Tarun Bharat

‘बेंगळूर टेक समिट’चे आयोजन नोव्हेंबरमध्ये

उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांची माहिती : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनाही देणार निमंत्रण

प्रतिनिधी /बेंगळूर

राज्य सरकारकडून आयोजित होणारे ‘बेंगळूर टेक समिट-2021’ (बीटीएस) यंदा नोव्हेंबर 17, 18 आणि 19 रोजी पार पडणार आहे. या टेक समिटसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनाही निमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तसेच माहिती-तंत्रज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान खात्याचे मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.

टेक समिटसंबंधी वरिष्ठ अधिकाऱयांची पूर्वतयारी बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. मागील वर्षी टेक समिटला ‘नेक्स्ट इज नाऊ’ हे टॅगलाईन होते. यावर्षी ‘ड्रायव्हींग दी नेक्स्ट’ हे टॅगलाईन असणार आहे. कोरोनामुळे यंदा देखील व्हर्च्युअल आणि प्रत्यक्ष पद्धतीने ही परिषद भरविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा मानस असून त्यासाठी त्यांना निमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना देखील परिषदेसाठी निमंत्रण दिले जाणार आहे. शिवाय तंत्रज्ञान व हेल्थ केअर क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्याचाही विचार सुरू असल्याचे ते यावेळी म्हणाले.

हुबळीसह तीन शहरांत परिषदांचे आयोजन

टेक समिटच्या पूर्वतयारीसाठी ‘बियाँड बेंगळूर’ उपक्रमांतर्गत सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात म्हैसूर, हुबळी आणि मंगळूर येथे परिषदांचे आयोजन करण्यात येईल. हे कार्यक्रम भव्य स्वरुपात आयोजित केले जातील, अशी माहिती डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.

मागील टेक समिटमध्ये ग्लोबल अलायन्स क्षेत्राला अधिक प्राधान्य देण्यात आले होते. यावेळी भारतीय गुंतवणूकदारांच्या संघटनेला प्राधान्य देण्यात येईल. विविध राज्ये आणि उत्तम प्रगती साधलेल्या खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होतील यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पूर्वतयारी म्हणून हुबळी, मंगळूर आणि म्हैसूर या शहरांमध्ये होणाऱया परिषदांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय भू-परिवहन मंत्री नितीन गडकरी सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

तीन जिल्हय़ांमध्ये होणाऱया टेक समिटच्या पूर्वतयारी बैठकीत कर्नाटक डिजिटल इकॉनॉमी मिशन (केडीइएम), इंजिनियरिंग रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट (इआर ऍण्ड डी), भारतीय इलेक्ट्रॉनिक ऍण्ड सेमीकंडक्टर असोसिएशन (आयइएसए) शी संबंधीत अहवालांचे प्रकाशन करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

बीटीएसच्या पूर्वतयारी बैठकीत माहिती तंत्रज्ञान व्हिजन गुपचे अध्यक्ष क्रीस गोपालकृष्ण, जैविक तंत्रज्ञान व्हिजन ग्रुपच्या अध्यक्षा किरण मुझुमदार, स्टार्ट अप व्हिजन ग्रुपचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार प्रशांत प्रकाश, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सल्लागार डॉ. इ. व्ही. रमणरेड्डी तसेच विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

सहावी-आठवीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून पूर्णवेळ

Patil_p

कर्नाटक: वीज दरवाढीमुळे अनेक उद्योग बंद होतील: एफकेसीसीआय

Archana Banage

कर्नाटकात शुक्रवारी ५२ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage

म्हैसूरमध्ये प्रथम चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला दिली लस

Archana Banage

कर्नाटक: दिल्लीत प्रथम यात्री निवास बांधा : मुख्यमंत्री येडियुरप्पा

Archana Banage

नियमांचे पालन न केल्यास ‘लॉकडाऊन’

Amit Kulkarni