आठवडय़ात 5 दिवस शाकाहारी, 2 दिवस मांसाहारी
घरात तयार अन्नाचे ग्रहण करण्याला प्राधान्य
ब्रिटनमध्ये सध्या आहाराचा नवा ट्रेंड सुरू झाला असून याला ‘5ः2 डायट’ नाव देण्यात आले आहे. म्हणजेच आठवडय़ात 5 दिवस शाकाहारी (पर्यावरणाला नुकसान न पोहोचविणारे) जेवण आणि दोन दिवस मांसाहार असा हा कार्यक्रम आहे. ब्रिटिश लोक आता पाकिटबंदऐवजी घरात तयार खाद्यपदार्थ खाणे पसंत करत आहेत.
हा खुलासा ब्रिटिशांच्या बदललेल्या आहारावर सुपरमार्केट स्टोअर वेटरोजकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या फूड अँड ड्रिंक अहवालात करण्यात आला आहे. मागील वर्षभरात आहारात आलेला बदल पडताळत या अहवालात बाहेर खाण्याचे शौकीन बिटिश कोरोनामुळे दीर्घ काळापर्यंत घरात राहिल्याचे म्हटले गेले आहे. याचमुळे घरातच उत्तम खाद्यपदार्थ तयार करण्याचा आनंद ते घेत होते. लोकांनी आता स्वतःच्या पसंतीचे सँडविच मागविणेही बंद केले आहे.


घरातच छोटय़ा-मोठय़ा पाटर्य़ा
बाहेर खाण्यासाठी जाण्याऐवजी आता घरातच छोटय़ा-मोठय़ा पाटर्य़ा आयोजित करण्याचा प्रकार वाढला आहे. याचमुळे शॅम्पेनची विक्री मागील वर्षाच्या तुलनेत 40 टक्क्यांनी वाढली आहे. टिकटॉक आणि इन्स्टाग्राम यासारख्या प्लॅटफॉर्म्सने लोकांना घरात तयार खाद्यपदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. घरातच पास्ता चिप्स तयार करण्याच्या टिकटॉक ट्रेंडने एअरफ्रायर्सची विक्री 400 टक्क्यांपर्यंत वाढविली आहे. फूड डिलिव्हरी ऍपद्वारेही लोक घरातच तयार करता येतील अशा गोष्टी मागवू लागले आहेत. कुकिंग टिप्ससाठी टिकटॉक आणि युटय़ूबची मदत घेतली जात आहे.
आरोग्यदायी आहार
ऑनलाईन सर्चिंगदरम्यानही लोक आरोग्यदायी खाद्यपदार्थांचा शोध घेत आहेत. वेटरोजच्या संकेतस्थळावर बारबेक्यूवर तयार टरबूजांच्या खाद्यपदार्थांच्या सर्चिंगमध्ये 65 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. तर नाइकरबॉकर ग्लोरी (आईस्क्रीम) च्या सर्चिंगमध्ये 171 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. तर जपानी डिश सुशीच्या विक्रीत 54 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर भाज्या आणि मसाल्यांच्या विक्रीत 41 टक्क्यांची भर पडली आहे. तर स्टोअरमधील रेडिमेड उत्पादनांची मागणी कमी झाली आहे. यात सँडचिव आणि सॉस यासारखी रेडी टू ईट उत्पादने सामील आहेत.