सुपारी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज : नशेच्या सौदागरांच्या जाळय़ात तरुणाई
बेळगाव शहर व उपनगरात संघटित गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. एकीकडे वाढत्या चोऱया, घरफोडय़ांनी पोलीस अधिकारी हैराण झालेले असतानाच दुसरीकडे संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याचे आव्हान पोलीस दलासमोर उभे ठाकले आहे. केवळ पंधरा दिवसांत घडलेल्या दोन घटनांमधून सुपारी घेऊन कोणाचाही मुदडा पाडण्याची तयारी असणाऱया टोळीने आपले साम्राज्य स्थापण्यास सुरुवात केली आहे, हे सामोरे आले आहे.
प्रतिनिधी / बेळगाव
खुनी हल्ला, खून प्रकरणांच्या तपासात सुपारी गुन्हेगारांच्या कारवाया वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलीस अधिकारीही थक्क झाले आहेत. विशीतील तरुणाई झटपट श्रीमंतीच्या नादापायी आणि अमलीपदार्थांच्या व्यसनापोटी गुन्हेगारीत उतरल्याचे वास्तव सामोरे आले असून अनेक पालकांचीही मती गुंग झाली आहे. पोलीस दलातील काही अधिकाऱयांनी केलेल्या चुका बेळगावकरांना भोवत आहेत.
4 मार्च 2022 रोजी सायंकाळी झाडशहापूरजवळ जयंत मुकुंद तिनईकर (वय 64) रा. खानापूर या सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सुरुवातीचे दोन-तीन दिवस तर हा हल्ला कोणी व कशासाठी केला, याची पुसटशी माहितीही पोलीस दलाला नव्हती. अखेर खानापूर येथील हॉटेल व्यावसायिक लक्ष्मण बाबुराव शेट्टी (वय 55) याने दीड लाखाची सुपारी देऊन हा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली.
याप्रकरणी खानापूर, मार्कंडेयनगर, उद्यमबाग, अनगोळ येथील नऊ जणांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी दि. 10 मार्च रोजी अटक केली. त्यांच्या चौकशीतून सुपारी प्रकरणाचा उलगडा झाला. दीड लाखाची सुपारी घेऊन या माहिती हक्क कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर केवळ अकरा दिवसांत मंडोळी रोड, भवानीनगर येथील रिअल इस्टेट व्यावसायिक राजू मल्लाप्पा दोड्डबोम्मण्णावर (वय 41) मूळचा राहणार हलगा-बस्तवाड, सध्या रा. भवानीनगर याचा भीषण खून करण्यात आला.
मंगळवार दि. 15 मार्च रोजी भल्या पहाटे कार अडवून राजूवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात त्याच दिवशी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. राजूचा खूनही सुपारी घेऊन केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी चार ते पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली आहे. त्यांच्या चौकशीतूनही थक्क करणारी माहिती बाहेर पडली आहे. पैशांसाठी कोणाचाही मुडदा पाडविण्यासाठी सज्ज असणाऱया गुन्हेगारांची एक टोळीच बेळगाव परिसरात वावरते आहे. यामध्ये जुन्या व नवख्या गुन्हेगारांचाही समावेश आहे. पन्नी व गांजाच्या नादी लावून तरुणाईला गुन्हेगारीत अडकविण्यात येत आहे.
राजूच्या खून प्रकरणात विशाल विजयसिंग चव्हाण हे नाव ठळकपणे घेतले जात आहे. सध्या तो फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लहानपणापासूनच वेगवेगळय़ा गुन्हेगारी प्रकरणात अडकलेला विशाल सध्या बेळगाव परिसरात सुपारी घेऊन गेम वाजविण्यात आघाडीवर आहे. 1 जानेवारी 2020 रोजी शहापूर येथे सामाजिक कार्यकर्ते अभिजित भातकांडे (वय 40) यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. या प्रकरणातही विशालला अटक झाली होती. पोलीस दलातील काही अधिकाऱयांनी घेतलेली नरमाईची भूमिका, आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी विशालसारखे एक हत्यार आपल्याजवळ असावे, यासाठी आग्रही असणाऱयांमुळे त्याचे धाडस वाढले आहे.
…अन्यथा बेळगाव पुन्हा गँगवॉरच्या खाईत
विशाल चव्हाण हा मूळचा कित्तूरजवळील चिक्कनंदिहळ्ळीचा. सध्या शास्त्राrनगर परिसरात त्याचे वास्तव्य आणि वावर आहे. विशीतील तरुणांची एक टोळी बनवून त्याने गुन्हेगारीला जवळ केले आहे. शहापूर, खडेबाजारसह वेगवेगळय़ा पोलीस स्थानकात त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. आता रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणातही हे नाव ठळकपणे सामोरे आले असून वेळीच त्याच्या कारवायांना लगाम घातला नाही तर नव्वदच्या दशकातील बेळगावातील गुंडागर्दीची परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची भीती आहे. एका टोळीला प्रतिस्पर्धी म्हणून दुसरी टोळीही तयार होते आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच संघटित गुन्हेगारांची पाळेमुळे खणून काढून पेकाट मोडले नाही तर बेळगाव पुन्हा गँगवॉरच्या खाईत लोटले जाईल, याचीच भीती अधिक
आहे.
राजूभोवतीही गूढ वलय!


खून झालेला राजू व त्याच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनाविषयी बरीच चर्चा कानावर पडते आहे. त्याने केलेले लग्न, जमिनीचे व्यवहार आदी ठळक चर्चेत असतानाच पोलिसांच्या गणवेशात असलेल्या राजूचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेनेही तपासाची चपे फिरविली आहेत. सुपारी घेऊन त्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात किमान 8 ते 10 जणांची नावे चर्चेत आहेत. प्रत्यक्षात आरोपींना अटक झाल्यानंतरच या खून प्रकरणावर प्रकाश पडणार असला तरी जयंत तिनईकर यांच्यावरील खुनी हल्ला व राजू दोड्डबोम्मण्णावर याचा खून या दोन प्रकरणांमुळे सुपारी गुन्हेगारांच्या कारवायांच्या वाढत्या आलेखाने पोलीस दलासमोर आव्हान उभे केले आहे.