Tarun Bharat

बोगद्यात अडकलेल्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरूच

अजूनही 174 लोक बेपत्ता- संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न

चमोली / वृत्तसंस्था

उत्तराखंडमधील हिमकडा दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात असला तरी त्याला अजूनही मोठे यश आलेले दिसत नाही. पाण्याच्या मोठय़ा प्रवाहासोबत आलेल्या गाळ-चिखलामध्ये अनेक लोक अडकल्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे. बोगद्यात अडकलेल्यांच्या सुटकेचे प्रयत्नही सुरूच असून त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच पूल तुटल्यामुळे संपर्क तुटलेल्या गावांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याच्यादृष्टीनेही जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

रैनीगाव, करछौ, रिंगी, तपोवन या गावांमधील नागरिक मोठय़ा संख्येने बेपत्ता झाले आहेत. अजूनही 174 लोक बेपत्ता असल्याची माहिती प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली आहे. तपोवनमधील ऋत्विक, ऋषीगंगा, ओम मेटली, एससीसी या कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारीही पाण्याच्या वेगाने आलेल्या प्रवाहासोबत वाहून गेल्यामुळे बेपत्ता झाले आहेत. नदीच्या प्रवाहाजवळ तपोवन विष्णुगड जलविद्युत प्रकल्पासाठी बोगद्यात तांत्रिक काम सुरू होते. हे काम सुरू असताना पाणी वाढल्यामुळे 35 जण बोगद्यात अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. एनटीपीसी प्रकल्पातील 12 जणांना एका बोगद्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

वळणमय बोगद्यामुळे मदतकार्यात अडचणी

ऋषीगंगा प्रकल्पातील 15 जणांनाही वाचविण्यात आले आहे. मात्र एनटीपीसी प्रकल्पाशी संबंधित अन्य एका बोगद्यात किमान 25 ते 35 जण अडकल्याची शक्मयता आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत आलेला गाळ बोगद्याच्या तोंडावर जाऊन अडकून पडल्यामुळे बोगद्यात प्रवेश करणे कठीण झाले होते. पण यंत्रांच्या मदतीने खोदकाम करुन मदतकार्यात गुंतलेली टीम बोगद्यातील गाळ बाहेर काढत आहे. बोगदा वळणावळणाचा असल्यामुळे मदतकार्याला वेळ लागत आहे. एका विशेष कॅमेऱयाच्या मदतीने बोगद्यात कोण कुठे अडकले आहे याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

जखमी झालेल्यांच्या उपचारासाठी जोशीमठ तसेच चमोली जिह्यातील तपोवन येथे तात्पुरते हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. गंभीर जखमींना हेलिकॉप्टरने मोठय़ा हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केले जात आहे. श्रीनगर मेडिकल कॉलेज, एम्स ऋषिकेश आणि जॉली ग्रँट हॉस्पिटल अलर्टवर आहे. त्याशिवाय एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, लष्कराचे जवान, लष्कराच्या अभियांत्रिकी विभागाचे पथक, आयटीबीपीचे जवान आणि हवाई दल परस्पर समन्वय राखून मदतकार्यात गुंतले आहेत.

पूल उभारणीच्या कामाला वेग

पाण्याच्या मोठय़ा प्रवाहामुळे काही रस्त्यांची आणि पुलांची पडझड झाली आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन जवानांनी आवश्यक तिथे तात्पुरते पूल उभारले आहेत. मदतकार्य पूर्ण झाल्यावर तातडीने बांधकाम प्रकल्प हाती घेऊन पायाभूत व्यवस्था पूर्ववत केल्या जातील. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत दररोज घटनास्थळाचा धावता दौरा करुन मदतकार्याचा आढावा घेत आहेत.

स्थलांतर करण्यासही प्राधान्य

निवडक गिर्यारोहकांची पथके मदतकार्यात सहभागी झाली आहेत. नौदलाचे प्रशिक्षित पाणबुडे पाण्यात खोलवर जाऊन बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत.  दरीखोऱयांसह प्रवाहाच्या दोन्ही किनाऱयांवर शोधमोहीम सुरू आहे. हवामान विभाग आणि डीआरडीओचा ड्रोन यांच्या मदतीने उत्तराखंडमधील सर्व डोंगररांगाची पाहणी सुरू आहे. दरम्यान, नजिकच्या काळात मोठे हिमकडे कोसळण्याची शक्मयता असलेल्या सर्व भागांपासून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे. हिमकडय़ांमुळे पुन्हा दुर्घटना होऊ नये यासाठी तज्ञांच्या मदतीने योग्य ते उपाय केले जात आहेत.

Related Stories

‘राष्ट्रीय बाल शक्ती’ने 32 मुलांचा गौरव

Patil_p

रस्त्यांवर धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत; मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय

Archana Banage

घरातही करा मास्कचा वापर

Archana Banage

गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

Archana Banage

दिल्लीतील सेना भवन सील, एका जवानाला कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

डान्स व्हिडिओंमुळे होतेय लाखोंची कमाई

Patil_p