यांना कोरोना झाल्यास जबाबदार कोण ?
प्रतिनिधी / सातारा
कोरोना महामारीच्या संकटाचे गांर्भीर्य ओळखा. घरात रहा, लहान मुले, जेष्ठांची काळजी घ्या असे उपदेशाचे डोस सरकार आणि प्रशासन सर्वांना देत आहे. मात्र दुसऱ्याला उपदेशाचे डोस देणाऱ्या सरकारने स्वतःच्या विभागात तेही अग्रभागी असणाऱ्या आशा स्वयंमसेविका पिळवणूक केली आहे. 60, 62 वय वर्ष असणाऱ्या आशा, गटप्रवर्तकांना कोरोनाच्या सर्व्हेत सहभागी केले आहे. या सेविकांना बीपी, शुगरचा त्रास आहे. त्यांना या सर्व्हेतून वगळण्याची मागणी संघटनांच्यावतीने करण्यात आली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मार्च महिन्यात भर उन्हात ते आता सुरू असलेल्या पावसाळयात जीव धोक्यात घालून गावामध्ये जाऊन माहिती गोळा करण्याचे काम आशा स्वयंमसेविका करत आहेत. यामध्ये 60, 62 वय वर्ष असणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांचा समावेश करण्यात आला आहे. जिह्यात 2 हजार 500 आशा व 130 गटप्रवर्तक आहेत. यातील 10 ते 15 टक्के आशा या 60 वय वर्ष पुढील आहेत. त्यांना बीपी, शुगरचा त्रास गेली अनेक वर्षापासून आहे. कोरोनाचा संसर्ग जेष्ठ मंडळीना लवकर होत असून यामध्ये त्यांचा जीव जाण्याचे प्रमाण जात आहे. असे असताना घरोघरी जावून सर्व्हे करणाऱ्या या जेष्ठ आशाच्या आरोग्याकडे सरकार व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. 50 वय वर्ष असणारे पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या कामातून वगळयात आले आहे. मग आशा व गटप्रवर्तकांचा विचार का करण्यात येत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्व्हे दरम्यान, त्यांना माहिती देण्यास वारंवार टाळटाळ करण्यात येते. लोकांचा प्रतिसाद मिळत नसतानाही आशा सर्व्हे करत आहेत. आशा आणि गटप्रर्वतकांना मास्क, हॅडग्लोज, सॅनिटायझर, त्याशिवाय कोरोनाग्रस्त भागातील आशांना योग्य आणि पुरेशा प्रमाणात पीपीई किट उपलब्ध करून देणे. राखीव दर आशा व कुटुंबाना देण्याची मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

