Tarun Bharat

बैरुतमधील महास्फोटात 100 जणांचा मृत्यू

अनेक इमारती उद्ध्वस्त : चार हजारहून अधिक लोक जखमी

बैरुत / वृत्तसंस्था

लेबननची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या दोन महास्फोटात किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बुधवारी प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच या दुर्घटनेत तब्बल चार हजार जण जखमी झाल्याचे लेबननच्या आरोग्य मंत्रालयाचे स्पष्ट केले आहे. या दुर्घटनेनंतर लेबननचे पंतप्रधान हसन दिआब यांनी देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मदतीचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, लेबनन येथील भारतीय दुतावासाने मदत व माहितीसाठी इमर्जन्सी सेवा सुरू केली आहे.

लेबननची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या महाभयंकर स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. या स्फोटांचा आवाज संपूर्ण शहरात घुमला होता. तसेच त्याचे हादरे दूरपर्यंत पोहोचले होते. बैरुत शहरातील एका गोदामात तब्बल 2 हजार 750 टन अमोनिअम नायटेट असुरक्षितपणे ठेवण्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते. गेल्या सहा वर्षांपासून या गोदामामध्ये स्फोटक पदार्थ ठेवले जात होते. त्याचाच स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. स्फोट कसा झाला, याचा तपास सध्या सुरू करण्यात आल्याचे लेबननचे अध्यक्ष मिशेल आऊन यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महास्फोटामुळे हादरलेल्या लेबननच्या पाठिशी उभे राहून खोल जखमा भरून काढण्यासाठी आम्हाला मित्रराष्ट्रांनी मदत करावी असे आवाहन पंतप्रधान हसन दिआब यांनी केले आहे.

गोदामात झालेल्या स्फोटानंतर आजुबाजुच्या भागातील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच घटनास्थळी मृतांचा खच पडला होता. परिसरातील सर्व इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोट झालेल्या मुख्य गोदामाच्या इमारतींचे दगड दूरपर्यंत विखुरले होते. स्फोटाच्या आवाजाने दोन-तीन किमीपर्यंतच्या परिसरातील इमारतींच्या काचाही फुटल्याचे निदर्शनास येत होते. तसेच भूमध्य समुद्रात 240 किमी दूर असलेल्या सायप्रसपर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू गेल्याचेही सांगितले जात आहे.

जागतिक पातळीवरून दखल

बैरुतमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर स्फोटाचे फोटो आणि व्हिडीओ प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सदर व्हिडीओमधून स्फोटाची तीव्रता लक्षात येत होती. त्यानंतर जागतिक पातळीवरून याची गंभीर दखल घेत लेबननच्या पाठीशी राहण्याचा निर्णय अनेक देशांनी जाहीर केला. ‘स्फोटाची घटना हादरवून टाकणारी असून आम्ही लेबननला कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार आहोत’, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ट्विट केले आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ‘भयंकर हल्ला’ असे म्हणत लेबननला मदतीचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर फ्रान्स, सौदी अरेबिया, ईस्राईल या देशांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. लेबननमधील भारतीय दुतावासानेही हेल्पलाईन जारी केली आहे.

Related Stories

पुरुषांना अपमानित करण्याचे घेते पैसे

Patil_p

झोपता-झोपतो कमावतो लाखो रुपये

Patil_p

जगात 800 कोटीव्या मुलाचा जन्म

Amit Kulkarni

चीनमधून कोरोना महामारीची सुरुवात : डब्ल्यूएचओ

Patil_p

युक्रेन तात्पुरते सोडण्याचा भारतीयांना आदेश

Patil_p

प्रत्येक भारतीयाला परत आणणार भारतीयांच्या ‘घरवापसी’ला अटकाव

Patil_p
error: Content is protected !!