तरुण भारत

बेअरस्टोचा पाया, लिव्हिंगस्टोनचा कळस!

पंजाबचा आरसीबीवर 54 धावांनी एकतर्फी विजय

मुंबई / वृत्तसंस्था

Advertisements

जॉनी बेअरस्टो (29 चेंडूत 66) व लियाम लिव्हिंगस्टोन (42 चेंडूत 70) यांच्या फटकेबाजीच्या बळावर पंजाब किंग्सने आरसीबीचा 54 धावांनी धुव्वा उडवला आणि आयपीएल प्ले-ऑफमध्ये स्थान संपादन करण्याची आशाअपेक्षा कायम राखली. पंजाबने 20 षटकात 9 बाद 209 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तराखाली आरसीबीचा संघ दडपणाखाली 20 षटकात 9 बाद 155 असा ढेपाळला. जॉनी बेअरस्टो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

विजयासाठी 210 धावांचे तगडे आव्हान असताना आरसीबीतर्फे ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 35 तर रजत पाटीदारने 26 धावांचे योगदान दिले. विराट कोहली (14 चेंडूत 20) जम बसला आहे, असे वाटत असतानाच अचानक बाद झाला आणि आरसीबीच्या गोटात सन्नाटा पसरला. कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस (10), महिपाल लोमरोर (6), दिनेश कार्तिक (11), शाहबाज (9) स्वस्तात बाद झाले तर तळाच्या फलंदाजांनी देखील निराशाच केली. हर्षल 11 तर हसरंगा एका धावेवर बाद झाले. सिराज (9) व हॅझलवूड (7) एकेरी धावसंख्येवर नाबाद राहिले. धावगतीवर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी या जोडीने पूर्ण 20 षटके खेळून काढण्यावर भर दिला.

जॉनी बेअरस्टोचा पाया, लिव्हिंगस्टोनचा कळस

प्रारंभी, बेंगळूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला पाचारण केल्यानंतर पंजाबने निर्धारित 20 षटकात 9 बाद 209 धावांचा डोंगर रचला आणि या निर्णयाचा आरसीबीला फटका बसल्याचे चित्र निर्माण झाले. पंजाबच्या डावात एकीकडे, बेअरस्टोने अवघ्या 29 चेंडूत 66 धावांची आतषबाजी केली तर उत्तरार्धात लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 70 धावा वसूल करत आरसीबीच्या गोलंदाजांची आणखी धुलाई केली. बेअरस्टोच्या 66 धावांच्या खेळीत 7 षटकार व 4 चौकारांचा समावेश राहिला.

6 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये बेअरस्टो व धवन (15 चेंडूत 21) यांनी आरसीबीचा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय चुकीचा ठरवत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. एका बाजूची बाऊन्ड्री अवघ्या 66 मीटर्सवर असल्याचा पंजाबने विशेष लाभ घेतला. सिराजला पहिल्या स्पेलमध्ये चक्क 4 षटकार मोजावे लागले.

पॉवर प्लेनंतर वणिंदू हसरंगा (4 षटकात 2-15) व शाहबाज अहमद (4 षटकात 1-40) यांनी विकेट-टू-विकेट मारा करत पंजाबची धावगती रोखण्याचा बऱयापैकी प्रयत्न केला. बंगालचा डावखुरा फिरकीपटू शाहबाजच्या गोलंदाजीवर बेअरस्टोचा फटका चुकला आणि सिराजने सोपा झेल टिपला. पॉवर प्लेच्या 6 षटकात 83 धावांची आतषबाजी केल्यानंतर पंजाबला 7 ते 10 षटकादरम्यान केवळ 22 धावा करता आल्या.

हसरंगा व शाहबाज या दोघांनीही आऊटसाईड ऑफ स्टम्प मारा करत लिव्हिंगस्टोन व अगरवाल यांना क्रीझबाहेर पुढे सरसावून फटके मारण्यापासून रोखून धरले. अर्थात, यानंतरही इंग्लिशमन लिव्हिंगस्टोनने दोन-एक उत्तुंग षटकार व रिव्हर्स स्वीपचा चौकार फटकावत दडपण झुगारुन टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अंतिम टप्प्यात हर्षल पटेलने (4 षटकात 4-34) भेदक मारा साकारला.

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्स ः 20 षटकात 9 बाद 209 (लियाम लिव्हिंगस्टोन 42 चेंडूत 5 चौकार, 4 षटकारांसह 70, जॉनी बेअरस्टो 29 चेंडूत 4 चौकार, 7 षटकारांसह 66, शिखर धवन 15 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 21, मयांक अगरवाल 16 चेंडूत 3 चौकारांसह 19. अवांतर 7. हर्षल पटेल 4 षटकात 4-34, वणिंदू हसरंगा 4 षटकात 2-15, शाहबाज अहमद 4 षटकात 1-40).

आरसीबी ः 20 षटकात 9 बाद 155 (ग्लेन मॅक्सवेल 22 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 35, रजत पाटीदार 21 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारासह 26, विराट कोहली 14 चेंडूत 20, दिनेश कार्तिक 11, हर्षल पटेल 7 चेंडूत 11. अवांतर 10. राहुल चहर, ऋषी धवन प्रत्येकी 2 बळी, कॅगिसो रबाडा 3-21, अर्शदीप, हरप्रीत ब्रार प्रत्येकी 1 बळी).

हॅझलवूडच्या 4 षटकात चोपल्या 64 धावा!

एकीकडे, आरसीबीचा जवळपास प्रत्येक गोलंदाज महागडा ठरत असताना हॅझलवूडची अवस्था तर याहीपेक्षा दयनीय होती. त्याला पहिल्याच षटकात 22 धावा मोजाव्या लागल्या आणि 4 षटकांचा कोटा पूर्ण केल्यानंतर त्याचे गोलंदाजी पृथक्करण 4-0-64-0 इतके खराब राहिले.  

पॉवर प्लेची 6 षटके आणि पंजाबची 83 धावांची आतषबाजी

पंजाब किंग्सने डावातील पहिल्या टप्प्यापासूनच आक्रमणावर भर दिला आणि पाहता पाहता पॉवर प्लेच्या 6 षटकात चक्क 83 धावांची आतषबाजी केली. यामध्ये ग्लेन मॅक्सवेल, जोश हॅझलवूड व मोहम्मद सिराज यांना बराच मार सोसावा लागला.

Related Stories

टिम इंडियाचा ‘सुपर विजय’, मालिकाही खिशात

prashant_c

इंग्लंड महिलांचा भारतावर मालिका विजय

Amit Kulkarni

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत गोलंदाजच निर्णायक ठरतील

Patil_p

मुंबई-पंजाब आज आमनेसामने, फलंदाजांची जुगलबंदी अपेक्षित

Omkar B

डेव्हिस चषक – रशिया उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

प्रशिक्षक क्लुसनरच्या वेतनामध्ये कपात

Patil_p
error: Content is protected !!