Tarun Bharat

बेळगाव शहर आता ‘ग्रीन’ श्रेणीत

50 हून अधिक गुणांसह वास्तव्य योग्यतेत 47 वे स्थान : महापालिका कामगिरीत मिळाला 33 वा क्रमांक : केंद्र सरकारचे गुणांकन

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने गुरुवारी देशातील शहरांची क्रमवारी जाहीर केली. शहरातील राहणीमान व महानगरपालिकेचे कामकाज या वर्गवारीनुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बेळगाव शहराने महापालिका कार्यक्षेत्रातील कामगिरी (म्युनिसिपल परफॉर्मन्स) क्रमवारीत 33 वे तर वास्तव्ययोग्य शहरात (‘ईज ऑफ लिव्हिंग) क्रमवारीत 47 वे स्थान पटकावले आहे. देशभरातील निवडक 111 शहरांमधून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. वास्तव्ययोग्य शहरांमध्ये बेळगाव शहराने 50.28 इतके गुण प्राप्त करत ‘ग्रीन’ (हरित) श्रेणीत स्थान मिळवल्याने शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर, महापालिका कामगिरीमध्ये मात्र केवळ 40.39 गुण इतके गुण मिळाल्याने ‘ऑरेंज’ यादीत स्थान मिळाले आहे.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या स्मार्ट सिटी योजनेत बेळगाव शहराचा समावेश झाला. या योजनेंतर्गत विविध विकास प्रकल्प आणि सोयी-सुविधा निर्मितीचे काम प्रगतीपथावर असल्याने बेळगाव आता अधिक ‘स्मार्ट’ होत आहे. त्यामुळे लोकांची पसंती वाढत असल्याने वास्तव्ययोग्य शहरांमध्ये आता बेळगावचीही गणना होऊ लागली आहे. या शहरातील नागरिकांचे राहणीमान आणि महापालिकांचे कामकाज यातील दर्जाबाबत केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने देशातील स्मार्ट सिटींमध्ये स्पर्धा घेतली होती. गेल्या वषी 1 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत सर्वेक्षण झाले होते. त्यानुसार दोन वर्गांमध्ये आणि लोकसंख्येला अनुसरून वेगवेगळी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत कर्नाटकातील सात शहरांचा समावेश असून वास्तव्ययोग्य शहरात  हुबळी धारवाडला 51.39 गुणांसह 37 वे स्थान मिळाले आहे. तर महापालिका क्रमवारीत 48.14 गुणांसह 21 वे स्थान प्राप्त झाले आहे.

बेंगळूरला सर्वाधिक पसंती

केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने गुरुवारी देशातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर केली आहे. या शहरांच्या यादीत 10 लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरात बेंगळूर पहिल्या स्थानावर आहे. पुणे शहर दुसऱया स्थानी असून अहमदाबाद शहर तिसऱया स्थानी आहे. तर दहा लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत शिमला पहिल्या, भुवनेश्वर दुसऱया व सिल्वासा तिसऱया स्थानावर आहे.

केंद्रीय मंत्रालयाने गुरुवारी ‘ईज ऑफ लिविंग इंडेक्स रँकिंग-2020’ची यादी जाहीर केली आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार खात्याचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध केला. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून दरवर्षी शहरांचे सर्वेक्षण केले जाते. यंदा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरांमध्ये चेन्नई चौथ्या, सुरत पाचव्या क्रमांकावर आहे. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील पुणे (दुसरे), नवी मुंबई (सहावे), मुंबई (दहावे) या तीन शहरांनी ‘टॉप टेन’मध्ये स्थान पटकावले आहे. मात्र, दहा लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही शहराचा समावेश झालेला नाही.

या सर्वेक्षणासाठी सरकारने 14 प्रवर्ग बनवले होते. त्यात शहराचा शैक्षणिक विकास, आरोग्य सुविधा, राहण्यासाठीची योग्यता, आर्थिक विकासाचा स्थर,

दळणवळण, स्वच्छता, पर्यावरण, रोजगाराची संधी, हरित क्षेत्र, इमारती, प्रदूषण याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात 32 लाख 20 हजार लोकांनी मत नोंदवले. या सर्वेक्षणात देशातील 111 शहरांनी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम 2018 मध्ये शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्येही सर्वेक्षण करण्यात आले होते.

