Tarun Bharat

ब्रॅडमन यांच्या पहिल्या कसोटी कॅपचा लिलाव

दुसऱया क्रमांकाच्या विक्रमी किमतीस विक्री

वृत्तसंस्था/ सिडनी

ऑस्ट्रेलियाचे माजी महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या पदार्पणाच्या कसोटीतील बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव झाला असून ऑस्ट्रेलियातील एका उद्योगपतीने त्यांची कॅप 450,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सला (340,000 अमेरिकन डॉलर्स) घेतली आहे. क्रिकेटमधील स्मृतिचिन्हांच्या लिलावात मिळालेली ही दुसऱया क्रमांकाची सर्वोच्च किंमत आहे.

रोड मायक्रोफोन्सचे संस्थापक पीटर फ्रीडमन यांनी ही कॅप खरेदी केली असून याआधी त्यांनी निर्वाणचे प्रमुख कर्ट कोबेन यांच्या गिटारला लिलावात 9 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सला (6.8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) खरेदी केले होते. ब्रॅडमन यांच्या पहिल्या कॅपचे ऑस्ट्रेलियातील विविध ठिकाणी प्रदर्शन घडविण्याची त्यांची योजना आहे. ब्रॅडमन यांच्या 1928 मधील कॅपला मिळालेली ही किंमत दुसऱया क्रमांकाची मोठी किंमत असून यावर्षाच्या सुरुवातीस झालेल्या लिलावात शेन वॉर्नच्या कसोटी कॅपला 1,007,500 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (760,000 अमेरिकन डॉलर्स) अशी विश्वविक्रमी सर्वोच्च किंमत मिळाली होती, असे लिलाव अधिकाऱयांनी सांगितले.

सर डॉन ब्रॅडमन यांनी ऑस्ट्रेलियातर्फे 1928 ते 1948 या वीस वर्षाच्या कालावधीत 52 कसोटी खेळल्या असून त्यांना आजवरचे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू मानले जाते. कसोटीमध्ये त्यांची 99.94 धावांची सरासरी आजवर कोणालाही गाठता आलेली नाही. क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्यांना 1949 मध्ये नाईटहूड किताबाने सन्मानित करण्यात आले होते. ‘ते ऑस्ट्रेलियाचे एक महान क्रिकेटपटू आहेत,’ असे फ्रीडमन म्हणाले. नोव्हेंबर 1928 मध्ये ब्रिस्बेनमधील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीवेळी त्यांना ही बॅगी ग्रीन कॅप देण्यात आली होती. नंतर 1959 मध्ये त्यांनी ती पीटर डनहॅम या फॅमिली प्रेंडला भेट दिली होती. ऍडलेडमध्ये ब्रॅडमन यांच्या शेजारीच ते राहत होते. मात्र यावर्षीच त्यांना आर्थिक फसवणुकीच्या कारणास्तव 8 वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यांची इस्टेट दिवाळखोरीत निघाल्याने गुंतवणूकदारांची कर्जफेड करण्यासाठी ब्रॅडमन यांच्या कॅपचा ट्रस्टीच्या सूचनांनुसार लिलाव करण्यात आला.

Related Stories

सानिया मिर्झा उपांत्य फेरीत पराभूत

Patil_p

नेतृत्व विभागणीची संकल्पना आपल्या संस्कृतीत बसत नाही

Patil_p

उरूग्वेला हरवून कोलंबिया उपांत्य फेरीत

Patil_p

सिंधुचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त

Patil_p

दक्षिण आफ्रिकेकडून आयर्लंडचा ‘व्हाईटवॉश’

Patil_p

सेरेना विल्यम्सचे निवृत्तीचे स्पष्ट संकेत

Patil_p