बेळगाव शहर-शास्त्रीनगरात घुमला समितीचा आवाज : अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समितीला मतदान करण्याचे आवाहन


प्रतिनिधी / बेळगाव
वळिवाच्या पावसाने मंगळवारी बेळगाव शहर व परिसराला झोडपून काढले. परंतु या पावसातही मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचा झंझावाती प्रचार करण्यात आला. पावसात भिजत बेळगाव शहरातील प्रत्येक गल्ल्यांमध्ये जाऊन समितीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. बेळगाव शहरासह शास्त्रीनगर, महाद्वार रोड परिसरात मंगळवारी समितीचा आवाज घुमला.
आपल्या न्याय व हक्कासाठी मागील 65 वर्षांपासून सीमावासीय झगडत आहेत. परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे सीमावासियांवर होणाऱया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बेळगावचा आवाज दिल्लीत पोहोचविणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीत एक मराठी म्हणून मला मतदान करा, असे आवाहन बुधवारी शुभम शेळके यांनी मतदारांना केले.
सकाळी कपिलेश्वर मंदिर परिसर, महाद्वार रोड, गुड्सशेड रोड या परिसरात प्रचार करण्यात आला. सायंकाळी शहराच्या मध्यवर्ती भागात जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी म. ए. समितीचे लोकप्रतिनिधी प्रचारयात्रेत सहभागी झाले होते. टिळक चौक येथे शुभम शेळके यांचे भव्य स्वागत करण्यात आले. कोनवाळ गल्ली, अनसुरकर गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कामत गल्ली, माळी गल्ली, मेणसे गल्ली, भातकांडे गल्ली, कडोलकर गल्ली, बापट गल्ली, समादेवी गल्ली, नार्वेकर गल्ली, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, खडक गल्ली, भडकल गल्ली, चव्हाट गल्ली येथे भर पावसात प्रचारफेरी काढण्यात आली.
आज अनगोळ, शहापूरमध्ये प्रचार
म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचा बुधवार दि. 14 रोजी अनगोळ व शहापूर परिसरात प्रचार दौरा होणार आहे. सकाळी 9 वा. अनगोळ परिसरातील गल्ल्यांमध्ये प्रचार व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 वा. शहापूर परिसरात प्रचार केला जाणार आहे. गोवावेस येथून सुरुवात केली जाणार आहे. सायंकाळी शहापूर येथून बेळगाव शहरापर्यंत पदयात्रा काढली जाणार आहे. सायंकाळी 7 वा. संयुक्त महाराष्ट्र चौक येथे शिवसेना नेते संजय राऊत यांची जाहीर सभा होणार आहे.