प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाने त्यांचे जन्मगाव असलेल्या के. के. कोप्पवर शोककळा पसरली आहे. ज्या बेळगावच्या विकासासाठी गेली 20 वर्षे त्यांची धडपड सुरू होती. त्या बेळगावकरांना त्यांचे अंत्यदर्शनही घेता आले नाही. याचे दु:ख बेळगावकरांच्या मनात कायम राहणार आहे.
विरशैव-लिंगायत समाजाच्या विधीनुसार नवी दिल्ली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची वृद्ध आई सोमव्वा यांना दिल्लीला जाता आले नाही. विश्वेश्वरय्यानगर येथील घरात बसूनच त्यांनी आपल्या मुलाच्या अंत्यसंस्काराचे क्षण पाहिले. आपला मुलगा कुठेही गेला नाही. तो परत येणार आहे, असे त्या म्हणत होत्या. विश्वेश्वरय्यानगर येथील सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानावर नेहमी कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. शुक्रवारीही वर्दळ होती. नातेवाईक, कार्यकर्ते, आप्तेष्ट होते. मात्र साऱयांचे डोळे पाणावले होते. नेहमी हसतमुखाने आपल्याशी हितगुज करणारा, आपल्या अडचणी विचारणारा नेता परत भेटणार नाही, याची सल प्रत्येकाच्या मनात दिसत होती. दरम्यान केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष माजी खासदार प्रभाकर कोरे, आमदार अनिल बेनके यांनी सुरेश अंगडी यांच्या आईची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.