नीना चषक 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा


क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
नीना स्पोर्ट्स क्लब आयोजित 13 वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी बीएससी, सीसीआय, विजया व बेळगाव कोल्ट संघानी विजयी सलामी दिली. केदारलिंग संभाजीचे, शुभम खोत, अनिश तेंडुलकर, ओंकार चौगुले यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर नीना र्स्पोट्स आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जावेद फनिबंद, महंमद ताहिर सराफ, आनंद करडी, मिलिंद चव्हाण, प्रमोद पालेकर, माजीद मकानदार, आरिफ बाळेकुंद्री, प्रशांत लायंदर, देवेंद्र कुडची, झेवियर गोम्स, सचिन साळुखे व महांतेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एसकेई संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 9 बाद 73 धावा केल्या. त्यात हर्षने 19 तर श्रेयसने 17 धावा केल्या. बीएससी तर्फे सुमरेंद्र पाटीलने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल बीएससी संघाने 14.3 षटकात 1 बाद 74 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. सुमित भोसलेने 24 तर आरूष पुत्रनने 21 धावा केल्या.
दुसऱया सामन्यात सीसीआय संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 5 बाद 138 धावा केल्या. त्यात शुभम खोतने 6 चौकारासह 72, समर्थ पाथरूटने 24 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीचा डाव 22 षटकात सर्वबाद 108 धावात आटोपला. सुप्रित गेंजीने नाबाद 52 धावा केल्या. सीसीआय तर्फे कलश बेनकट्टीने 4 गडी बाद केले.
तिसऱया सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाने प्रथम फलंदाजी करताना 18 षटकात सर्वबाद 52 धावा केल्या. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. बेळगाव कोल्टतर्फे अनिष तेंडुलकरने 4, श्रेया पोटेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल बेळगाव कोल्ट संघाने 15 षटकात 4 गडी बाद 53 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला.
चौथ्या सामन्यात विजया क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 बाद 199 धावा केल्या. त्यात गौरव पाटीलने 5 चौकारासह 54, नवीन बेकवाडकरने 2 चौकारासह 27, ओंकार चौगुलेने 25 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नीना स्पोर्ट्स संघने 25 षटकात 9 बाद 61 धावाच केल्या. त्यात झोया काझीने 25 तर सवज्ञ पाटीलने 18 धावा केल्या. ओंकार चौगुलेने 4 गडी बाद केले.