Tarun Bharat

बी फॉर बारामती

महाराष्ट्रातील राजकारण्यांनी हिन राजकारणाचा तळ गाठला की नाही याची कल्पना नाही पण या हिनतेचा तळठाव रोज उकरला जातोय. मंडळी आता मुद्यावरुन गुद्यावर येऊ लागली आहेत. राजकीय राडे नित्याची बाब झाली आहे. नेत्यांच्या तोंडात संस्कृती, संस्कार अशी भाषा आहे. पण प्रत्यक्षात जातीयवाद, मतपेटी, कुरघोडय़ा यांचे विषारी फुत्कार टाकले जात आहेत. देशातले सर्वात प्रगत, पुरोगामी व समृद्ध वारसा असलेले महाराष्ट्र राज्य राजकीय स्वार्थासाठी नासवले जाते आहे. सुडाचे, दांडगाव्याचे, द्वेषाचे आणि हिशोबाचे डाव रचले जात आहेत. सर्व सामान्य जनता मूकपणे हे सारे पाहत आहे आणि ही जनता योग्य वेळेची वाट पहात आहे. पण या दरम्यान अनेकांनी आपली घरे भरली आहेत आणि अनेक मंडळी एकमेकांना आव्हान देत हिणकस राजकारण रेटत आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री व भाजपच्या फायर ब्रॅन्ड नेत्या स्मृती इराणी यांनी ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती असे म्हणत भाजपाचे आगामी लक्ष व लढाई अधोरेखित केली आहे. महाराष्ट्राला खूप मोठी व सुसंस्कृत अशी राजकीय व सामाजिक परंपरा आहे. निवडणुकीच्या राजकारणात मतपेटय़ा तयार करण्यासाठी जाती, धर्माची सोपी वाट तुडवली जाते आहे आणि पैशाचा वापर सुरु झाला. पैसा पेरा, पैसा उपसा हा धंदा सुरु झाला. जास्त लोकसंख्या व मतदान असलेल्या जाती, धर्माचा अनुनय करा, त्यांचे लांगुलचालन करा आणि अल्पसंख्या असणाऱयांना टार्गेट करुन राजकीय गणिते जमवा असा सोपा मार्ग विविध राजकीय पक्षांनी अवलंबिला आहे. मुखी भाषा समतेची नावे महापुरुषाची, समाज सुधारकांची पण वृत्ती हिन याचे परिणाम आज राज्यात दिसत आहेत. राज्यात जनतेने भाजपा-शिवसेना युतीला कौल दिला होता. पण निवडणुकीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी शिवसेनेला भाजपापासून दूर करुन महाआघाडीचा प्रयोग केला. त्याला आता अडीच वर्षे झाली. तोंडावर मुंबईसह औरंगाबाद व अन्य महापालिका निवडणुका, राज्यसभेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि मुंबई महापालिका कोण जिंकतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबईचा बाप कोण? यावरुन हमरीतुमरी सुरु आहे. भाजपाने महाआघाडीची अनेक प्रकरणे समोर आणत हे महावसुली सरकार अशी टिका चालवली आहे. महाआघाडीचे दोन मंत्री तुरुंगात गेले. एक मंत्री तुरुंगातून आपले खाते चालवत आहे. वाझे असो भोंगा असो हनुमान चालीसा असो अथवा चितळे प्रकरण, राणा प्रकरण राज्यात गंमती-जमती सुरु आहेत. आरोपांच्या रोज फैरी झडत आहेत. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत रोज न्याहरी करुन भाजपावर, सोमय्यावर, राणा दाम्पत्यावर राड उडवत आहेत तर किरीट सोमय्या, राणा दांम्पत्य हेही त्याची परतफेड करत आहेत. राज्यातील प्रमुख नेत्यांना या चिखलफेकीला आवरायला सवड उरलेली नाही. आणि त्याचा परिणाम आता ही धग शरद पवारांच्यापर्यंत पोहोचली आहे. टिका करताना कोणाची आई, कोणाची बायको याचेही भान बाळगले जात नाही. केतकी चितळेची पोस्ट सर्वत्र टिकेचा विषय बनली. तिला अटक झाली. त्यानंतर पोलीस स्थानकात तिच्यावर शाई फेकण्याचा प्रकार झाला, विविध नेत्यांना सोशल मिडियावर ट्रोल करण्याची भाषा, प्रवक्त्यांची शिवराळ भाषा हा