Tarun Bharat

बेळगावात लवकरच केपीएलचे सामने

केएससीए अध्यक्ष रॉजर बिन्नी यांची ग्वाही, ऑक्टोबरपर्यंत स्टेडियम सुसज्जतेचा मानस

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनामुळे वर्षभर अवघे क्रिकेट विश्व ठप्प झाले होते आणि त्याला केएससीए देखील अपवाद नव्हते. पण, आता ताज्या दमाने आम्ही सर्व जण नव्याने सुरुवात करत आहोत आणि सप्टेंबर-ऑक्टोबरअखेर बेळगावातील केएससीए स्टेडियम पूर्णत्वास नेणे, तसेच आगामी केपीएल स्पर्धेतील काही सामने बेळगावात आयोजित करणे, ही आमची सध्याच्या कालावधीतील मुख्य उद्दिष्टय़े आहेत, असे प्रतिपादन केएससीएचे अध्यक्ष व माजी विश्वचषक विजेते अष्टपैलू रॉजर बिन्नी यांनी केले. ऑटोनगर येथील क्रिकेट स्टेडियमची पाहणी, बाकी राहिलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बेळगाव दौऱयावर आले असता ते बोलत होते.

रॉजर बिन्नी यांच्यासमवेत केएससीए उपाध्यक्ष जे. अभिराम, केएससीए कार्यकारिणी सदस्य तिलक नायडू, विद्यमान सचिव संतोष मेनन यावेळी त्यांच्यासमवेत दौऱयात सहभागी होते. धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोतदार यांनी या पथकाचे स्वागत केले. आमदार अनिल बेनके यांनीही सायंकाळच्या सत्रात केएससीए पथकाची भेट घेतली व स्टेडियमला लगत 2 एकर जागा विकसित करण्यासाठी उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवली.

केएससीएच्या पथकाने यावेळी मैदान, स्पोर्ट्स सेंटरची पाहणी केली आणि संपन्न झालेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत पावसाळा सुरु होण्यापूर्वी उर्वरित कामकाज वेगाने करवून घेण्याची सूचना केली. ‘धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोतदार व त्यांच्या सहकाऱयांनी या स्टेडियमच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला, त्याचमुळे आज येथे लक्षवेधी मैदान उभे झाले आहे’, याचा बिन्नी यांनी यावेळी उल्लेख केला.

‘राज्य क्रिकेट संघटनेसाठी बेळगाव अतिशय महत्त्वाचे आहे. बेळगावमधील खेळाडूत प्रचंड गुणवत्ता आहे आणि भविष्यातही येथे आणखी सरस खेळाडू घडतील, याची आम्हाला खात्री वाटते. त्या दृष्टीने पोषक वातावरण आवश्यक आहे. यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे’, असे केएससीए सचिव संतोष मेनन याप्रसंगी म्हणाले. म्हैसूर, शिमोगा विभागात केवळ एकच केएससीए स्टेडियम आहे. फक्त धारवाड झोनमध्येच हुबळी व बेळगाव अशी दोन स्टेडियम्स आहेत, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.

‘कोव्हिड-19 मुळे बीसीसीआयकडून मिळणारा निधी थांबल्याने सर्व विकासकामेही थांबली. पण, आर्थिकदृष्टय़ा सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असून हे सुचिन्ह आहे. बेळगाव स्टेडियमचे 60 ते 70 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि इंटेरियरचे महत्त्वाचे काम बाकी आहे. दर्जा महत्त्वाचा असल्याने किती वेळ लागू शकतो, याबद्दल थोडी तडजोड करण्याची आमची तयारी आहे. त्या दृष्टीने सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत स्टेडियम सुसज्ज करण्याचे आमचे लक्ष्य असेल’, असे ते पुढे म्हणाले.

‘यंदा रणजी चषक स्पर्धा रद्द झाली नसती तर त्या स्पर्धेतील काही सामनेही बेळगावात खेळवले असते. पण, आता केपीएलमधील सामने बेळगावात निश्चितपणाने भरवले जातील’, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तो स्पेल सर्वाधिक महत्त्वाचा…

1983 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला, त्यावेळी संघातर्फे बिन्नी यांनी सर्वाधिक 18 बळी घेतले होते. यातील सर्वात महत्त्वाचा स्पेल कोणता होता, या प्रश्नावर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीचा उल्लेख केला. त्या लढतीत 248 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया ऑस्ट्रलियाच्या डावाला रॉजर बिन्नी (4-29), मदनलाल (4-20) यांनी सुरुंग लावला होता. प्रतिकूल स्थितीत विकेट मिळवणे अधिक महत्त्वाचे होते, त्यामुळे तो स्पेल आठवणीत राहण्यासारखा ठरला, असे बिन्नी याप्रसंगी म्हणाले.

सध्या राष्ट्रीय संघात कर्नाटकच्या खेळाडूंची कमी कशामुळे?

रॉजर बिन्नी यांच्या पर्वात किमान 4 खेळाडू कर्नाटकाचे असायचे. जावगल श्रीनाथ, द्रविड, वेंकटेश प्रसाद यांनीही आपला कालखंड गाजवला. आज असे चित्र दिसत नाही. राष्ट्रीय संघातील कर्नाटकाचे खेळाडू कमी झाले आहेत, याकडे लक्ष वेधले असता रॉजर बिन्नी यांनी निकोप स्पर्धेमुळे असे घडले असल्याचे मत मांडले. ते म्हणाले, ‘सध्या छोटय़ा छोटय़ा शहरात सरावाच्या सुविधा वाढल्या आहेत. खेळाडूंना सरावाची संधी वाढली आहे. प्रशिक्षणाचे तंत्रही सुधारले आहे. दोन-एक दशकापूर्वी असे चित्र नव्हते. विविध प्रथमश्रेणी स्पर्धांमधून खेळाडूंना नवे व्यासपीठ लाभत आले आहे, त्यामुळं हा फरक असू शकतो’.

Related Stories

तुरमुरी मॅरेथॉन : माळवी विजेते

Amit Kulkarni

जीएसएस फुटबॉल संघाचा एसकेईकडून गौरव

Amit Kulkarni

मराठी वृत्तपत्रातूनही नोटीस देणे गरजेचे

Amit Kulkarni

मतदार ओळखपत्राचे काम आमच्याकडे नको!

Amit Kulkarni

मनपाच्या संकेतस्थळावरून माहिती गायब

Amit Kulkarni

बेळगाव-सिकंदराबाद एक्सप्रेस धावणार आजपासून

Amit Kulkarni