Tarun Bharat

भरम आहे लोकाचारी । पहिली नांदणूक नाही घरी ।

व्यवस्थापनशास्त्रात कर्मचाऱयांची किंवा कामगारांची भरती हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असते. योग्य कर्मचाऱयांच्या भरतीवरच उद्योगसमूहाचे यशापयश अवलंबून असते. उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन ती कार्ये कार्यक्षमतेने आणि एकचित्त होऊन करू शकणाऱया कर्मचाऱयांचा, कामगारांचा शोध घेऊन, त्यांच्या वृत्ती/प्रवृत्तींचे अचूक अनुमान करून त्यांना उद्योगसमूहात प्रोत्साहित करण्याची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया म्हणजे ‘भरती’ होय! हे कार्य अतिशय शास्त्रशुद्ध असले पाहिजे. कारण त्यात पर्याप्त संख्येचा विचार करूनच कंपनीकरिता लागणारे कर्मचारी भरले जातात. कर्मचाऱयांच्या भरतीत कार्य स्पष्टीकरण हे महत्त्वाचे आहे. त्यात अनेक बाबींसंबंधात माहिती दिली जाते. त्यासाठी लागणारी कर्मचाऱयांची शारीरिक वैशिष्टय़े, मानसिक वैशिष्टय़े इ. बाबत इत्थंभूत माहिती मिळवली जाते. भरती किंवा बदली आणि योग्य लोकांची नियुक्ती करत असताना निर्माण होणारे प्रश्न, अडचणी याविषयी समर्थांनी दासबोधात विस्तृत वर्णन केलेले आहे. दासबोधातील तिसऱया दशकातील चौथ्या समासात समर्थ म्हणतात की,

कन्या उपवरी जाल्या । पुत्रास नोवऱया आल्या ।

आता उजवण्या केल्या । पाहिजेत की ।

जरी मुले तैसीच राहिली । तरी पुन्हा लोकलाज जाली ।म्हणती कासया व्यालीं । जन्मदारिद्रय़े ।। 03/04-07-08 याचा शब्दशः अर्थ असा की उपवर मुली झाल्या, मुलांना मुली सांगून येऊ लागल्या, आता मुला-मुलींची लग्ने केली पाहिजेत. मुलेमुली लग्नावाचून तशीच राहिली तर लोक नावे ठेवणार आणि जन्मदरिद्री म्हणून हिणवणार.

व्यवस्थापन शास्त्राच्यादृष्टीने विचार केल्यास एखादा उद्योगसमूह किंवा व्यवसाय आपण सुरू केल्यावर त्यात चांगल्या लोकांची साथ महत्त्वाची असते. जसाजसा व्यवसाय वाढीस लागतो, तसेतसे नवनवीन प्रश्न आणि समस्या उभ्या राहतात. यात महत्त्वाची भूमिका असते ती मानव संसाधन व्यवस्थापकाची. जो उत्तम व्यवस्थापक असतो तो कर्मचाऱयांची किंवा कामगारांची योग्यरितीने पारख करूनच भरती करतो. त्यांच्या कामाचा लेखा-जोखा, कामाचे मूल्यांकन आणि कामाचे योग्य विश्लेषण करूनच त्यांची बढती वा बदली करण्याचे ठरवतो.व्यवसायाचा व्याप वाढत असतानाच कुशल कामगारांचे मासिक वेतन, भत्ता किंवा बोनस यावर सकारात्मक परिणाम होत असेल तर व्यवस्थापन उत्तम आहे असे समजावे. पण नकारात्मक परिणाम घडून येत असेल तर व्यवस्थापनात दोष आहे हे नक्की समजावे. कारण समर्थांनी सांगितल्यानुसार ‘तरी पुन्हा लोकलाज जाली’ यानुसार जर एखाद्या आस्थापनेत कर्मचाऱयांना किंवा कामगारांना योग्य वागणूक वा मोबदला मिळत नसेल तर त्या उद्योगसमूहाला जागतिक बाजारपेठेत नामुष्की किंवा अपमान सहन करावा लागतो. त्यातील कर्मचारीवर्ग हा संतुष्ट नसल्याने संप किंवा असहकाराचा मार्ग स्वीकारतो आणि संपूर्ण उद्योगसमूह डबघाईला येण्याची शक्मयता जास्त असते.बऱयाच वेळेला उद्योगसमूहातील व्यवस्थापन हे गतवैभवात आणि त्यांच्या पारंपरिक धोरणात अडकल्याने त्यांना काळासोबत चालता येत नाही. परिणामतः इतर स्पर्धकांच्या तुलनेने ते मागे पडतात आणि त्याचा त्रास किंवा भार संबंधित कर्मचाऱयांना सोसावा लागतो. याविषयी काही ओव्यांमध्येही समर्थ म्हणतात की,