सगळा महाराष्ट्राला, राजकारणाला, राज्याच्या हिताला न शोभणारा प्रकार होता व आहे. स्व. यशवंतराव चव्हाण म्हणायचे लहान माणसांच्या खूप उंच, लांब सावल्या पडायला लागल्या की ओळखायचे दिवस मावळायची वेग जवळ आली. आज अगदी तीच स्थिती आहे. त्यामुळेच पातळी सोडून अनेक व्यवहार होत आहेत आणि जनसामान्यांना वाऱयावर सोडून घरे भरायचा उद्योग सुरु आहे. पुण्यात बालगंधर्व रंग मंदिरात भाजपाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याहस्ते ‘अमित शाह भाजपाची वाटचाल’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम योजला होता. अलीकडे राजकीय पक्षाचे जणु मुद्दे संपले आहेत. त्यामुळे थेट मंडळी गुद्यावर येतात. नाटय़गृहात राष्ट्रवादीच्या काही महिला घुसल्या. निवेदन देणार अशी भाषा होती. पण तेथे राडा झाला. या महिलांना धक्काबुक्की झाली. पोलिसांनी भाजपाच्या तीन कार्यकर्त्याविरोधी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्याआधी भाजपच्या पुण्यातील एक पदाधिकाऱयाला त्यांच्या कार्यालयात घुसून कानशिलात मारण्यात आली होती. राजकीय मंडळी अशी हमरीतुमरीवर येऊ लागली तर पोलिसांची पंचायत होते. राजकीय राडे आता नित्याचे होऊ लागले आहेत. त्यातच आता राज्यसभेच्या निवडणुकीची जुळणी सुरु झाली आहे. कोल्हापूरचे श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांनी आपण राज्यसभेसाठी अपक्ष उभारणार अशी घोषणा केली आहे व त्यांना शरद पवारांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा दिला आहे. काँग्रेस सध्या ऍक्शनमोडमध्ये आहे. एक घराणे, एक तिकीट वगैरे निर्णय झाले आहेत. नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर टीका चालू केली आहे. मुंबईची प्रभाग रचना आणि राष्ट्रवादीचा खंजीर यामुळे काँग्रेस अस्वस्थ आहे. राज ठाकरे आता पुण्यात सभा घेणार आहेत. हिंदु जननायकवरुन मनसे व शिवसेना यांच्यात चढाओढ सुरु झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी पुन्हा महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार, स्त्रियांचा सन्मान याची उजळणी करत महिलांच्यावर हात उचलाल तर हात तोडून हातात देऊ अशी आक्रमक भाषाही उच्चारली आहे. तर विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाभारतातील ‘तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म’ या धरतीवर सुप्रिया सुळेंना केवळ सोयीचे बोलू नका, असे सुनावले आहे. एकूणच राज्यात रोज चिखलफेक सुरु आहे आणि स्मृती इराणी यांनी ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती असे म्हणत जणू बारामतीतून आपण लोकसभा लढवणार असे सुचित केले आहे. सुषमा स्वराज असोत किंवा स्मृती इराणी असोत फायर ब्रॅन्ड नेत्या मानल्या जातात. मोहीम फत्ते करण्यात निदान जायंट नेत्याला बांधून ठेवण्यात त्यांचा हातखंडा आहे. बारामती हा पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला आहे. पण घराणेशाही संपावयाची आणि एक घराण्याचे पक्ष घरात बसवायचे हा भाजपचा नारा आहे.

Related Stories

अन्नदाता सुखी भव।

Patil_p

तूं भुललीसी तयांच्या वचनें

Patil_p

कोशिश करनेवालों की…!

Patil_p

निरभिमानी भक्त, नित्यमुक्त असतो

Patil_p

फडणवीसांचा गौप्यस्फोट !

Patil_p

देशभक्ती आणि अर्थव्यवस्था

Patil_p