Tarun Bharat

बुद्धिबळ ऑलिम्पियाड : भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल

बलाढय़ चीनला दणका, जॉर्जिया, जर्मनीलाही नमविले

वृत्तसंस्था/ चेन्नई

फिडेच्या ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या नवव्या फेरीत भारताने बलाढय़ चीनला धूळ चारत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. आता 28 ऑगस्ट रोजी भारताची उपांत्यपूर्व लढत होणार आहे. भारताने चीनवर मात केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संघाचे खास अभिनंदन केले.

भारताने अखेरच्या फेरीत चीनवर 4-2 अशा फरकाने मात केली. यू-20 पटावर झालेल्या लढतीत भारताने चार डाव अनिर्णीत राखले तर दोन विजय मिळवित चीनला नमविण्याचा पराक्रम केला. 15 वर्षीय प्रज्ञानंदने चीनच्या लियू यान कोचा तर दिव्या देशमुखने जिनेर झूचा पराभव केला. भारतीय कर्णधार विदित गुजराथी व चीनचा जागतिक तृतीय मानांकित डिंग लिरेन यांच्यातील सामना बरोबरीत राहिला तर पी. हरिकृष्णने यांगयी यूला बरोबरीत रोखले. भारताची आघाडीची महिला बुद्धिबळपटू कोनेरू हंपीने जागतिक अग्रमानांकित महिला यिफान होयूला बरोबरीत रोखले तर द्रोणावली हरिकानेही वर्ल्ड चॅम्पियन वानजुन हुविरुद्ध बरोबरी साधत गुण विभागून घेतले.

भारताने गट अ मध्ये 17 गुण व 39.5 पटगुण घेत अग्रस्थान पटकावले. याआधारावरच भारताने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविणारा पहिला संघ होण्याचा मानही मिळविला. चीनवर विजय मिळविल्यानंतर पी. हरिकृष्ण खूपच खुश झाला असून या विजयाचे श्रेय त्याने प्रज्ञानंद व दिव्या देशमुख या युवा खेळाडूंना दिले आहे. भारताने याआधी सातव्या फेरीत जॉर्जियावर 4-2 आणि आठव्या फेरीत जर्मनीवर 4.5-1.5 गुणांनी मात केली होती.

मंगोलियाने रोखले

त्याआधीच्या सहाव्या फेरीत भारताला मंगोलियाने 3-3 असे बरोबरीत रोखले. त्याआधी झालेल्या चौथ्या व पाचव्या फेरीत भारताने अनुक्रमे इंडोनेशिया व इराण यांचा पराभव केला होता. इंडोनेशियावर 4.5-1.5 व इराणवर 4-2 असा विजय मिळविल्यानंतर तुलनेने कमकुवत असलेल्या मंगोलियाविरुद्ध मात्र भारताला ती चमक दाखविता आली नाही.  चौथ्या फेरीत माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदला इंडोनेशियाच्या सुसांतो मेगारांतोने बरोबरीत रोखल्याने अर्ध्या गुणावरच समाधान मानावे लागले. पाचव्या फेरीत आनंदला इराणच्या परहम मॅघसूदलूने पराभवाचा धक्का दिला. तरीही भारताने ही लढत 4-2 अशी जिंकली. पी. हरिकृष्ण, डी. हरिका, वंतिका अगरवाल आपापले सामने जिंकले तर हंपी व निहाल सरिन यांचे सामने अनिर्णीत राहिले. भारताचे सरासरी रेटिंग 2419 असून या स्पर्धेत त्यांना सातवे मानांकन देण्यात आले आहे. कोव्हिड 19 महामारीमुळे ही स्पर्धा या वर्षीं ऑनलाईनवर खेळविली जात आहे. यावेळी स्पर्धेची वेगळी रचना करण्यात आली आहे. प्रत्येक संघात सहा खेळाडू असून त्यात किमान दोन महिला खेळाडूंना स्थान देणे आवश्यक आहे.

Related Stories

कार्लसनला हरविणारा डी.गुकेश सर्वात युवा खेळाडू

Amit Kulkarni

भारतीय क्रिकेट संघाला एका गुणाचा दंड

Patil_p

फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदासाठी भुतियाचा अर्ज दाखल

Patil_p

एजबॅस्टन स्टेडियमवर कोव्हिड-19 एनएचएस स्टाफसाठी चाचणी केंद्र

Patil_p

माजी फुटबॉलपटू प्रणब गांगुली कालवश

Patil_p

फुटबॉलपटूंकडून ओडिशा शासनाचे कौतुक

Patil_p