Tarun Bharat

बीस साल बाद..! माय-लेकरांची भेट!!

Advertisements

चित्रपटात शोभावी, अशीच घटना : मुंबईतून बेपत्ता झाली होती महिला : मुले होती खूपच लहान : तेव्हापासून सुरू होता शोध

संग्राम कासले / मालवण:

हिंदी चित्रपटामध्ये ‘बिछडे हुए माँ-बेटे’ यांची अनेक वर्षांनी भेट झाल्याचा प्रसंग आपण अनेकवेळा पाहिला असेल. परंतु चित्रपटात घडावा, असा प्रसंग वास्तवातही घडला आहे. वीस वर्षांपूर्वी मुंबई येथून एक महिला बेपत्ता झाली होती. त्यावेळी तिचा मोठा मुलगा केवळ 13 वर्षांचा होता व अन्य दोन मुले त्यावेळी खूपच लहान होती. तेव्हापासून ही तिन्ही मुले आईचा शोध घेत होती. मात्र, तिचा शोध लागायला तब्बल वीस वर्षे लागली. तेही सोशल मीडियावरील पोस्टमुळे.  

मूळ बुलढाणा येथील व मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या द्वारकामाई डोले (60, पूर्वाश्रमीच्या सुमती वाघ) या 2001 पासून काही कौटुंबिक कारणामुळे मुंबई येथील घरातून निघून गेल्या होत्या. त्या तब्बल वीस वर्षे चौके (ता. मालवण) व जिल्हय़ात वास्तव्यास होत्या. माजी सभापती मनीषा वराडकर, डॉ. शरद काळसेकर, एसटीचे वाहक सोपान घुगे, बुलढाणा येथील सरपंच भगवान पालवे यांच्या मदतीने तब्बल वीस वर्षांनी कृष्णा व शिवशंकर डोले हे आपली आई द्वारकामाई यांना घेऊन बुलढाणा येथे रवाना झाले.

मूळ बुलढाणा येथील द्वारकामाई डोले या 2001 पासून मुंबई येथून बेपत्ता झाल्या होत्या. त्यावेळेस त्यांची मुले कृष्णा, शिवशंकर, गीता ही लहान होती. 2001 ते 2005 या कालावधीत त्यांच्या मुलांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याची खबर स्थानिक पोलीस ठाण्यातही दिली. परंतु शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे मुले व नातेवाईकांनी डोले यांची शोधमोहीम थांबविली होती.

द्वारकामाई डोले 2005 पासून मालवणात

द्वारकामाई 2005 पासून चौके येथे व्यास्तव्यास आहेत. तेव्हापासून 2021 पर्यंत त्यांनी विविध ठिकाणी मोलमजुरीचे काम केले. मंदिर किंवा कोणाच्या घराच्या आश्रयाला राहून जे मिळेल ते खाऊन त्या दिवस कंठत होत्या. या काळात माजी सभापती मनीषा वराडकर यांनी त्यांना आधार दिला. डोले जेव्हा अडचणीत सापडायच्या, त्यावेळेस त्या वराडकर यांच्याकडे धाव घ्यायच्या. वराडकर या डोले यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. डोले यांच्या आजारपणात प्रणाली गावडे यांनी त्यांना आर्थिक मदत केली.

असा लागला डोलेंच्या मुलांचा शोध

द्वारकामाई आपले नाव सुमती वाघ मु. पो. चिंचुली, आडगावराजा ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा असं सांगायच्या. परंतु इतर फारशी माहिती सांगत नव्हत्या. मनीषा वराडकर व त्यांची मुलगी यांनी ही सर्व माहिती लिहून ठेवली होती. परंतु अनेकवेळा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांनी द्वारकामाईंची माहिती डॉ. शरद काळसेकर यांना दिली. 

सोशल मीडियाद्वारे झाली माय-लेकरांची भेट

चौके येथील डॉ. शरद काळसेकर हे राज्य पातळीवरील डॉक्टरांच्या ग्रुपमध्ये सहभागी आहेत. त्यांनी द्वारकामाई यांचे छायाचित्र व त्यांची माहिती असणारी पोस्ट डॉक्टरांच्या ग्रुपवर टाकली. नंतर जालना व परभणी येथील डॉक्टरांच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोस्टच्या माध्यमातून डोले यांच्या मुलांचा शोध लागला. त्यांचे मुलगे कृष्णा व शिवशंकर यांनी बुलढाणा येथील सरपंच पालवे यांच्या माध्यमातून डॉ. काळसेकर, माजी सभापती वराडकर, एसटीचे वाहक सोपान घुगे यांच्याशी संपर्क साधून बुधवारी चौके गाव गाठले.

आईच्या भेटीने मुलांचे डोळे पाणावले

चौके येथे आल्यावर कृष्णा व शिवशंकर यांनी प्रथम मनीषा वराडकर, डॉ. काळसेकर, वाहक घुगे यांची भेट घेतली. त्यांना आईशी संबंधित सर्व कागदपत्रे दाखविली. त्यानंतर आई द्वारकामाई यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही मुलांच्या डोळय़ात आनंदाश्रू तरळले होते. या घटनेची माहिती देण्यासाठी सर्वजण मालवण पोलीस ठाण्यात गेले. रात्री उशिरापर्यंत पोलीस कार्यवाहीनंतर कृष्णा व शिवशंकर हे आई द्वारकामाई यांना घेऊन बुलढाणा येथे रवाना झाले.

Related Stories

बैलगाडी शर्यतीतल्या सहभागी स्पर्धकांवर होणार कारवाई

Patil_p

रोटरी स्कूल कोकणात असल्याचा सार्थ अभिमान

Patil_p

‘आयसोलेशन’मध्ये आणखी पाच रुग्ण

NIKHIL_N

वीरजवळ मोटारसायकल अपघातात एकजण ठार, एक जखमी

Patil_p

हर्षदा कोंडयेला पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक

Anuja Kudatarkar

आडवली रवळनाथ मंदिराच्या फंडपेटीतील रक्कम अज्ञाताकडून लंपास

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!