Tarun Bharat

ब्राझीलही उपान्त्यपूर्व फेरीत दाखल

दक्षिण कोरियाचा 4-1 फरकाने धुव्वा, क्रोएशियाविरुद्ध होणार उपांत्यपूर्व लढत

वृत्तसंस्था/ दोहा 

तब्बल पाच वेळा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या चषकावर नाव कोरणाऱया ब्राझीलने दिमाखदार पद्धतीने उपान्त्यपूर्व फेरी गाठताना दक्षिण कोरियाचा 4-1 असा  धुव्वा उडविला. दोहातील स्टेडियम 974 वर खेळविण्यात आलेल्या या लढतीतील विजयाने आता ब्राझीलचा उपान्त्यपूर्व फेरीत मुकाबला जपानला टायब्रेकरवर 3-1 असे नमविणाऱया क्रोएशियाशी येत्या सोमवारी होईल.

ब्राझील आणि दक्षिण कोरिया यांच्यातील लढत रंगणार असे वाटत होते. मात्र ब्राझीलने पहिल्या सत्रातच सामन्याचा निकाल 4-0 अशा आघाडीने निश्चित केला.  प्रथम विनिसीयस ज्युनियरने सातव्याच मिनिटाला गोल करून ब्राझीलला आघाडीवर नेले. त्यानंतर नेमारने पेनल्टीवर दुसरा गोल करताना आपल्या 76 व्या आंतरराष्ट्रीय गोलाची नोंद केली. त्यानंतर रिचार्लीसन व नंतर लुकास पाक्विटाने लागोपाठ दोन गोल करून ब्राझीलची आघाडी चार गोलानी वाढविली. दक्षिण कोरियाचा एकमेव गोल दुसऱया सत्रात पायक सियाँग हो याने केला.

पहिल्या सत्रात ब्राझीलच्या सांघिक खेळासमोर दक्षिण कोरियाचा संघ निष्प्रभ ठरला. या सामन्यात विश्व फुटबॉलमधील सर्वांत महागडा खेळाडू नेमार खेळला. ब्राझीलचा हा स्टार फुटबॉलपटू सर्बियाविरूद्धच्या लढतीनंतर मागील दोन सामन्यात इंज्युरीमुळे खेळू शकला नव्हता. कालच्या सामन्यात नेमारने आपल्या जुन्या खेळाची झलक दाखविली. 1998 विश्वचषकापासून ब्राझीलने ‘नॉकआऊट’मध्ये कधीच प्रतिस्पर्धी संघावर चार गोल केले नव्हते, ती किमया ब्राझीलने दक्षिण कोरियाविरूद्धच्या लढतीत केली.

ब्राझीलचे प्रशिक्षक तिटे यांनी दक्षिण कोरियाविरूद्धच्या लढतीत कॅमेरुनविरूद्ध खेळलेल्या संघातून 10 बदल केले. पूर्ण तंदुरूस्त झालेल्या डॅनिलो यालाही कालच्या लढतीत संधी देण्यात आली. थियागो सिल्वा व मार्किनोस हे अनुभवी बचावपटूही संघात आल्याने ब्राझीलचा बचाव नेहमीप्रमाणे अभेद्य वाटला.

सामन्याच्या सातव्याच मिनिटाला ब्राझीलने आघाडी घेणारा गोल केला. किम जून सूच्या चुकीच्या फायदा घेत राफिन्हाने मोकळय़ा असलेल्या विनिसीयस ज्युनियरकडे चेंडू सोपविला. ज्युनियरने क्षणाचाही विलंब न करता चेंडू गोलमध्ये टोलवून ब्राझीलच्या पहिल्या गोलाची नोंद केली. त्यानंतर लगेच पेनल्टीवर ब्राझीलने आपली आघाडी दोन गोलानी वाढविली. रिचार्लीसनने ‘डी’ कक्षेत अडथळा आणल्याद्दल मिळालेल्या पेनल्टीचे नेमारने गोलमध्ये रूपांतर केले.

या गोलनंतर दक्षिण कोरियाच्या जूंग वू-यंगचा लांब पल्ल्यावरून गोल करण्याचा यत्न ब्राझीलचा गोलरक्षक एलिसनने उत्कृष्ट गोलरक्षण करून उधळून लावला. त्यानंतर तीस मिनिटांच्या आत ब्राझीलने आपला तिसरा गोल केला. रिचार्लीसन, मार्कीन्होस व सिल्वा यांनी संयुक्तपणे रचलेल्या चालीवर रिचार्लीसनने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला भेदले आणि गोलची नोंद केली.

लुकास पाक्विटाने मध्यंतरापूर्वी ब्राझीलच्या चौथ्या गोलाची नोंद केली. त्याने हा गोल विनिसीयस ज्युनियरने दिलेल्या पासवर केला. दुसऱया सत्रातही ब्राझीलला पाचवा गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र यावेळी राफिन्हाची गोल करण्याची संधी प्रतिस्पर्धी गोलरक्षकाने उधळून लावली. दुसऱया सत्रात चांगला खेळ करणाऱया दक्षिण कोरियाच्या संघाने गोल करण्याच्या संधीही निर्माण केल्या. अशाच एका आक्रमणावर त्यानी गोलही केला. पायकने मारलेला फटका बचावपटू सिल्वाला लागून गोलरक्षक एलिसनला भेदून गेला.

पेले यांना मानवंदना

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून नेमारने सामना संपल्यानंतर पेले यांचे छायाचित्र असलेला फलक मैदानावर दाखवत त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्याची सद्भावना व्यक्त केली. त्याच्या मागे उभे राहत नेमारच्या इतर संघसहकाऱयांनीही त्याला साथ दिली. स्टेडियममध्येही चाहत्यांनी पेले  यांच्या नावाचा घोष करीत त्यांना पाठिंबा दिला. पेले यांना श्वसनाचा त्रास होत असून कोव्हिडमुळे त्यांच्या समस्येत भर पडली आहे. पण त्यांच्या तब्येतील सुधारणा होत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.

Related Stories

पाकचा दक्षिण आफ्रिका दौरा एप्रिलमध्ये

Patil_p

पहिल्या कसोटीत इंग्लंड विजयाच्या उंबरठय़ावर

Patil_p

भारतीय महिला संघाची विजयी सलामी

Patil_p

तेजस्विन शंकरला सुवर्णपदक

Patil_p

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बिगुल वाजला

Amit Kulkarni

स्वायटेक-बेन्सिक अंतिम लढत

Patil_p