमीप्रमाणे ऊस तोडणीसाठी गेले होते.

    आकाशची आई चिण्या भिल या सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जेवण घेऊन ऊसतोड सुरू असलेल्या फडाकडे चालल्या होत्या. यावेळी त्यांच्या डोक्यावर जेवण ठेवलेली पाटी, काखेत दीड वर्षांचा मुलगा होता. आकाश आईचे बोट धरून सोबत चालला होता. यावेळी अचानक शेजारी असलेल्या उसाच्या शेतातून आलेल्या बिबटय़ाने आकाशवर हल्ला केला. बिबटय़ाने आकाशची मान जबडय़ात धरून आकाशला उसाच्या शेतात फरफटत नेले. त्याच्या आईने आरडाओरडा करीत बिबटय़ाचा पाठलाग केला. आराडाओरडा ऐकून रस्त्यावरून निघालेले लोक व मजूर धावत आले. आई आरडाओरडा करीत पाठलाग करीत असतानाही बिबटय़ाने आकाशला जवळपास दीडशे मीटर उसाच्या शेतात फरफटत नेले.

   नागरिकांनी उसाच्या शेतात शोध घेतला असता रक्त सांडलेले दिसले. तर फरफटत नेताना आकाशची पॅण्ट निघून पडली होती. त्यापासून अंदाजे 20 फूट अंतरावर आकाशचा रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याच्या मानेवर खोल जखमा झाल्या होत्या. लोकांचा आरडाओरडा ऐकून बिबटय़ाने रस्त्यापासून सुमारे दीडशे मीटर लांब उसाच्या शेतात आकाशचा मृतदेह सोडून पळ काढला. मृतदेह पाहिल्यानंतर आकाशच्या आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे येणके व परिसर हादरून गेला. मोठय़ा संख्येने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बिबटय़ाचा शोधही घेण्यात आला.

           वन विभागाविरोधात संताप

 घटनेची माहिती मिळताच कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले सहकारी कर्मचाऱयांसोबत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱयांना सामना करावा लागला. येणके, किरपे, तांबवे, पोतले, येरवळे या परिसरात अनेक दिवसांपासून बिबटय़ाचा वावर आहे. जनावरे व लोकांवर वारंवार बिबटय़ाकडून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्री अपरात्री शेतील पाणी देण्यासाठी जाणाऱया शेतकऱयांना बिबटय़ाचे दर्शन होत आहे. तर मॉर्निंग वॉकला जाणाऱया लोकांनाही बिबटय़ा दिसत असल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी वन विभागाला वारंवार बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वन विभागाने मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी प्रारंभी बिबटय़ाचा बंदोबस्त करा त्याशिवाय आकाशचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी घटनस्थळी भेट देऊन बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन देऊन ग्रामस्थांना समजावले. यावेळी तहसीलदार विजय पवार, सरपंच निकाहत मोमीन, पोलीस पाटील, प्रदीप गरूड, मंडल अधिकारी दत्तात्रय दीक्षित, तलाठी अन्सार सुतार उपस्थित होते. यानंतर कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून येणके येथे वनविभागाच्या हद्दीत आकाशच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    बिबटय़ाला पकडण्यासाठी दोन सापळे

उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, सातारचे फिरते पथक प्रमुख वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाने बिबटय़ाच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. सोमवारीच घटनास्थळ परिसरात दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. तर पुणे येथून खास रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. तर वनविभाग, पोलीस व ग्रामस्थांच्या माध्यमातुन एक शोध पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकाच्या माध्यमातूनही बिबटय़ाचा शोध घेण्यात येणार आहे.  

 पाच लाखांची अतितातडीची मदत आज मिळणार

बिबटय़ाच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना वनविभागाच्या माध्यमातून पंधरा लाख रूपयांची मदत देण्यात येते. त्यातील पाच लाख रूपये अतितातडीची मदत देण्यात येते. आकाशच्या कुटुंबीयांना आज मंगळवारी अतिताडीची पाच लाख रूपयांची मदत आज मंगळवारी वितरित होईल. तर उर्वरित मदत टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

Related Stories

अमित भोसलेच्या मारेकऱ्यांना 10 पर्यंत पोलीस कोठडी

Patil_p

बीडीडी चाळीत पोलिसांना मिळणार हक्काचं घर; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

Archana Banage

सातारा : देऊर येथून 27 तोळे सोने चोरीला

datta jadhav

‘या’ योजनेतून होणार मोफत उपचार; शुल्क आकारल्यास 5 पट दंड : राजेश टोपे

Tousif Mujawar

भावना गवळींना पुन्हा ईडीचं समन्स; गैरहजर राहिल्यास अजामीनपात्र वॉरंटची शक्यता

datta jadhav

निगवे दुमालातील सलून दुकानदार पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने खळबळ

Archana Banage