Tarun Bharat

बैठकीचे निमंत्रण न दिल्याने सुदिन ढवळीकर संतप्त

वार्ताहर/ मडकई

फोंडा तालुक्यात कोरोनासंबंधी आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आपल्याला निमंत्रण देण्यात आले नाही. तसेच फर्मागुडी येथे कोविड निगा केंद्र उभरण्यासंबंधी आपल्याला विश्वासात न घेतल्याने सरकारच्या या कृतीचा मडकई मतदार संघाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी निषेध केला आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.

 आमदार ढवळीकर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी वाडी तळावलीचे सरपंच दिलेश गांवकर व पंचसदस्य हर्षल शेणवी तळावलीकर हे उपस्थित होते. फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात कोविड निगा सेंटर सुरू करण्यासाठी  दोन मंत्री येऊन बैठक घेतात. त्यात स्थानिक आमदार म्हणून आपल्याला डावलेले जाते. यावरुन सरकार विरोधी आमदारांशी दुजाभावाचे राजकारण करीत असल्याची टिका ढवळीकर यांनी केली.

 ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोव्यात कोरोनाचा संसर्ग वाढून आज त्याचा सामाजिक प्रसार होण्यासाठी सरकारची बेफिकिरी कारणीभूत ठरली आहे. राज्यात आज कोरोनाबाधीतांचा आकडा दिड हजार पार झाला आहे. फोंडा पोलीस स्थानकात मोठय़ा प्रमाणात आढळलेले पॉझिटिव्ह रुग्ण, उपजिल्हा इस्पितळात एका डॉक्टरला झालेली बाधा यामुळे फोंडा तालुका कटेंनमेट झोनमध्ये येऊनही सरकार ठोस पावले उचलताना दिसत नाही.

 राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाही मंत्री आमदारांच्या खर्चात कपात तसेच महामंडळाच्या खर्चात कपात करणे आवश्यक आहे. पावसाळी अधिवेशनात मंत्र्यानी आपल्या सचिवांची संख्या कमी करताना, पोलिसांची संख्याही कमी करावी.  अधिवेशन काळातील भत्यामध्येही कपात करण्याची मागणी त्यांनी केली.

            गरज भासल्यास लॉकडाऊन केले जाईल

 तळावली गावात एकाच कुटुंबातील तिघे सदस्य कोरोनाबाधीत आढळल्याने आपण स्वत: आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याचे आमदार  ढवळीकर यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी केदार नाईक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर खबरदारीचे उपाय म्हणून 50 जणांची स्वॅब चाचणी घेण्यात आली आहे. सरपंच दिलेश गावकर, पंचसदस्य हर्षल तळावलीकर व माजी पंचसदस्य विभा विशाल दुर्भाटकर संसर्ग नियंत्रणात राहावा यासाठी आवश्यक ते प्रयत्न करीत आहेत. आवश्यकता भासल्यास तळावली भाग लॉकडाऊन केला जाईल अशी माहिती सुदिन ढवळीकर यांनी दिली.

Related Stories

म्हाऊस येथे धोकादायक झाडे हटविण्याचे काम सुरू

Amit Kulkarni

डॉ. आंबेडकर सामाजिक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Amit Kulkarni

भंडारी समाजात फूट घालण्याचे भाजपचे डावपेच

Amit Kulkarni

मूत्रपिंड रुग्णांनी उपचारात हयगय करू नये

Patil_p

मुरगावच्या भाजपाविरोधी मतदारांची नावे गाळण्याचे पुन्हा प्रयत्न

Patil_p

गोमेकॉतील विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची गर्दी

Patil_p