ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेत, बिहार सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊनचा अवधी वाढविला आहे. त्यामुळे आता राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतः ट्विट करत माहिती याबाबत माहिती दिली.


मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत 5 मे पासून पुढील तीन आठवड्यांसाठी लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यानंतर सहयोगी मंत्रीगण आणि पदाधिकाऱ्यांशी आज (24 मे) चर्चा केल्यानंतर बिहारमधील लॉकडाऊन 1 जून पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
- लॉकडाऊनचा सकारात्मक प्रभाव
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लॉकडाऊनचा सकारात्मक प्रभाव दिसून येत असून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे बिहारमध्ये आता 1 जून पर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
- 4 हजार नवीन कोरोना रुग्ण
राज्यात लॉकडाऊन जारी केल्यानंतर रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. प्रदेशात पहिल्यांदा प्रत्येक दिवशी 15 हजारच्या आसपास रुग्ण आढळून येत होते ती संख्या आता 5 हजारांपेक्षा कमी झाली आहे. मागील 24 तासात प्रदेशात 4,002 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 6,89,576 वर पोहचली असून त्यातील 6,44,335 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.44 टक्के इतके आहे.