Tarun Bharat

भरून पावलो, धन्य झालो..!

दीड वर्षांनंतर भाविक देवीच्या भेटीला

प्रतिनिधी / कोल्हापूर

गेल्या दीड वर्षांपासून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत होता. नेहमी गजबजणारा परिसर मूक झाला होता. मात्र अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारी मोठ्या भक्तिभावाने उत्साहात सुरुवात झाली आणि अंबाबाई मंदिर परिसर, भवानी मंडप, महाद्वार रोड भाविकांनी गजबजला. कोरोनामुळे `देऊळ बंद’ झाली होती. `भेटी लागे जीवा लागलीसे आस’ अशी अवस्था झालेल्या भाविकांना अखेर आई अंबाबाईचे दर्शन झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी अंबाबाईच्या चरणी माथा टेकून आर्शीवाद घेतले. मंदिर परिसरातील दुकानेही गजबजून गेल्याने त्यांच्या आर्थिक चक्राला चालना मिळाल्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या चेहर्‍यावर आनंदाची लकेर पाहायला मिळाली.

शिवाजी चौकापासून भवानी मंडपाजवळ टाकलेल्या बॅरिकेड्समधून ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांना दर्शनासाठी आत सोडले जात होते. भवानी मंडप येथे पोलीस ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांच्या मोबाईलवरील क्युआर कोड, ईमेल आणि टेक्स्ट मेसेजची पाहणी करून प्रवेश देत होते. सकाळी आणि दुपारच्या सत्रात भाविकांची गर्दी कमी जाणवत असली तरी चैतन्याचे वातावरण होते. पहिल्या दिवशी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

मेडिकल कॅम्प

देवस्थान व्यवस्थापन समिती आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जुना राजवाडा पोलीस स्टेशनजवळ मेडिकल कॅम्प उभारला होता. दर्शनादरम्यान, भाविकांना काही आरोग्याच्या तक्रारी जाणवल्यास पॅम्पमध्ये प्राथमिक स्वरूपाचे उपचार दिले जात होते. दरम्यान, मेडिकल पॅम्पमध्ये ज्यांनी अजूनपर्यंत लस घेतलेली नाही अशांसाठी लसही देण्यात आली. दुपारपर्यंत 55 जणांना लस दिल्याची माहिती रितू सुतार यांनी दिली.
सिम्बाचा वॉच

अंबाबाई दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सुरक्षेसाठी मोक्याच्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. घातपातविरोधी तपासणी पथकामधील `सिम्बा' या श्वानाची करडी नजर राहणार आहे. या पथकात मानसिंग पाटील, विनायक पाटील, रवी पाटील, ओमकार पाटील यांचा समावेश आहे.
फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका सज्ज

कोल्हापूर महानगरपालिकेचा फायर बिग्रेड विभाग आणि रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तात्काळ उपाययोजना करण्यासाठी फायर ब्रिगेडची गाडी आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवली आहे.
फेरीवाले पट्टयाच्या आत

एरव्ही ताराबाई रोड, महाद्वार रोडवरील फेरीवाले रस्त्यावर अतिक्रमण करायचे. त्यामुळे रहदारीस अडथळा व्हायचा. मात्र पोलीस आणि वाहतूक प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे, त्यांनी आखून दिलेल्या पांढर्‍या पट्ट्याच्या आतच फेरीवाल्यांनी स्टॉल उभे केले होते.
अन् हास्य उमटले

गेल्या दीड वर्षांपासून मंदिर परिसरातील फूलविक्रेते, फळविक्रेते, यात्रनिवास, छोटे-मोठे व्यावसायिकांची आर्थिक गणिते बिघडली होती. हातावरच्या पोट असणार्‍यांचा धंदा बसला होता. मात्र नवरात्रोत्सवात मदिरांची दारे उघडली अन् त्यांच्या चेहर्‍यावर हास्य उमटले.

Related Stories

पंचनाम्यातून शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार – पालकमंत्री

Archana Banage

एसटीतील कर्मचारी भरती ठेकेदारामार्फत होणार

Abhijeet Khandekar

गोकुळकडून 83.81 कोटी दूध दरफरक

Archana Banage

स्वदेशीचा वापर करा, चिनी वस्तू हद्दपार करा

Archana Banage

सुप्रिम कोर्टाला माजी न्यायाधीशांनी केले पत्राद्वारे आवाहन

Abhijeet Khandekar

संजय राऊतांनी ४८ तासात माफी मागावी- किरीट सोमय्या

Archana Banage