Tarun Bharat

बुरखाधारकांच्या मदतीने पळवला एलईडी ट्रॉलर

प्रतिनिधी / मालवण

मत्स्य विभागाच्या गस्तीनौकेने पकडून मालवण बंदरात अवरुद्ध करून ठेवलेला साखरीनाटे येथील एलईडी ट्रॉलर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास पळवून नेल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी शनिवारी सायंकाळी मत्स्य विभागाने पोलिसात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. एका पांढऱया नौकेतून आलेल्या बुरखाधारी व्यक्तींच्या सहकार्याने हा ट्रॉलर अत्यंत थरारकरित्या पळविण्यात आला. यात मत्स्य विभागाच्या गस्तीवरील एक कर्मचारी सुदैवाने बचावल्याचे मत्स्य विभागाचे म्हणणे आहे. या फिल्मी स्टाईल पोबाऱयामुळे सागरी सुरक्षा यंत्रणेतील समन्वयावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

रत्नागिरी जिल्हय़ातील साखरीनाटे येथील अबुझर ए. रौफ हबिब यांच्या मालकीचा ‘एच अताउल्ला’ (आयएनडी एमएच-4/एमएम 2726) हा ट्रॉलर आहे. आता हा ट्रॉलर जनरेटरसह पकडून आणण्याचे आव्हान सागरी सुरक्षा यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. शुक्रवारी सायंकाळी एलईडी दिवे, जनरेटर आदी साहित्यासह पकडलेला हा ट्रॉलर पकडून मालवण बंदरात अवरुद्ध करण्यात आला होता. ट्रॉलर आणि त्यामधील महागडय़ा जनरेटर जप्तीच्या भीतीने सदरील ट्रॉलर पळवून नेण्यासाठी काहींनी फिल्डींग लावली होती, अशी माहिती मत्स्य विभागाच्या म्हणण्यातून पुढे येत आहे. रात्री दहाच्या सुमारास मत्स्य विभागाच्या कर्मचाऱयांसमक्ष बंदरातून ट्रॉलरने पोबारा केला. मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार पळून जाण्याआधी ट्रॉलरवरील तांडेल आणि दोन खलाशांनी दोनवेळा इंजिन सुरू केले होते. यावेळी गस्तीवरील मत्स्य विभागाचे अधिकारी आणि सागर सुरक्षा रक्षकांनी त्यांना विचारणा केली असता आपण ‘घामत’ काढत असल्याचे उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर दहाच्या सुमारास मत्स्य विभागाचे कर्मचारी आपली डय़ुटी संपवून छोटय़ा नौकेने जेटीच्या दिशेने जायला निघाले. तर रात्रपाळीसाठीचे सुरक्षा रक्षक जेटीवर छोटय़ा नौकेच्या प्रतीक्षेत उभे होते. छोटी नौका जेटीजवळ पोहोचायला अवघे काही अंतर शिल्लक असताना एका नौकेतून काही बुरखाधारी लोक एलईडी ट्रॉलरकडे आले. त्यांनी नांगराची रस्सी कापली. मात्र, गस्ती नौकेला अडकवलेली रस्सी कापण्याच्या फंदात न पडता त्यांनी तांडेल व खलाशांना थेट इंजिन सुरू करण्याचा इशारा दिला. इंजिन सुरू करताच गस्ती नौकेला असलेली रस्सी तुटली. हा वेग इतका जबरदस्त होता की, एलईडी ट्रॉलरचा खुर तुटून वेगाने गस्तीनौकेवरील एका कर्मचाऱयाच्या अगदी जवळून गेला. तो थोडक्यात बचावला. रस्सी तुटताच नौकेतील बुरखाधारी लोकांनी एलईडी ट्रॉलरला बंदरातून सुखरुप बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. बंदरातून बाहेर पडेपर्यंत सदर नौका एलईडी ट्रॉलरच्या पुढे चालत होती. बंदरातून ट्रॉलर थोडा दूर गेल्यानंतर बुरखाधारकांची नौका मागे परतली.

सागरी सुरक्षा यंत्रणेत खळबळ

एलईडी पर्ससीन आणि परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सच्या बेकायदेशीर मासेमारीमुळे घडणाऱया विविध घटनांमुळे मत्स्य विभागाबरोबरच सागरी सुरक्षा यंत्रणेतही खळबळ उडाली आहे. एलईडी ट्रॉलर पळून गेल्यानंतर अतिरिक्त सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रवींद्र मालवणकर यांनी मालवण पोलिसांना संपर्क करत त्यांच्याकडे स्पीडबोटीची मदत मागितली होती. परंतु मालवण पोलिसांकडून जिल्हा पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आल्याचे मालवणकर यांनी सांगितले. यात बराच वेळ गेला. तरीदेखील आपण आचरा, देवगड, विजयदुर्ग, साखरीनाटे, रत्नागिरी येथील बंदरांमध्ये मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांना सतर्क राहून सदर ट्रॉलर पकडण्याचे आवाहन केले आहे. या ट्रॉलरवर एक मोठा जनरेटर असल्याने तो उतरविण्यासाठी जेसीबीची गरज भासणार आहे. त्यामुळे जेटीच्या ठिकाणी आपण लक्ष ठेवून आहोत, असे मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले.

