Tarun Bharat

भंडारी समाज केंद्रीय समितीला तीन वर्षांची मुदतवाढ

आमसभेत निर्णय : बदनामी करणाऱयांवर मानहानीचा दावा ठोकणार

प्रतिनिधी /फोंडा

गोमंतक भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्यासह सतराजणांच्या कार्यकारिणीला पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. काल रविवारी सकाळी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय समितीवर खोटे आरोप करुन जाहीर बदनामी केल्याप्रकरणी ऍड. आतिष मांद्रेकर यांच्यासह 27 जणांवर मानहानीचा दावा ठोकरणार असल्याची माहिती आमसभेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अशोक नाईक यांनी दिली.

भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीची सर्वसाधारण सभा अशोक नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली. शांतीनगर फोंडा येथील रुक्मिणी सभागृहात झालेल्या या आमसभेत हजारभर सभासद ऑनलाईन माध्यमातून जोडले गेल्याची माहिती त्यांनी दिली. सध्याची केंद्रीय समिती समाजाच्या विविध प्रश्नांवर उत्तम पद्धतीने कार्य करीत आहे. समाजाशी संबंधीत प्रलंबित खटले, हिशेब व अन्य विषय मार्गी लावण्यासाठी विद्यमान कार्यकारिणीलाच पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय आमसभेत मंजूर झाल्याचे अशोक नाईक यांनी सांगितले. अध्यक्ष अशोक नाईक यांच्यासह सतरा पदाधिकाऱयांचा त्यात समावेश आहे.

चालू वर्षाचा जमाखर्च व हिशेब तसेच प्रगती संकुलासंबंधी हिशेबाला आमसभेत मान्यता देण्यात आली. आगामी काळात होऊ घातलेल्या केंद्रीय समितीच्या निवडणुकीवरही चर्चा करण्यात आली. ऍड. आतिष मांद्रेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय समितीवर केलेल्या सर्व जाहीर आरोपांची उत्तरे देण्यात आली आहेत.  शिवाय रु. 9 लाखांची अफरातफर झाल्याच्या आरोपाचे खंडन करुन त्यासंबंधी सविस्तर उत्तर आमसभेत देण्यात आल्याचे अशोक नाईक यांनी सांगितले.

 27 जणांवर मानहानीचा दावा ठोकणार

ऍड. आतिष मांद्रेकर यांनी केंद्रीय समितीवर जे खोटे आरोप करुन पोलीस तक्रार दाखल केली होती, त्यामुळे समाजाची बदनामी व केंद्रीय समितीची मानहानी झाली आहे. केंद्रीय समितीविषयी त्यांच्या तक्रारी असल्यास त्यांनी त्या आमसभेत किंवा समाजाच्या कार्यालयता मांडायला हव्या होत्या. त्यांचे हे कृत्य निषेधार्ह असून ऍड. मांद्रेकर यांच्यासह 27 जणांविरुद्ध न्यायालयात मानहानीचा दावा ठोकरणार असल्याचे अशोक नाईक यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय समितीचे उपाध्यक्ष देवानंद नाईक, सरचिटणिस फक्रू पणजीकर, खजिनदार जोगुसो नाईक, सचिव कृष्णनाथ गोवेकर, सहखजिनदार सुनिल नाईक व एकनाथ नाईक तारी हे उपस्थित होते.

Related Stories

प्रत्येक मतदारसंघात पुरवणार वायफाय

Amit Kulkarni

सावर्डे जंक्शनवर पंचायतीतर्फे दिशादर्शक फलकाची सोय

Amit Kulkarni

किनारी भागातील युवा पिढी फुटबॉल खेळाकडे वळते ही चांगली बाब

Amit Kulkarni

रुग्णवाहिका उपलब्ध करूनही परवानगीविना पडून

Amit Kulkarni

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या नियमात होणार बदल

Patil_p

शेळ मेळावली आयआयटी प्रकल्पासंदर्भात सविस्तरपणे माहिती द्या.

Omkar B