या सर्वेक्षणात संस्थात्मक (इन्स्टिटय़ूशनल), सामाजिक (सोशल), आर्थिक (इकॉनॉमिक) आणि भौतिक सुविधा (फिजिकल) असे चार प्रमुख निकष आणि शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, सुरक्षितता, रोजगार निर्मिती, वाहतूक, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण, वीजवापर, सार्वजनिक मोकळय़ा जागा अशा इतर पूरक निकषांवर प्रमुख शहरांची काटेकोर तपासणी करण्यात येते. त्यासाठी, संबंधित शहरातील काही नागरिकांशी संवाद साधण्यात येतो. नागरिकांकडून ऑनलाईन स्वरूपातही शहरातील राहणीमानाच्या दर्जाविषयी त्यांची मते जाणून घेण्यात येतात. या सर्व माहितीचे विश्लेषण केल्यानंतर राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांची क्रमवारी निश्चित केली जाते.

स्मार्ट सिटींमध्ये इंदोर पुन्हा सर्वोत्तम

देशातील ‘महापालिका कामगिरी’मध्ये इंदोर पहिल्या क्रमांकावर असून सुरत दुसऱया, भोपाळ तिसऱया आणि पिंपरी-चिंचवड चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच यावेळी पुण्याला पाचव्या स्थानावर ढकलत पिंपरी चिंचवडने चौथ्या क्रमांकावर फिनिक्स भरारी घेतली आहे. मात्र, सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरांमध्ये पिंपरी चिंचवड पहिल्या दहामध्येही नसल्याचे धक्कादायक चित्र सर्वेक्षणातून समोर आले आहे. शहरातील रस्ते, पदपथ, सायकल ट्रक सुविधा, कचरा संकलन व प्रक्रिया, जलनिःसारण, पाणीपुरवठा, नागरिकांचा सहभाग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदी निकषांचे मूल्यमापन स्मार्ट सिटी रँकिंगसाठी करण्यात आले.

क्रमवारी….

  • वास्तव्ययोग्य शहरांमध्ये बेंगळूर शहर अव्वल
  • पुण्याला दुसरा, अहमदाबादला तिसरे स्थान
  • हुबळी-धारवाडला 21 आणि 37 वे स्थान
  • देशभरातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर
  • 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची

 ‘टॉप टेन’ शहरे आणि गुणांकन

  1. बेंगळूर……….. 66.70
  2. पुणे ………….. 66.27
  3. अहमदाबाद … 64.87
  4. चेन्नई ………… 62.61
  5. सुरत ………… 61.73
  6. नवी मुंबई ….. 61.60
  7. कोईम्बतूर ….. 59.72
  8. वडोदरा …….. 59.24
  9. इंदौर ………… 58.58
  10. मुंबई ………. 58.23

10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येची ‘टॉप टेन’ शहरे आणि गुणांकन…

  1. शिमला………. 60.90
  2. भुवनेश्वर ……. 59.85
  3. सिल्वासा …… 58.43
  4. काकिनाडा …. 56.84
  5. सेलम ……….. 56.40
  6. वेल्लोर ……… 56.38
  7. गांधीनगर ….. 56.25
  8. गुरूग्राम …….. 56.00
  9. दावणगेरे ……. 55.25
  10. तिरुचिरापल्ली          55.24

Related Stories

आयुक्त रजेवर पगार नाही खात्यावर

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात म. ए. समितीची आघाडी

Omkar B

अल्फीया महोत्सव सांस्कृतिक स्पर्धेत डीपी स्कूलला सर्वसाधारण विजेतेपद

Amit Kulkarni

बसवनकुडची येथे भरदिवसा 5 लाखांची घरफोडी

Patil_p

वनखात्यातर्फे रोप लागवडीला प्रांरभ

Patil_p

तांदळाची तस्करी अन् पोलिसांची मस्करी

Amit Kulkarni