Tarun Bharat

भरधाव रेल्वेची अल्टरनेट पुली उडून महिला जखमी!

Advertisements

प्रतिनिधी/ चिपळूण

  कोकण रेल्वेच्या चिपळूण स्थानकात मुंबईच्या दिशेने भरधाव चाललेल्या कोचिवली-जामनगर एक्प्रेसची अल्टरनेट पुली उडून प्लॅटफॉम  क्रमांक दोनवर साफसफाई करणाऱया महिला कर्मचाऱयाला लागली. यामध्ये महिला कर्मचाऱयाच्या पायाला दुखापत झाली. बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेत प्लॅटफॉर्मवर फारशी गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मुख्य म्हणजे या घटनेकडे प्रशासनाने फारसे गांभिर्याने पाहिले नसल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

  कोचिवली-जामनगर एक्प्रेस मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी सकाळी 11.30 च्या सुमारास चिपळूण स्थानकात आली. यावेळी एसी बोगीच्या खालच्या बाजूस असलेली अल्टरनेट पुली बेल्ट तुटून अत्यंत वेगाने सुमारे 20 फुट अंतरावर असलेल्या दोन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने उडाली. काय होतेय हे समजण्याच्या आतच अत्यंत वेगाने उडालेली ही लोखंडी पुली स्थानकावर साफसफाई करीत असलेल्या रजनी कदम या रेल्वे कर्मचारी महिलेला लागली. धातुच्या पुलीचा अचानकपणे जोरदार तडाखा बसल्याने रजनी विव्हळू लागल्या. प्रारंभी अचानक काय झाले हे अनेकांच्या लक्षातच आले नाही. मदतीसाठी पुढे आलेल्या प्रवाशांना रजनी यांच्या जवळच पडलेली धातुची वस्तू दिसली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रूग्णालयात नेण्यात आले.

  उडालेली पुली ही सुमारे 20 किलो वजनाची असल्याचे सांगितले जात आहे. ही पुली प्लॅटफॉमवर वेगाने आली त्यावेळी प्रवाशांची गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला. पूली उडाल्यानंतर गाडी त्याच वेगाने पुढे निघून गेली. प्लॅटफॉर्मवर पडलेली पुली उचलायची की तशीच ठेवायची इथपासून या प्रकाराची माहिती पुढील स्थानकात देऊन रेल्वेची तपासणी करायची याबाबतही प्रशासनात केवळ संभ्रमाचेच वातावरण दिसून आले.

    काही अधिकारी मंडळींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणालाही याबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही. या प्रकारात रेल्वे कर्मचारीच जखमी झाल्याने फार गंभीर प्रतिक्रिया येणार नाहीत या ‘धोरणा’तून फारशी दखल न घेतल्याची चर्चाही स्थानकावर सुरु होती. चिपळूण येथे घडलेल्या या घटनेची प्रशासनाकडून फारशी दखल घेतली गेली नसल्याचे पुढे येत आहे. सायंकाळी येथील रेल्वेस्थानकात विचारणा केली असता वरिष्ठांकडून माहिती घ्या, माहिती देण्याचे आम्हाला अधिकार नाहीत, असे म्हणत काहीही बोलण्यास असमर्थता व्यक्त करण्यात आली. वरिष्ठांशी संपर्काचा वा माहिती घेण्याचा प्रयत्नही फोल ठरला.

 

तपासणीकडे दुर्लक्ष?

साधारणत: अल्टरनेट पुली, ऍक्सल पुली, व्ही बेल्ट त्यालगतचे रबर पॅड्स यांची सातत्याने तपासणी केली जाणे आवश्यक मानले जाते. पुलींची अलाइनमेंट कॉटन कॉड्स, मेटल बार व लेझर बिमच्या सहाय्याने नियमित तपासणी होणे अपेक्षित आहे. या पुलीचे आयुष्य सामान्यत: 4 वर्षे मानले जाते व तशी तारीख पुलीवर कोरलेली असणेही रेल्वे मानकांमध्ये बंधनकारक करण्यात आले आहे. पुलीची झीज 0.5 मिमिपर्यंत झाल्यास ती बदलणे अनिवार्य करण्यात आले आहे.  याबाबत अत्यत सुस्पष्ट व काटेकोर सूचना देखभाल विभागाला रेल्वे मंडळाकडून देण्यात येतात. या पार्श्वभूमीवर चिपळूण येथे घडलेल्या या घटनेने रेल्वे गाडय़ांच्या देखभाल व दुरूस्तीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तपासामध्ये या बाबी उघड व्हाव्यात अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत.

Related Stories

रत्नागिरी शहरातील एका खासगी हॉस्पिटलमधील 10 जण पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कुलभूषणच्या सुटकेसाठी आई-वडिलांनी घातले कालभैरवला साकडे

Patil_p

राजापुरातील अपघातात कुडाळमधील एकजण ठार

Patil_p

अनलॉकपेक्षा रत्नागिरी जिल्हय़ात 9 जूनपर्यंत कडक निर्बंध

Patil_p

वैभव खेडेकर यांच्यावर कारवाईसाठी 15 दिवसांची डेडलाईन!

Patil_p

कोकण मार्गावर ७ डिसेंबरपासून त्रिवेंद्रम-वेरावल साप्ताहिक धावणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!