Tarun Bharat

बॅन्डेड रोडचा भाव चढताच…

Advertisements

दराच्या दृष्टीने आंबेडकर मार्ग अव्वल

गंगाधर पाटील / बेळगाव

गेल्या काही वर्षांमध्ये डॉ. आंबेडकर रोड (सिव्हिल हॉस्पिटल रोड) चेही महत्त्व वाढत चालले आहे. या रस्त्यावर आलिशान इमारतींबरोबरच नामांकित कंपन्यांचे शोरुम याचबरोबर मोठी हॉटेल्स, लॉजिंग झाली आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या रस्त्यावरील जमिनीचे दर झपाटय़ाने वाढत चालले आहेत. या रस्त्यावर निवासी मालमत्तांचा दर 7 हजार 200 रुपये प्रति चौ. फूट तर व्यावसायिक जागांचा दर 10 हजार 80 रुपये प्रति चौरस फूट आहे. त्या खालोखाल क्लब रोडचा दर असून त्यानंतर एसपी ऑफिस रोड ते कोल्हापूर सर्कलचा क्रमांक लागतो.

क्लब रोडचा निवासी मालमत्तांचा दर 5 हजार 610 रुपये प्रति चौरस फूट तर व्यावसायिक जागांचा दर 7 हजार 854 रुपये प्रति चौ. फूट आहे. मुद्रांक व नोंदणी खात्याने हा दर निश्चित केला आहे. एसपी ऑफिस रोडचे रुंदीकरण झाल्यामुळे येथील दरामध्येही वाढ झाली आहे. एसपी कार्यालयापासून कोल्हापूर सर्कलपर्यंत निवासी मालमत्तांचे दर 3 हजार 650 रुपये प्रति चौ. फूट तर व्यावसायिक जागांचा दर 6 हजार 10 रुपये प्रति चौरस फूट झाला आहे.

सिव्हिल हॉस्पिटल रोड तसेच एसपी ऑफिस रोडला लागून स्मशानभूमी असल्यामुळे या ठिकाणी जागा घेण्यास नागरिक धजत नव्हते. याचबरोबर व्यावसायिकही पुढे येत नव्हते. मात्र गेल्या वर्षांमध्ये या दोन्ही रस्त्यांचा कायापालट झाल्याचे पहायला मिळत आहे. सिव्हिल हॉस्पिटलपासून कोल्हापूर सर्कलपर्यंत आंबेडकर रोडवर देशातील नामांकित कंपन्यांचे शोरुम या ठिकाणी झाले. त्यामुळे या परिसरातील जागेला अधिक महत्त्व वाढले. याचबरोबर या रस्त्याच्या अंतर्गत परिसरात विविध हॉस्पिटल्सही झाली आहेत. त्यामुळे साहजिकच या जागांचे दर वाढले आहेत. या ठिकाणी तयार इमारती भाडय़ाने घेण्याचे प्रमाणही अधिक आहे. 

काही वर्षांपूर्वी शहराच्या बाहेरील भाग म्हणून येथील मालमत्ता धारकांना तसेच जागांच्या मालकांना ग्राहक मिळत नव्हते. मात्र आता जागा खरेदी करण्यासाठी चढाओढ लागली आहे. जागा मिळणे देखील आता कठीण बनले आहे. मुद्रांक व नोंदणी खात्याने मागील 13 वर्षांपूर्वी आंबेडकर रोडवरील निवासी मिळकतीचे दर 1670 रुपये प्रति चौ. फूट निश्चित केले होते. तर व्यापारी जागांचा दर 1770 रुपये प्रति चौ. फूट निश्चित केला होता. गेल्या 13 वर्षांमध्ये निवासी मालमत्तांचा दर 5 हजार 530 रुपयांने प्रति चौ. फूट झाला असून व्यापारी जागांचा दर 8 हजार 330 रुपयांनी प्रति चौ. फूट निश्चित करण्यात आला आहे. तर 1997 ला मुद्रांक व नोंदणी खात्याने याच रस्त्याचा निवासी मालमत्तांचा दर 350 रुपये प्रति चौरस फूट तर व्यापारी जागेचा दर 420.75 रुपये प्रति चौरस फूट निश्चित केला होता. आता हे दर मुद्रांक आणि नोंदणी खात्याने देखील वाढविले असून 23 वर्षांमध्ये निवासी मालमत्तांचा दर 6850 रुपये प्रति चौ. फुटाने वाढ करण्यात आली आहे. तर व्यापारी जागांचा दर 9659.25 प्रति चौ. फुटाने निश्चित करण्यात आला आहे.

क्लब रोडच्या दरात देखील 23 वर्षांत जवळपास 70 हून अधिक पटीने वाढ झाली आहे. या दोन्ही रस्त्यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले असून जागा मिळणे अवघड झाले आहे. केएलई हॉस्पिटलपर्यंत मोठे शोरुम आहेत. याचबरोबर नामांकित लॉजिंग तसेच रेस्टॉरेन्ट, खानावळी असल्यामुळे या रस्त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या रस्त्याप्रमाणेच गेल्या काही वर्षांमध्ये क्लब रोडचेही महत्त्व वाढत चालले आहे. या रस्त्याचे रुंदीकरण काही वर्षांपासून झाले. त्याचाच परिणाम दरांवर दिसून येतोय.

डॉ. आंबेडकर रोड आणि क्लब रोड बरोबरच एसपी ऑफिस रस्त्याचेही महत्त्व दिवसेंदिवस वाढू लागले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाबरोबरच पोलीस आयुक्त कार्यालय, महापालिका कार्यालय या रस्त्यावरच झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील जागांचे देखील दर वाढले आहेत. एसपी ऑफिस रोड ते कोल्हापूर सर्कलपर्यंत निवासी मालमत्तांचे दर 3 हजार 650 प्रति चौ. फूट आणि व्यापारी जागांचे दर 6 हजार 10 रुपये प्रति चौ. फूट निश्चित केले आहेत.

या परिसरातील रस्त्यांवरील जागांची तुलना केली असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाचे महत्त्व वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या तरी या रस्त्यावरील जागेच्या दरामध्ये वाढ होत आहे. मुद्रांक आणि नोंदणी खात्याने निश्चित केलेल्या दरापेक्षाही किती तरी अधिक पटीने जागांची खरेदी विक्री होत आहे. हा रस्ता केएलई हॉस्पिटल बरोबरच राष्ट्रीय महामार्गाला जोडत असल्यामुळे शहरामध्ये प्रवेश करणारा हा मुख्य रस्ता ठरू लागला आहे. त्यामुळे भविष्यातही या रस्त्याचे महत्त्व वाढणार हे निश्चित आहे.

Related Stories

वडगाव येथे रेशनचा तांदूळ-दूध पावडर जप्त

Patil_p

कंग्राळी खुर्दचा रस्ता,वाहनचालकांच्या खस्ता!

Amit Kulkarni

हिंडलगा येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

Amit Kulkarni

मनपातील महसुल विभागात गोंधळाचे सावट

Patil_p

भाजीपाल्यांच्या आवकेत वाढ दर स्थिर

Patil_p

आधार सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Patil_p
error: Content is protected !!