‘ते’ बुरखाधारी स्थानिकच?

मालवण बंदरातून ट्रॉलर पळवण्यासाठी एका नौकेतून आलेले बुरखाधारी स्थानिक माहितगार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण एलईडी ट्रॉलरवरील तांडेल व खलाशांना मालवण बंदराविषयी फारशी माहिती नसेल. त्यामुळे बुरखाधारकांची नौका त्यांना बंदरातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत होती. म्हणूनच बुरखाधारी स्थानिकच असण्याची शक्यता आहे. तसेच पकडलेला एलईडी ट्रॉलर स्थानिकांकडून वापरात असण्याचाही अंदाज असल्याने त्या दृष्टीने आता पोलीस तपासाची चक्रे फिरण्याची चिन्हे आहेत.

पारंपरिक मच्छीमारांकडून तीव्र नाराजी

एलईडी ट्रॉलर पळून गेल्याचे वृत्त कळताच सकाळी 11 च्या सुमारास अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष मिथुन मालंडकर, उपाध्यक्ष भाऊ मोरजे, आबा वाघ, चैतन्य तारी, सुजीत मोंडकर आदींचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी मत्स्य विभागाच्या कार्यालयात दाखल झाले. मात्र, शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने अधिकृत पत्र स्वीकृती होणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पत्र दिले नाही. मात्र, कार्यालयाबाहेर मत्स्य विभागाच्या कारभाराबाबत परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांच्याकडे पारंपरिक मच्छीमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आता तत्परता का नाही दाखवली?

पारंपरिक मच्छीमार म्हणाले, बेकायदेशीर मासेमारीप्रकरणी दोन ट्रॉलर अवरुद्ध करून ठेवले असताना मत्स्य विभागाची एवढी बेफिकिरी चुकीची आहे. गस्तीवरील कर्मचाऱयांच्या जर जीवावर बेतले असते त्याची जबाबदारी कोणाची होती? मत्स्य विभागाने गस्तीवरील सीसीटीव्ही यंत्रणा सुरू ठेवणे आवश्यक होते. पण ती बंद ठेवण्यात आली होती. गतवर्षी स्थानिक मच्छीमारांना एलईडी मासळी लूटमार
प्रकरणात ताब्यात घेताना सागरी सुरक्षा यंत्रणेने प्रचंड तत्परता दाखवली होती. मग पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेण्यात आलेला ट्रॉलर जर पळून जात असेल तर त्याल पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणेकडून तत्परता का दाखवली जात नाही, असा सवाल केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार

मत्स्य विभागाच्या गस्तीनौकेवर 14 मार्च रोजी हल्ल्याचा प्रयत्न करणाऱया परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सविरोधात वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 28 मार्चला त्यापैकी एक हायस्पीड ट्रॉलर मत्स्य विभागाने बेकायदेशीर मासेमारीप्रकरणी ताब्यात घेतला. या ट्रॉलरवर दंडात्मक कारवाईसाठी वेंगुर्ले पोलिसांकडे प्रतिवेदन दाखल करण्यात आले आहे. परंतु हल्लाप्रकरणी वेंगुर्ले पोलिसांकडून सदर ट्रॉलर अद्याप ताब्यात घेतला गेलेला नाही. वास्तविक पोलिसांनी पुढील तपासासाठी ट्रॉलर आपल्या ताब्यात घ्यायला हवा होता. त्यात पुन्हा पळून गेलेल्या ट्रॉलरला पकडण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद पोलिसांकडून मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याचा आपला विचार असल्याचे मालवणकर म्हणाले. दरम्यान, ट्रॉलर रात्री दहाच्या सुमारास पळून गेला असताना पोलिसांना स्पीडबोटीसाठी रात्री दीडच्या सुमारास कळविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

रूपाली देऊलकर यांचे अल्पशा आजाराने निधन

Anuja Kudatarkar

मावळे असतात म्हणून राजे असतात, आमच्याकडून फाईल बंद: संजय राऊत

Rahul Gadkar

जिह्यातील सुमारे 20 टक्के ग्रामपंचायती बिनविरोध

Patil_p

जिल्हा परिषद भवनात कोरोनाचा शिरकाव

Patil_p

रत्नागिरी : वरवलीत आणखी ३ वाड्या कन्टेनमेंट झोन

Archana Banage

दिवाळीचे कलर्स, सोबत ‘पुजारी’च्या ऑफर्स

NIKHIL_N