Tarun Bharat

बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर कुमारस्वामी लेआऊट मनपाकडे

हस्तांतरासाठी मनपा-बुडाकडून संयुक्त पाहणी : रामतीर्थनगर वसाहतीमधील विकासकामांसाठी 28 कोटींची तरतूद

प्रतिनिधी / बेळगाव

बुडाने निर्माण केलेल्या वसाहती महापालिकेकडे हस्तांतर करण्यात येतात. मात्र रामतीर्थनगर व कुमारस्वामी लेआऊट हस्तांतर रखडले आहे. पण यापैकी कुमारस्वामी लेआऊट हस्तांतर करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. बुडाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ही वसाहत लवकरच महापालिकेकडे हस्तांतर करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

बुडाने शहराच्या सभोवती भू-संपादन करून नवीन वसाहत योजना राबविल्या आहेत. यापैकी बहुतांश वसाहती महापालिकेकडे हस्तांतर केल्या आहेत. पण रामतीर्थनगर आणि कुमारस्वामी लेआऊट या दोन वसाहतींचे हस्तांतर अद्याप झाले नाही. या वसाहती हस्तांतर करण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हस्तांतर करून घेण्यासाठी महापालिका व बुडाच्या अधिकाऱयांनी सर्वेक्षण केले असता वसाहतीमधील रस्ते, गटारी व विद्युत दिपांची दुरवस्था झाली असल्याचे निदर्शनास आले. वसाहतीमधील रस्ते खराब झाल्याने त्यांची दुरुस्ती करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च होता. विकासकामे राबविण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले असता 86 कोटीच्या घरात खर्च अपेक्षीत होता. रस्ते, गटारींचे बांधकाम व इतर कामे करण्याकरिता 86 कोटी खर्च करावा लागणार असल्याने ती रक्कम देण्याची सूचना महापालिकेने बुडाला केली. किंवा हस्तांतर करण्यापूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करून वसाहत हस्तांतर करण्याची सूचना महापालिकेने केली. त्यामुळे दोन्ही वसाहतींचे हस्तांतर रखडले होते. विकासकामे पूर्ण केल्यानंतर वसाहती हस्तांतर करण्याचा निर्णय बुडाने घेतला होता. सदर विकासकामे राबविण्यासाठी बुडाने निधीची तरतूद केली होती. त्यानुसार कुमारस्वामी लेआऊटमधील सर्व विकासकामे पूर्ण करण्यात आली असून हस्तांतर करण्यासाठी सज्ज झाली आहे.

रामतीर्थनगर वसाहतीमधील विकासकामे राबविण्यासाठी 28 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. विकासकामे राबविण्यासाठी राज्य शासनाने देखील मंजुरी दिली आहे. त्यामुळे निविदा मागविण्यात आल्या आहेत. ही कामे पूर्ण होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्मयता आहे. तत्पूर्वी कुमारस्वामी लेआऊट महापालिकेकडे सोपविण्यात येणार आहे. यादृष्टीने महापालिका व बुडाच्या अधिकाऱयांनी वसाहतीमधील विकासकामांची पाहणी केली आहे. हस्तांतर करण्याच्या दृष्टीने वसाहतीमधील विकासकामे पूर्ण झाली आहेत का? याचा आढावा महापालिकेच्या उत्तर शहर अभियंत्यांनी घेतला आहे. पण बुडाच्या बैठकीत चर्चा करून शिक्कामोर्तब झाल्यानंतर कुमारस्वामी लेआऊट हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

Related Stories

ता.पं.सदस्य-पिडीओंची बैठक घेण्याची मागणी

Patil_p

अनगोळ काळा तलावाला केंदाळचा विळखा

Amit Kulkarni

जिल्हय़ातील 900 जण क्वारंटाईनमध्ये

Patil_p

तालुक्यात बहुतांश ठिकाणी पालखी सोहळय़ाने दौडची उत्साहात सांगता

Amit Kulkarni

महापौर-उपमहापौर निवडणुकीत नवे विघ्न

Amit Kulkarni

बेळगावात पहाटे पहाटे लस दाखल

Tousif Mujawar