Tarun Bharat

बेळगुंदी-हिरेबागेवाडी पूर्णपणे लॉकडाऊन

Advertisements

बुधवारपर्यंत प्रवेशावर निर्बंध, घरीच राहण्याचा आदेश

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्हय़ात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जीवन जणू स्तब्ध झाले आहे. तालुक्यातील बेळगुंदी आणि हिरेबागेवाडी येथील परिस्थितीही गुरुवारपर्यंत अशीच होती. मात्र, शुक्रवारची सकाळ उजाडताच या गावातील चित्र पालटण्यास सुरुवात झाली. दिल्ली येथील निजामुद्दीन येथे धर्मसभेला गेलेल्या या गावातील दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातम्या सोशल मीडियाद्वारे झळकताच बेळगुंदी आणि हिरेबागेवाडी ग्रामस्थांची जणू झोप उडाली. तर शुक्रवारी सकाळपासूनच पोलीस प्रशासनाच्या संरक्षणाखाली आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी धाव घेतली. आणि संपूर्ण गावालाच जणू पूर्णपणे लॉकडाऊन केले.

गुरुवारपर्यंत काही प्रमाणात ग्रामस्थांना जीवनावश्यक साहित्य मिळत होते. मात्र, गावात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सर्व विक्रीवर निर्बंध घालण्यात आले. किराणा, दूध, भाजीपाला आदी मिळणेही बंद झाले आहे. तर गावातील गल्लीगल्लीत बॅरिकेडस् घालून रस्ते अडविण्यात आले आहेत. तसेच शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱयांनाही परत बोलावून घरी राहण्याची सूचना ध्वनीक्षेपकाद्वारे पोलिसांनी केली. यामुळे सर्वांना जणू गृहकैदेत राहण्याची वेळ आली आहे. कोणा एकाच्या चुकीच्या कामामुळे संपूर्ण गावालाच शिक्षा भोगण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया बेळगुंदी आणि बागेवाडी येथील ग्रामस्थांनी दिल्या आहेत. जनावरांना चारा मिळणेही कठीण बनले आहे. दूध आणि औषधे काही प्रमाणात उपलब्ध करण्यात आली असली तरी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. शुक्रवार दि. 3 पासून येत्या बुधवार दि. 8 पर्यंत या गावांना हा आदेश देण्यात आला आहे. यामुळे बुधवारपर्यंत ग्रामस्थांना घरातच राहावे लागणार आहे. तर बेळगुंदीसह लागून असणाऱया बिजगर्णी, सोनोली, राकसकोप, यळेबैल, सुरुते, आदी गावांतील ग्रामस्थांनाही याचा फटका बसला आहे. बेळगुंदा व हिरेबागेवाडी या गावात प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तर लॉकडाऊनचा आदेश काटेकोरपणे करण्यासाठी शनिवारपासून तालुक्यातील सर्वच गावाच्या प्रवेशद्वारावर झाडांच्या फांद्या, दगड घालून पूर्णपणे गावबंदी करण्यात आली आहे. यामुळे सर्व गावांमध्ये भीतीयुक्त शांतता पसरली आहे.

Related Stories

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे त्या घटनेचा निषेध

Amit Kulkarni

हिंडलग्याच्या सुपुत्राला राष्ट्रपतींकडून लेफ्टनंट पद बहाल

Rohan_P

बेळगावच्या 6 खेळाडूंची धारवाड विभागीय संघात निवड

Patil_p

जिल्हाधिकाऱयांकडून तपास नाक्यांची पाहणी

Patil_p

पुंडलिक कुंडेकर यांचे गणितात संशोधन

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंटची सर्वसाधारण सभा उद्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!