भरम आहे लोकाचारी । पहिली नांदणूक नाही घरी ।दिवसेंदिवस अभ्यांतरी । दरिद्र आले ।। 3/4/5

म्हणजेच लोकांत किंवा समाजात वावरताना आधीच्या श्रीमंतीचा भ्रम असणे. परंतु पूर्वीची सुबत्ता राहिली नाही. त्यामुळे घरी दिवसेंदिवस दारिद्रय़ आले.व्यवस्थापनशास्त्रात अंतर्गत आणि बहिर्गत असे भरतीचे दोन स्रोत आहेत. उद्योगसमूहांना आवश्यक असणाऱया कर्मचाऱयांच्या स्रोतास किंवा भरती प्रक्रियेस पुरवठा स्रोत असे म्हणतात. आपल्या देशात एका बाजूला बेकारीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे तर दुसऱया बाजूला योग्य कर्मचारी मिळत नाहीत. अशा विरोधाभासामुळे दिवसेंदिवस उद्योगसमूहांचे भविष्य अधांतरी आहे.

पदोन्नती आणि पदावनती या अंतर्गत भरतीच्या स्रोतांमुळे उद्योगसमूहांच्या विद्यमान श्रमशक्तीचा अंदाज येऊ शकतो. कनि÷ जागांवरील कर्मचाऱयांना वरि÷ जागांवर नियुक्त करणे म्हणजेच पदोन्नती होय तर वरि÷ पदांवर काम करणाऱया कर्मचाऱयांना वा कामगारांना कनि÷ पदांवर रूजू करणे म्हणजेच पदावनती होय! दोन्ही संज्ञांना आजकालच्या काळात प्रमोशन किंवा डिमोशन असे म्हणतात.

पदोन्नतीच्या अपेक्षेने कामगार किंवा कर्मचारी आपले काम अधिकाधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कंपनीच्या भरभराटीसह आपली पण प्रगती होईल ही भावना असते. त्यामुळे त्यांच्यात नकळतपणे कंपनीविषयी आत्मीयता निर्माण होते. त्यामुळे उत्पादकता वाढते. तसेच वरि÷ पदांवर बाहेरच्या व्यक्तींची नियुक्ती केल्याने निर्माण होणाऱया समस्यासुद्धा सहजरितीने सुटू शकतात. तसेच जे कर्मचारी योग्य रितीने आपल्या जबाबदाऱया पार पाडू शकत नाहीत किंवा ज्यांच्या हलगर्जीपणामुळे कार्यपद्धतीत नकारात्मक बदल होतात अशांची पदावनती करावी लागते. त्यांच्या कार्यशैलीमुळे व्यवस्थापनात अनेक समस्या निर्माण होतात. पदावनती ही अयोग्य कर्मचाऱयांना दिलेली शिक्षा असते. त्यामुळे कधी कधी मध्यस्तरीय व्यवस्थापनाची गरजही भागवली जाते.

अनेक कंपन्यांमध्ये रिक्त जागेवरील नियुक्तीकरिता विद्यमान कर्मचाऱयांना प्राधान्य दिले जाते. विद्यमान कर्मचाऱयांना प्राधान्य दिल्याने त्यांच्या नैतिकतेला प्रोत्साहन मिळते. त्यांना संबंधित आस्थापनेविषयी आपुलकी वाटू लागते. त्यामुळे उपक्रमांच्या गरजा किंवा ध्येयधोरणाबाबत तसेच नियोजनाबाबत एकवाक्मयता निर्माण होते. पदोन्नतीमुळे किंवा पदावनतीमुळे व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने कर्मचाऱयांच्या प्रशिक्षण खर्चात कपात होते आणि कर्मचाऱयांच्या वा कामगारांच्या क्षमतेचे योग्य रितीने मूल्यमापन केले जाते.पदोन्नतीमुळे किंवा पदावनतीचे मूळ हे कर्मचाऱयांच्या अपेक्षेत दडलेले असते. बऱयाच वेळेला काही कर्मचारी हे एककल्ली वृत्तीने वागत असल्याने त्यांच्यातील अहंकार बळावतो आणि त्यांना पदावन्नतीला सामोरे जावे लागते. यालाच व्यवस्थापनात झीज किंवा घर्षण असेही म्हणतात.

Related Stories

‘रेवडी’ संस्कृतीचे यशापयश

Amit Kulkarni

आरमार अवश्यमेव करावे!

Patil_p

सच्चिदानंद स्वरूपाचा प्रभाव

Patil_p

आंदोलन कोणत्या दिशेने जाणार ?

Amit Kulkarni

महसुलाविना राज्य कारभार हाकणे झाले मुश्कील!

Patil_p

दिव्याखाली अंधार

Patil_p