Tarun Bharat

बुडा बैठक गैरहजर प्रकरणी सर्वपक्षीय मोर्चा

कोरमअभावी प्रत्येकवेळी बैठक रद्द : विकासकामे ठप्प : 22 रोजी भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय

प्रतिनिधी /बेळगाव

विविध विकासकामे आणि कणबर्गी योजनेच्या अंमलबजावणीसाठी बुडाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र प्रत्येकवेळी बुडाची बैठक कोरमअभावी रद्द झाली असून विकासकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे बुडाच्या बैठकीला गैरहजर राहणाऱया आमदार आणि सदस्यांच्या विरोधात शुक्रवार दि. 22 रोजी भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत सोमवारी घेण्यात आला.

बुडा बैठकीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी मारुती गल्ली येथील मारुती मंदिरात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध पक्षांच्या नेतेमंडळांनी सहभाग घेतला होता. बुडाच्या अर्थसंकल्पाला मार्च महिन्यात मंजुरी देणे आवश्यक होते. पण नोव्हेंबर महिन्यापासून आयोजित करण्यात आलेल्या बैठकांना भाजपचे आमदार आणि सरकारनियुक्त सदस्य गैरहजर रहात आहेत. यापूर्वी अनेकवेळा नोटीस बजावूनही बैठकीला हजर राहिले नाहीत. परिणामी कोरमअभावी बैठक रद्द करण्यात आली होती.

बुडाच्यावतीने कणबर्गी योजना क्रमांक 61 राबविण्यात येत आहे. तसेच विविध रहिवासी योजना राबविण्यात येत असून विकासकामे राबविण्याचे प्रस्ताव आहेत. पण बुडाच्या बैठकीत मंजुरी घेणे बंधनकारक आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडीयम आणि शहरातील विकासाला प्राधान्य देणारे प्रस्ताव रखडले आहेत. बैठक होत नसल्याने सर्व प्रस्ताव रखडल्याचे चर्चेवेळी निदर्शनास आले. विकासकामे राबविण्यास अडथळा निर्माण करणाऱया बुडा सदस्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. सोमवार दि. 25 रोजी बुडाची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे बैठकीपूर्वी प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी 22 रोजी सकाळी 10.30 वा.मोर्चा काढण्यात येणार आहे.

बैठकीला काँग्रेस नेते आर. पी. पाटील, आपचे विजय पाटील, मुख्तार इनामदार, अर्चना मेत्री, राजकुमार टोपण्णावर, मनोहर पाटील, एल. बी. सावंत, सिद्धराय सिगीहळळी, शेतकरी संघटनेचे राजू मरवे, युवा समितीचे शुभम शेळके, एन. के.नलवडे, सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

बेळगावच्या रती हुलजीचे मिस इंडियाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल

tarunbharat

न्यू इंडियन क्राफ्ट एक्स्पोचे उद्घाटन थाटात

Amit Kulkarni

आजपासून बेळगावमधील पासपोर्ट सेवा केंद्र होणार सुरू

Patil_p

हॉस्टेल्स बंद : विद्यार्थ्यांची परवड सुरू

Amit Kulkarni

जिल्हय़ात रविवारी कोरोनाचे 121 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

Amit Kulkarni

आरपीडी चौकातील नादुरुस्त चेंबरचे अखेर बांधकाम

Amit Kulkarni