Tarun Bharat

बेशिस्त वाहनांवर कारवाई करा

महापौर रोहित मोन्सेरात यांचे वाहतूक अधिकाऱयांना निर्देश

प्रतिनिधी/ पणजी

राजधानीतील अस्ताव्यस्त आणि बेशिस्तपणे पार्क करण्यात येणाऱया वाहनांचा प्रश्न पणजी महानगरपालिकेने गंभीरतेने घेतला असून बेशिस्तपणा करणाऱया वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिसांना दिले आहेत.

महापौर रोहित मोन्सेरात यांनी आयुक्त आग्नेल फर्नांडिस आणि वाहतूक अधिकाऱयांसह शुक्रवारी शहरातील पार्किंगच्या अस्ताव्यस्तपणाचा अनुभव घेतला. त्यावेळी मोन्सेरात यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करताना अशाप्रकारे बेशिस्तपणे पार्क करण्यात येणाऱया वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

राजधानीत गेल्या कित्येक महिन्यांपासून पार्किंग व्यवस्थेत अस्ताव्यस्तपणा प्रचंड वाढला आहे. त्याचबरोबर वाहतूक नियम सर्रास धाब्यावर बसवून प्रवेशबंदी असलेल्या भागातून सुद्धा बिनदिक्कत वाहने नेण्यात येत आहेत. यात जास्त करून रेन्ट अ बाईकचा वापर करणाऱया पर्यटकांचा समावेश आहे. मात्र या प्रकाराकडे वाहतूक पोलीस आणि अधिकाऱयांचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. परिणामी कुणालाच कायद्याची भीती राहिलेली नाही व त्याचाच फायदा उठवत कायदे न पाळण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे.

एका मार्केट परिसराचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास येथील बहुतेक रस्ते हे एकेरी वाहतुकीसाठीच निर्देशित करण्यात आले आहेत. परंतु येथे तासभर सुद्धा उभे राहिल्यास शेकडो वाहने प्रवेशबंदी झुगारून वाहतूक करताना दिसून येतात. यावरून शहराच्या अन्य भागातील परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.

मार्केट परिसरात पार्किंगचाही अशाचप्रकारे बट्टय़ाबोळ होत असलेला दिसून येते. चारचाकींसाठी निश्चित केलेल्या जागेत दुचाक्या आणि दुचाकीसाठी निश्चित केलेल्या जागेत चारचाकी पार्क करण्याचे प्रकार घडत आहेत. येथील एका घाऊक दारुविक्रेत्याने तर मनमानीच आरंभली असून ’ड्राईव्ह इन’ बार असल्यागत दुकानाच्या दारापर्यंत ग्राहकांची वाहने उभी करण्यास मान्यता देऊ लागला आहे. त्यासाठी प्रसंगी दुकानासमोर पार्क केलेल्या दुचाक्याही ओढून, खेचून बाजूला फेकून कारसाठी जागा बनविली जात आहे. हा प्रकार नित्याचाच झाला असला तरी वाहतूक पोलीस, वाहतूक अधिकारी किंवा मनपाच्या अधिकाऱयांनीही त्याकडे दुर्लक्ष चालविले असल्याने बारचालकाचे आयतेच फावले आहे.

अशाप्रकारे चाललेली मनमानी आणि बेशिस्तपणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. त्यासंबंधी शेकडो तक्रारीही मनपाकडे पोहोचल्या होत्या. त्यांचीच दखल घेत महापौर रोहित मोन्सेरात यांनी शुक्रवारी शहरात फेरफटका मारून पाहणी केली. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱयांना वरीलप्रमाणे कारवाईचे निर्देश दिले.

Related Stories

एकाच दिवसात तब्बल 527 रुग्ण

Amit Kulkarni

साळगावकरांनी कचरा प्रकल्प विस्तारीकरणाविरोधातील पत्र दाखवावे

Patil_p

म्हापशात क्वारंटाईन असणाऱया परप्रांतियांचा गोंधळ

Omkar B

डिचोलीत आज कृष्णा माशेलकर स्मृती संगीत संमेलन

Amit Kulkarni

कांद्याने गाठली शंभरी

GAURESH SATTARKAR

‘पोस्टल बॅलेट’साठी पक्षांमध्ये चढाओढ

Amit Kulkarni