Tarun Bharat

बोटीचे सारथ्य करत राजे मंत्र्यांच्या भेटीला

सातारा विकासाच्या मुद्यावर खासदार उदयनराजे व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा

वार्ताहर / कास

खासदार उदयनराजे यांनी सातारा शहराच्या विविध विकासकामाच्या अनुषंगाने बुधवारी चक्क नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावी बोटीतून स्वतः सारथ्य करत भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती तर सातारा शहरातील विकास कामाच्या अनुषंगाने होती अशी माहिती मंत्री शिंदे यांनी दिली. दरम्यान, ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार उदयनराजे यांनी मला फक्त तराफ्याचं स्टेरिंग योग्य वाटतं, ज्यांच्याकडे राज्याचे स्टेरिंग आहे त्यांना विचारा असा टोला त्यांनी नाव न घेता शरद पवारांना लावला.

दरे येथे भेटीवेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, नगरसेवक ऍड. दत्ता बनकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खासदार उदयनराजे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये विविध मुद्यावर खल झाला.

भेटीनंतर पत्रकाराना माहिती देताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खासदार उदयनराजे आणि माझी भेट झाली. परंतु ही भेट विकासकामाच्या संदर्भात होती. सातारा नगरपालिका प्रशासकीय भवन असेल, हद्दवाढ झालेल्या भागाची विकास कामे असतील, किल्ले अजिंक्यतारा आसपास जे लोकवस्ती आहे. त्या वस्तीवर दरडी कोसळू नये यासाठी रिटनिंग वॉल असेल यासंदर्भात चर्चा झाली आणि आताच नाही तर मुंबई, ठाण्यात आमची अनेकवेळा भेट झाली आहे. विकास कामाच्यामध्ये ते नेहमी आग्रही असतात. मी देखील नगरविकास विभागाच्या माध्यमातून जे जे काही करता येणं शक्य आहे ते करत असतो त्यामुळे आजची भेट ही विकासासाठी होती.

ओबीसी आणि मराठा आरक्षणावर सरकार प्रयत्नशील

पुढे मंत्री शिंदे म्हणाले, सरकारची आणि आमची भूमिका पहिल्यापासून पॉझिटिव्ही राहिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब झाल्यापासून मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका शिवसेना पक्षाची राहिली आहे. त्यावेळी जे जे काय निर्णय घ्यायचे ते तातडीने घ्यायची अशी शिवसेनेची भूमिका होती. आता मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरे आहेत त्यामुळे जी काय लढाई आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे त्यासाठी नवीन आयोग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमलेला आहे त्याच ही काम सुरू आहे. आज जी पन्नास टक्केच्या वर जी अट टाकली आहे तो मुद्दा तांत्रिक आणि अडचणींचा आहे त्यावर राज्य सरकार सकारात्मक भूमिकेत आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा भूमीकेत आहे. राज्य आणि केंद्र सरकारचे एकमत असणे आवश्यक आहे. आम्ही सर्वजण मराठा समाजाच्या पाठीशी आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाच्या खंबीरपणे मागे आहोत. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत मराठा समाजाचे फायदे आहेत, विद्यार्थ्यांना, तरुणांना मिळाले पाहिजेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, राजश्री शाहू महाराज प्रतिपूर्ती योजना, होस्टेल योजना या सगळ्या योजनाच्या माध्यमातून राज्य सरकार मोठी पाऊले उचलत आहे. वंचित मराठा तरुण आहे त्यांना बिनव्याजी कर्ज आहे, अनेक योजना इतर समाजाला मिळतात त्या मराठा समाजाला मिळाल्या पाहिजे यासाठी राज्य सरकार निर्णय घेत आहे.

मराठा आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही

ओबीसी आणि मराठा सगळे आपले समाजबांधव आहेत. ओबीसीचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे. त्यामुळे सरकारने फसवणूक केली आहे हा आरोप राजकीय हेतूने करण्यात आलेला आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका शिवसेनेची आणि राज्य सरकारची आहे त्यामुळे ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी जे जे काय करायचं आहे ते करण्यात सरकार म्हणून कुठं कमी पडणार नाही. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झालेल्या आहेत. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते, यामध्ये कोणतं ही राजकीय गणित नाही किंवा वेळ काढूपणा नाही सरकारची प्रामाणिक इच्छा आहे की मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

तराफ्याचे स्टेरिंग राजेंच्या हाती पण रोख पवारांच्याकडे

मंत्री शिंदे यांना भेटायला जाताना स्वतः राजेंनी बोट चालवली. त्यावेळी बोलताना म्हणाले, खऱया अर्थाने लोकांनी विचार केला पाहिजे की निसर्ग किती जपला पाहिजे, निसर्गाच्या समोर आपण सर्व किती छोटे आहोत. निसर्गामुळेच आपल्या सगळ्याचे अस्तित्व आहे. निर्सग जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण आता पहातोय ग्लोबल वॉर्मिंग पहायला मिळत तर वृक्षतोड झाल्यामुळे हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे वृक्ष लागवड झाली पाहिजे. त्यामुळे जे आहे ते जपलं पाहिजे पाणी अडवलं पाहिजे. भूजल पातळी वाढली पाहिजे तरच आपण सगळे आहोत, असे सांगितले. पुढे राज्याच्या निवडणुकांचे स्टेरिंग तुमच्या हातात दिले तर या प्रश्नांवर ते म्हणाले, ज्यांच्या हातात आहे त्यांना विचारा मला सुद्धा कोडं पडलंय स्टेअरिंग कुठं चाललं आहे. त्यांनाच मानलं पाहिजे, खऱया अर्थाने ते कलाकार आहेत. ते कुणाला जमत नाही, अशा शब्दात शरद पवार यांचे नाव न घेता त्यांनी टिप्पणी केली व पुढं आपल्याला हे स्टेरिंग योग्य वाटतं असे त्यांनी सांगितले.

Related Stories

पाडव्यापासून मंदिरे, धार्मिक स्थळे उघडणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Tousif Mujawar

लोकसभेत आज अंमली पदार्थ विधेयकावर चर्चा

Abhijeet Khandekar

पुसेसावळीत बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

datta jadhav

सातारा : नागठाणेत कोरोनाबाधित वृद्धाची आत्महत्या

datta jadhav

सलग आठव्या दिवशी बाधित वाढ 30 च्या खाली

datta jadhav

मोकाट कुत्र्यांचा चिमुरडीवर हल्ला

Patil_p