Tarun Bharat

बेळगावसह 14 जिल्हय़ांमध्ये मुलींचे प्रमाण घटतेय!

एकापेक्षा अधिक मुले नकोत; या बदलत्या मानसिकतेमुळे मुलींचा जन्मदर घटण्याची शक्यता

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगावसह राज्यातील 14 जिल्हय़ांमध्ये मुलींचे प्रमाण घटत आहे. गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा असला तरी 14 जिल्हय़ांमध्ये या कायद्याचे उल्लंघन होत आहे. परिणामी मुलींचा जन्मदर घटत चालला आहे. नॅशनल फॅमिली हेल्प सर्व्हेअंतर्गत हा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे.

डॉक्टर आणि विवाहित जोडप्यांच्या संगनमताने सर्रास गर्भलिंग निदान केले जात आहे. आरोग्य खात्याने गर्भलिंग निदान करणारे उपकरण जप्त केले किंवा अन्य दंडात्मक कारवाई केली तरीसुद्धा डॉक्टरांना फरक पडत नाही. कारण कोर्टामध्ये केसचा निकाल लागण्यात बराच विलंब होत असल्याने त्यांचे फावते आहे. मंडय़ामध्ये तरी एका टेक्निशियनने गर्भलिंग निदान करण्याचे तंत्र शिकून मशीन खरेदी केली आणि स्वतःचे केंद्र सुरू केले. इतकेच नव्हे तर जे डॉक्टर अवैध गर्भपात करतात, त्यांचा संदर्भही हा टेक्निशियन जोडप्यांना देत असे, अशी माहिती प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान तांत्रिक विभाग (पीसी अँड पीएनडीटी)च्या उपसंचालिका डॉ. चंद्रकला यांनी स्पष्ट केली आहे.

अलीकडच्या काळात जोडप्यांना एकच मूल

बेळगाव, बिदर, विजापूर, चामराजनगर, चिक्कमंगळूर, दक्षिण कन्नड, दावणगेरी, हासन, हावेरी, कोडगू, कोप्पळ, रायचूर, रामनगर, उत्तर कन्नड, यादगीर आणि बेंगळूर ग्रामीण या 14 जिल्हय़ांमध्ये मुलींचा दर घटत आहे. अलीकडच्या काळात जोडप्यांना एकच मूल असावे, असे वाटू लागले आणि त्यातही मुलगाच असावा अशी मानसिकता असल्याने मुलींचा दर घटत आहे, असे बालहक्क ट्रस्टचे कार्यकारी संचालक वासुदेव शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान गर्भलिंग निदान करून मुलीचा गर्भ नष्ट केल्याच्या तक्रारी नसल्या तरी एका मुलापेक्षा अधिक मुले नकोत, या बदलत्या मानसिकतेमुळे मुलींचा दर घटला असण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

चिकन-अंडय़ांच्या मागणीत वाढ

Amit Kulkarni

अवजड वाहतूक बंदी आदेशात फेरबदल

Amit Kulkarni

शेवटच्या दिवशी घुमला प्रचाराचा आवाज

Amit Kulkarni

महात्मा फुलेंनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे केली खुली

Patil_p

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त

Omkar B

उचगाव शिवारातील रस्ता डांबरीकरणाचे आश्वासन

Amit Kulkarni