Tarun Bharat

भगतसिंग कोश्यारी राज्यपालपदी शपथबद्ध

प्रतिनिधी / पणजी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल बुधवारी सायंकाळी गोवा राजभवनवर झालेल्या छोटेखानी समारंभात गोव्याच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपंकर दत्त यांनी नवे राज्यपाल कोश्यारी यांना गुप्ततेची व अधिकारपदाची शपथ दिली. गोवा पोलिसांकडून राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.

 या प्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, तसेच मंत्रिमंडळातील इतर सदस्य, राज्याचे मुख्य सचिव तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. मात्र विरोधी पक्षनेते दिगंबर कामत उपस्थित होते. राज्यपालांनी कोकणीतून शपथग्रहण केल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तत्पूर्वी दुपारी राज्यपाल कोश्यारी यांचे मुंबईतून दाबोळी विमानतळावर आगमन झाले. तेथून ते थेट राजभवनवर गेले. राजभवनवर शपथविधी सोहळय़ानंतर राज्यपालांनी पोलीस दलाकडून मानवंदना स्वीकारली. कोश्यारी हे गोव्याचे अतिरिक्त राज्यपालपदाचा कारभार सांभाळणार आहेत. मागाहून गोव्याला पूर्णवेळ काम पहाणारे राज्यपाल दिले जाणार आहेत.

 शपथविधीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, महसूल मंत्री श्रीमती जेनिफर मोन्सेरात, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, सभापती राजेश पाटणेकर, भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, दामू नाईक, मुख्य सचिव परिमल राय, डीजीपी मुकेश कुमार मीना, आयपीएस तसेच विविध विभागांचे सचिव आणि वरि÷ सरकारी अधिकारी उपस्थित होते.

उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपद भूषविले

सार्वजनिक सेवेचा अफाट आणि वैविध्यपूर्ण अनुभव असणारे भगतसिंग कोश्यारी 5 सप्टेंबर 2019 पासून महाराष्ट्रचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. त्यांचा जन्म 17 जून 1942 रोजी उत्तराखंडातील बागेश्वर जिह्यातील पालनधुराचे ताबगड येथे झाला. 1997 साली उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. उत्तराखंड राज्य स्थापन झाल्यानंतर ऊर्जा, जलसिंचन, कायदा आणि विधीमंडळ कामकाजमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.  कोश्यारी यांना अध्यापनाची आवड होती आणि त्यांनी काही वर्षे व्याख्याता म्हणून काम केले आहे. 2001-02 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून ही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

अनेक विषयांवर सादर केले अहवाल

नोव्हेंबर 2008 मध्ये ते उत्तराखंडमधून राज्यसभेत निवडून आले होते आणि 2014 पर्यंत ते त्या पदावर होते. राज्य सभेच्या याचिकेवरील समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी ‘वन रँक वन पेन्शन’, हिमालय राज्यातील रेल्वे नेटवर्क आणि या व्यतिरिक्त इतर अनेक महत्वाच्या सामाजिक मुद्यांविषयी त्यांनी अहवाल सादर केले आहेत. उत्तराखंडचे ऊर्जामंत्री असतानाच्या काळात त्यांनी तेहरी धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. भगतसिंग कोश्यारी संपूर्ण उत्तराखंड राज्यात लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘उत्तरांचल प्रदेश क्मयू?’ व ‘उत्तरांचल संघर्ष एवं समाधान’ अशी दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत.

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक दिल्लीकडे रवाना

मावळते राज्यपाल सत्यपाल मलिक बुधवारी दुपारी येथून वायूदलाच्या विमानाने दिल्लीला निघाले. लवकरच ते मेघालयाच्या राज्यपालपदाचा ताबा घेणार आहेत. तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, आणि मंत्री माविन गुदिन्हो तसेच मुख्य सचिवांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निरोप दिला. विमानतळावर पोहोचताच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन त्यांना वाकून नमस्कार केला. सत्यपाल मलिक यांना गोव्यातून दुसऱया राज्यात पाठविल्याने संपूर्ण गोव्यातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे. समाजमाध्यमातून जनतेने सावंत सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Related Stories

अग्निशामक दलामुळे सरकारचे बुडणार 13 कोटी?

Patil_p

इफ्फीः इटालियन सिनेमॅटोग्राफर व्हिट टोरिओ स्टोरारो यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार

Amit Kulkarni

गारठू लागला गोवा

Amit Kulkarni

पुराचा तडाखा बसलेल्या पारोडा पुलाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Patil_p

मेळावली वनसंपदेच्या रक्षणासाठी उद्या महिलांचे रक्षाबंधन

Omkar B

धारगळ साईबाबा मंदिरात उद्या वर्धापनदिन महोत्सव

Amit Kulkarni
error: Content is protected !!