Tarun Bharat

ब्रह्मज्ञान झालेले नाही, तोपर्यंत स्वधर्माचरण करावे

अध्याय बारावा

भगवंत उद्धवाला सांगत आहेत की, मनातल्या सर्व शंकाकुशंका बाजूला ठेव आणि मला शरण ये कारण त्यातच तुझं सर्वस्वी हित आहे. मी मनातलं सर्व जाणतो म्हणून मला अंतर्यामी म्हणतात. मी सर्वांच्या हृदयात वास करून असतो. आता माझे म्हणजे हृद्यस्थाचे स्वरूप कसे ते तुला सांगतो. ऐक, माणसाचा नाम, रूप किंवा गुण यांच्याशी मायेमुळे संबंध येतो. तेव्हा या गोष्टी सोडून जी शक्ती स्फुरणरूप होत असते, ती शक्ती म्हणजे माझे हृदयस्थाचे स्वरूप होय. अशा रीतीने हृदयस्थाची प्राप्ती झाली की, सर्व प्राणिमात्रांमध्ये पाहताना देवच दिसू लागतो. तेथे उद्धव म्हणून कोणी वेगळा असायला रिकामी जागाच दिसत नाही. त्यावेळी सर्व प्राणिमात्रांमध्ये एक मीच भरलेला दिसतो. हे निश्चयाने खात्रीपूर्वक लक्षात ठेव. डोळय़ांनी अनेक लोक पाहिले असताही त्या सर्वांत मीच एकाएकी दिसत असतो. अशा प्रकारे तू हृदयस्थाशी ऐक्मयता पावलास, म्हणजे मग मद्रूप होऊन मला पावशील. उद्धवा! अशी माझी प्राप्ती अगदी निर्भयपणाची आणि अढळ आहे. अशी गुह्य गोष्ट सांगून देव उद्धवाची पाठ थोपटू लागले, तेव्हा त्यानेही देवाच्या पायांना मिठी घातली. भगवंत त्याला वर उठवू लागले तरी तो उठेना. तो देवांना म्हणाला, “तू जी आपली गुप्त गोष्ट सांगितलीस, ती सहजच मला मान्य झाली. आता एका गोष्टीबद्दल मात्र मला संशय वाटतो म्हणून ते तेवढे मी तुला विचारतो. स्वधर्मानुसार मी कर्म करावे की, सर्व सोडून तुला शरण यावे याबाबत माझे मन गोंधळून गेले आहे. श्रीकृष्णा ! वेदांचे आणि शास्त्रांचे मंथन करून काढलेले सार किंवा योगरूप किल्यातील भांडार किंवा रसाळ सुखाचा भरलेला सुखसमुद्रच खरोखर तू मला उपदेश करून सांगितलास. तू योग्यांचा योगेश्वर आहेस. तू सर्व जगाचा ईश्वर आहेस. तुझे भाषण सत्यच असणार पण मला मात्र ते संशयास्पद वाटते. तूच मोठय़ा कळकळीने प्रथम सांगितलेस की, स्वधर्माचरण करावे. आणि तेच तुझे भाषण खरे मानून मी त्याच्यावरच सर्वस्वी विश्वास ठेवला. स्वधर्माचरण करणे हेच  माझे भजन होय असे सांगितलेस आणि आता अखेरीला तेही सोडून देऊन तुला शरण यावे म्हणतोस ! हे थोडंसं विसंगत वाटतं. प्रत्येकाच्या शरीरात तू आत्मरूपाने वास करतोस मग आत्मा हा कर्ता आहे की अकर्ता आहे हेच खरोखर कळत नाही. आम्ही कर्म करावे की सोडून द्यावे ? श्रीकृष्णा, तुझ्या उपदेशाची तऱहाच काहीशी गोंधळात टाकणारी आहे. त्यामुळे आम्हा दुबळय़ांच्या मनामध्ये संशय मात्र वाढत जातो. श्रीकृष्णा ! आता करावे तरी काय ? आत्मा जर अकर्ता असेल, तर कर्माचा कर्ता तरी कोण ? आणि आत्म्याकडेच जर अकर्तव्यता येईल तर त्याग घडणे मुळीं संभवतच नाही. हा उद्ध्वाचा प्रश्न ऐकून कमलनयन, घनश्याम श्रीकृष्ण हासून काय म्हणाले ते नीट समजून घेऊयात. भगवंत म्हणाले, बाबा उद्धवा ! ऐक. मी मायेच्या स्वभावाला अनुसरून जीवदशेला आलेलो आहे. म्हणून सर्वसामान्य माणसाचा आत्मा कर्ता आहे असा समज होतो. एक उदाहरण देतो. पाण्यामध्ये सूर्य प्रतिबिंबित झाला आणि ते पाणी हालू लागले, म्हणजे त्यामुळे त्यातील सूर्यच हालतो असे दिसते. प्रत्यक्षात सूर्य हालत नसतो, त्याप्रमाणे मी अकर्ता असतानाही जीवाच्या अहंताधर्माने मी कर्ता असल्याप्रमाणे दिसतो. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये राजा भिकारी बनतो, त्याचप्रमाणे प्रकृतीमुळेच मला जीवपणा असल्याचा भास होतो हे लक्षात ठेव. वस्तुतः तो स्वतः राजा असतो. पण स्वप्नामध्ये भिकारी झालेला राजा कोरडय़ा अन्नाची भीक मागतो. त्या वेळी जो कोणी मूठभर दाणे देतो, त्याची तो आपण होऊन स्तुती करतो की, अरे, तू राजा आहेस बरे!. कारण स्वप्नात त्याला आपण राजा आहोत याची जाणीव नसते. त्याप्रमाणेच जीव किंवा आत्म्यालाही आपण कर्ता आहोत असे वाटत असते. त्यावेळी स्वतःचे स्वरूप त्याच्या ध्यानातच येत नाही. ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेमध्ये राजा भिकाऱयाप्रमाणे सर्व कृती करतो, त्याप्रमाणेच खरोखर अविद्येमुळे मी कर्मकर्ता झालो आहे. अशा अवस्थेमध्ये वेदोक्त विधिविधान जीवावर कोसळते. जोपर्यंत ब्रह्मज्ञान झालेले नाही, तोपर्यंत स्वधर्माचरण करावे

क्रमशः

Related Stories

राजधानी दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 50,863 वर

Tousif Mujawar

व्यवसाय सुलभतेमध्ये आंध्रला सर्वाधिक पसंती

Patil_p

इंदोर पोलिसांची वेबसाइट हॅक

Patil_p

सुशांतसिंहच्या मावसभावावर दिवसाढवळय़ा गोळीबार

Patil_p

रशियन ‘स्पुतनिक-व्ही’ला मंजुरी

Patil_p

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 7 लाखाचा टप्पा

datta jadhav