Tarun Bharat

बेळगावमध्ये उतरलं होतं टाटांचं पहिलं विमान

1930 मध्ये रेसकोर्स ग्राऊंडवर लँडिंग : पोलिसांनी पाठवला होता गोपनीय अहवाल : विमान उड्डाणाची केली होती चाचणी

मानसिंगराव कुमठेकर /मिरज

रतन टाटा यांनी सुमारे 68 वर्षे सरकारच्या ताब्यात असलेली एअर इंडिया ही कंपनी नुकतीच ताब्यात घेतली. आपल्या वडिलांनी स्थापन केलेली ही कंपनी पुन्हा मिळविल्याने जेआरडी टाटा यांच्या विमान क्षेत्रातील कामगिरीविषयी चर्चा होऊ लागली आहे. जेआरडी टाटा यांनी पहिले अधिकृत विमान उड्डाण 1932 साली कराची ते मुंबई असे केले होते. मात्र, तत्पूर्वी त्यांनी विमान उड्डाणाची चाचणी घेतली होती. यापैकी पहिली चाचणी 1930 साली त्यांनी बेंगळूर ते मुंबई दरम्यान घेतली. त्यावेळी त्यांनी बेळगावच्या रेसकोर्सवर लँडिंग केले होते. बेळगावमधील सदरच्या लँडिंगचा पोलिसांनी लिहिलेला गोपनीय अहवाल मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात उपलब्ध आहे. बेळगावच्या रेसकोर्सवर टाटांनी केलेलं पहिलं उड्डाण हे भारतीय विमान वाहतुकीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे.

भारत सरकारच्या ताब्यात असलेल्या एअर इंडिया या सार्वजनिक विमान वाहतूक कंपनीला गेल्या काही वर्षात प्रचंड तोटा झाल्याने सदरची कंपनी विकण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यासाठी लिलाव करण्यात आला. यामध्ये टाटा समुहाच्या रतन टाटांनी ही कंपनी सुमारे 18 हजार कोटी रुपयांच्या बोलीवर विकत घेतली आहे. त्यामुळे सुमारे 68 वर्षांनंतर ही कंपनी पुन्हा एकदा टाटा समुहाच्या ताब्यात आली आहे. या कंपनीशी टाटा समुहाचे भावनिक नाते गुंतले असल्याने ही कंपनी खरेदी करण्यात आली.

टाटा एअरलाईन्सची स्थापना

भारतीय उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने अढळस्थान मिळविलेल्या जेआरडी टाटा यांचे वैमानिक होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी ‘द रॉयल एरो क्लब ऑफ इंडिया ऍन्ड बर्मा’ या संस्थेचे सदस्यत्व मिळवून 10 फेब्रुवारी 1929 रोजी विमान चालविण्याचा परवाना मिळविला. त्यानंतर त्यांनी देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याचे ठरवून 1932 साली टाटा एअरलाईन्स कंपनीची स्थापना केली. या माध्यमातून प्रारंभी टपाल सेवेला आरंभ झाला. टाटांनी भारतात सुरू केलेल्या या पहिल्या विमान सेवेने देशातील दळणवळण क्षेत्रात आमुलाग्र क्रांती घडवून आणली.

पहिले विमान उड्डाण

जेआरडी टाटांनी टाटा एअरलाईन्स कंपनीच्या माध्यमातून 15 ऑक्टोबर 1932 रोजी पहिले विमान उड्डाण केले. कराची ते मुंबई असा हा पहिला विमान प्रवास होता. त्याकाळी आजच्यासारखी भौगोलिक माहिती देणारी सॅटेलाईट यंत्रणा नव्हती. त्यामुळे अनेक अडचणींवर मात करत टाटांनी हे विमान उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यामुळे जगाच्या नकाशावर विमान उड्डाण क्षेत्रात भारताचे नाव नेंदले गेले. 1946 साली या कंपनीचे रुपांतर एअर इंडिया कंपनीत झाले. तर 1953 साली या कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

विमान उड्डाणाची पहिली चाचणी

जेआरडी टाटा यांनी 1932 साली पहिली अधिकृत विमानसेवा सुरू केली असली तरी तत्पूर्वी या विमान उड्डाणाची चाचणी घेण्यात आली होती. 1930 च्या मार्च महिन्यात शेवटच्या आठवडय़ात त्यांनी बेंगळूर ते मुंबई अशी विमान उड्डाण चाचणी घेतली. या चाचणी दरम्यान, त्यांनी बेळगावमध्ये विमान उतरविले होते. बेळगावमध्ये त्यांचा मुक्काम एक दिवस होता. त्यानंतर त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले होते. तत्कालिन पोलिसांनी बेळगावच्या रेसकोर्स मैदानावर उतरलेल्या या पहिल्या विमानाबाबत दोन मार्च 1930 रोजी गोपनिय अहवाल लिहून ठेवला आहे. त्याची अस्सल प्रत मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहे. भारतीय विमान सेवेच्या इतिहासाचा हा मौल्यवान ठेवा आहे.

काय म्हटलंय अहवालात?

तत्कालिन अनगोळ तालुक्याच्या मामलेदार आणि पोलिसांनी पाठविलेल्या गोपनिय अहवालात म्हटले आहे की, ‘अजमासे आठ दिवसांपूर्वी मेसर्स टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीचे एक विमान बेंगळूरहून निघून अनगोळ वगैरे गावावरुन जाऊन बेळगाव रेसकोर्स ग्राऊंडवर उतरले होते. त्यांचा मुक्काम बेळगावास एक दिवस होता. आता फक्त एक युरोपियन, एक पारसी असे दोन लोक होते. सदरचे वैमानिक फक्त ट्रायल करता आले होते. नंतर दुसऱया दिवशी विमान मुंबईकडे रवाना झाले’ या अहवालात उल्लेख केलेले पारसी व्यक्ती म्हणजे जे. आर. डी. टाटा होत.

Related Stories

निगेटिव्ह ठरलेला रुग्ण पॉझिटिव्ह

Patil_p

‘वृत्तपत्राचा केक’ वाढदिवसाला अनोखी भेट …!

Amit Kulkarni

विशेष रेल्वेमुळे प्रवाशांना बसतोय भुर्दंड

Amit Kulkarni

संचारबंदीमुळे कारखान्यांना करावा लागणार शिफ्टच्या वेळेत बदल

Patil_p

रविवारी 1734 रुग्ण कोरोनामुक्त

Amit Kulkarni

‘जीएसएस’तर्फे ‘मिराकी युवा महोत्सव’ला प्रारंभ

Omkar B