Tarun Bharat

ब्रिटनची रॅडुकानू बनली नवी टेनिस युवराज्ञी

Advertisements

अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम – पात्रता फेरीपासून थेट जेतेपदापर्यंत धडक, फर्नांडेझ उपविजेती

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

ब्रिटनची 18 वर्षीय युवा टेनिसपटू एम्मा रॅडुकानू ही महिला टेनिसमधील नवी युवराज्ञी बनली असून तिने अभूतपूर्व व स्वप्नवत कामगिरी करीत येथे झालेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत तिने कॅनडाची टीनेजर लैला फर्नांडेझचा पराभव केला.

या स्पर्धेतील एम्माची कामगिरी आश्चर्यकारक अशीच झाली. येथे उतरण्याआधी ती महिलांच्या जागतिक क्रमवारीत 150 व्या स्थानावर होती आणि  ग्रँडस्लॅम स्पर्धेत फक्त एकच सामना तिने खेळला होता. पात्रता फेरीतून तिने सुरुवात केली आणि अनेकांना पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत धडक मारली आणि जेतेपदही पटकावत, असा पराक्रम करणारी पहिली टेनिसपटू बनली. तिने फर्नांडेझवर 6-4, 6-3 अशा सरळ सेट्सनी मात करीत पहिले ग्रँडस्लॅम यश मिळविले. ‘महिला टेनिसचे भवितव्य आणि खोलीची जाणीव या स्पर्धेतून झाली आहे. या स्पर्धेच्या एकेरीत खेळलेल्या प्रत्येक खेळाडूंत कोणतीही स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे,’ असे रॅडुकानू नंतर म्हणाली. येथील फ्लशिंग मेडोजवर तिने सलग दहा सामने जिंकण्याचा पराक्रम केला. त्यातील तीन पात्र फेरीतील आणि सात सामने मुख्य स्पर्धेतील आहेत. 2014 मध्ये सेरेना विल्यम्सने या स्पर्धेत एकही सेट न गमविता जेतेपद पटकावले होते. या पराक्रमाची पुनरावृत्तीही रॅडुकानूने यावेळी केली. विल्यम्सनंतर (17) दोन टीनेजर खेळाडू अंतिम फेरीत खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. 1999 मध्ये सेरेनाने 18 वर्षीय मार्टिना हिंगीसचा पराभव केला होता. 1968 मध्ये या स्पर्धेचे खुले व्यावसायिक स्वरूप सुरू झाल्यानंतर दोन बिगरमानांकित खेळाडूंत अंतिम लढत होण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे. ‘मी पुन्हा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी निश्चितच येईन, पण त्यावेळी माझ्या हातात योग्य ट्रॉफी असेल,’ असे म्हणताना उपविजेत्या फर्नांडेझच्या डोळय़ांतून अश्रू ओघळत होते.

दुसऱया सेटमध्ये रॅडुकानूनने ब्रेक मिळवित 4-2 अशी आघाडी घेतली आणि 5-2 वर सर्व्हिस राखली. दोनदा ती विजयी गुणांपर्यंत पोहोचली होती. पण फर्नांडेझने निर्माण केलेल्या दडपणामुळे दोन्ही ग्राऊंडस्ट्रोक्स तिने नेटमध्ये मारले. ती जबरदस्त प्रतिस्पर्धी असल्याचे रॅडुकानू म्हणाली. यापूर्वी तीन वर्षांआधी विम्बल्डनमध्ये कनिष्ठ विभागात खेळताना दोघींची पहिल्यांदा गाठ पडली होती. 5-3 वर रॅडकानू सर्व्हिस करीत असताना परतीचा फटका मारतेवेळी ती कोर्टवर घसरली आणि तिच्या गुडघ्याला खरचटल्याने रक्त येऊ लागले. ट्रेनरने त्या जखमेवर उपचार करून बँडेज बांधले. खेळ सुरू झाल्यानंतर रॅडुकानूने दोन बेकपॉईंट वाचवले आणि तिसऱयावर बिनतोड सर्व्हिस करीत सामना संपवला.

ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी रॅडुकानू ही 1977 नंतरची पहिली ब्रिटिश महिला आहे. 1977 मध्ये व्हर्जिनिया वेडने विम्बल्डनचे जेतेपद पटकावले होते आणि ती शनिवारी ऑर्थर ऍश स्टँड्समध्ये उपस्थितही होती. 2004 मध्ये 17 वर्षीय मारिया शरापोव्हाने विम्बल्डन स्पर्धा जिंकून ग्रँडस्लॅम जिंकणारी ती सर्वात तरुण महिला खेळाडू बनली होती. त्यानंतर रॅडुकानूने हा पराक्रम केला आहे. फर्नांडेझने जरी ही स्पर्धा जिंकली असती तरी तिलादेखील हा मान मिळाला असता.

फर्नांडेझनेही या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली असून अंतिम फेरी गाठताना तिने चार मानांकित खेळाडूंना नमविले. त्यात नाओमी ओसाका, 2016 ची चॅम्पियन अँजेलिक केर्बर, द्वितीय मानांकित आर्यना साबालेन्का, पाचवी मानांकित एलिना स्विटोलिना यांचा समावेश आहे. रॅडुकानूने याआधी विम्बल्डन स्पर्धेत चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. पण श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तिने चौथ्या फेरीतून माघार घेतली होती.

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत जोकोविचचा मुकाबला रशियाच्या मेदवेदेव्हशी होणार आहे. जोकोविचने व्हेरेव्हला तर मेदवेदेव्हने 12 व्या मानांकित फेलिक्स ऑगर ऍलियासेमीला 6-4, 7-5, 6-2 असे हरवून अंतिम फेरी गाठली.

मिश्र दुहेरीत सॅलिसबरी-क्रॉझिक विजेते

 मिश्र दुहेरीत जो सॅलिसबरी व डिजायरी क्रॉझिक या दुसऱया मानांकित जोडीने जेतेपद पटकावताना अंतिम लढतीत अर्जेन्टिनाचा मार्सेलो ऍरेव्हालो व मेक्सिकोची गुलियाना ओल्मॉस  यांचा 7-5, 6-2 असा पराभव केला. ब्रिटनच्या सॅलिसबरीचे हे दोन दिवसातील दुसरे यश आहे. याआधी शुक्रवारी त्याने पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या राजीव रामसमवेत जेतेपद पटकावले होते. मिश्र दुहेरीतील क्रॉझिकचे हे या वर्षातील तिसरे जेतेपद आहे तर सॅलिबरी-क्रॉझिक यांचे या वर्षातील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. याआधी त्यांनी प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतही जेतेपद पटकावले होते. एकाच वर्षात अमेरिकन ओपन स्पर्धेतील पुरुष व मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावणारा सॅलिसबरी हा 2010 नंतरचा दुसरा खेळाडू आहे. 2010 मध्ये बॉब ब्रायनने हा पराक्रम केला होता. क्रॉझिकचे मात्र हे वर्षातील तिसरे जेतेपद आहे. तिने नील स्कुपस्कीसमवेत विम्बल्डन स्पर्धाही जिंकली होती. यापूर्वी 2015 मध्ये भारताचा लियांडर पेस व स्विर्त्झंडची मार्टिना हिंगीस यांनी वर्षात मिश्र दुहेरीची तीन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली होती.

Related Stories

ॲड. सदावर्तेंना सातारा जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर

datta jadhav

भारतीय महिला डॉक्टरला अमेरिकेत कडक सॅल्यूट!

prashant_c

छ.शिवरायांच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा विचाराने राजकारभार करावा : आ. चंद्रकांतदादा पाटील

Abhijeet Khandekar

आयसीसी क्रिकेट समिती अध्यक्षपदी सौरभ गांगुली

Patil_p

भिवंडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 39 वर; बचावकार्य सुरु

Tousif Mujawar

केएल राहुल, कुलदीप यादव मालिकेतून बाहेर

Patil_p
error: Content is protected !!