Tarun Bharat

भविष्यात काँग्रेसच्या आमदारांनी पक्षांतर केले तर गट समित्या जबाबदार ठरतील

Advertisements

पी. चिदंबरम यांनी दिला इशारा

प्रतिनिधी /मडगाव

काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे गट समित्यांकडून आलेल्या शिफारशीतून निवडलेले जातील. उद्या हे उमेदवार, आमदार झाले आणि त्यांनी कदाचित पक्षांतर केले तर त्यासाठी गट समित्यांना जबाबदार धरले जाणार असल्याचा इशारा काँगेस पक्षाचे गोवा निवडणूक प्रमुख पी. चिदंबरम यांनी काल नावेली येथे गट समितीच्या मेळाव्यात बोलताना दिला. ज्यांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला आहे, त्यांना पुन्हा पक्षात घेतले जाणार नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

 गट समित्यांनी उमेदवारांच्या नावांची शिफारस करताना ते उमेदवार पक्षाशी प्रामाणिक, जिंकण्याची क्षमता, पक्षाशी एक निष्ठ व कार्यकर्त्यांनासोबत घेऊन जाणारी तसेच जनतेसाठी सदैव उपलब्ध असतील अशाच व्यक्तींची नावे उमेदवारीसाठी शिफारस केल्याची आपण आशा बागळतो आणि जर अशाच व्यक्तींच्या नावाची शिफारस केली तर त्यांच्याकडून काँग्रेस पक्षाचा विश्वासघात होणार नाही असे श्री. चिदंबरम म्हणाले.

नावेली गट समितीच्या मेळाव्याला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, उपाध्यक्ष एम. के. शेख, निरीक्षक प्रकाश रोठोड व सुनील, दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस, गट अध्यक्ष पीटर कुतिन्हो इत्यादी उपस्थित होते.

नावेली मतदारसंघातून दोन नावाची शिफारस आलेली आहे. या दोन नावापैकी एकाला उमेदवारी दिली जाईल. आत्ता त्यात तिसऱया नावाची भर पडणार नाही असे श्री. चिदंबरम यांनी सांगितले. 2017 मध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार फुटले, त्यामुळे पक्षावर नामुष्की आली. पण, आत्ता 2022 मध्ये होणाऱया निवडणुकीत पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही याची दक्षता काँग्रेस पक्षातर्फे घेतली जाईल. कठोर उपाय योजना आखली जाईल असे ते म्हणाले.

लुईझिन फालेरोनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला

गेल्या निवडणुकीत नावेली मतदारसंघातील लोकांनी निवडून दिलेल्या उमेदवाराने काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला. पण, या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मात्र पक्षाचा विश्वासघात केलेला नाही. अशा विश्वासघातकी व्यक्तींना कदापी विसरले जाणार नाही. ज्यांनी पक्षाचा विश्वासघात केला, त्यांना भविष्यात काँग्रेस पक्षात आत्ता कोणतेच स्थान नसल्याचे श्री. चिदंबरम म्हणाले.

दहा आमदार फुटल्यानतंर पक्षाने कृती करताना सभापती समोर अपात्रता याचिका दाखल केली होती. मात्र, केवळ गोव्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील सभापती अपात्रता याचिकांवर लवकर निवाडा देत नाही. सभापती हे स्वतंत्र (निपक्षपाती) राहिलेले नाहीत. ते पूर्णपणे पक्षवादी राहून निवाडा देतात. त्यामुळे मग न्यायालयात जावे लागते. न्यायालयाने सभापतीना याचिकेवर निवाडा देण्यास सांगितले. त्यावेळी सभापतींनी काँग्रेस पक्षात फुट पडून पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याचा निवाडा दिला. पण, हा निवाडा म्हणजे एक मोठा विनोद होता. काँग्रेस पक्ष कसा काय भाजपमध्ये विलीन होऊ शकतो. जर काँग्रेस पक्ष विलीन झाला असता तर आज हा नावेली गट काँग्रेस समितीचा मेळावा झालाच नसता. आत्ता सभापतीच्या निवाडाला न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर शुक्रवार दि. 10 रोजी अंतिम सुनावणी होऊन निवाडा दिला जाण्याची शक्यता असल्याचे श्री. चिदंबरम म्हणाले.

गोव्याला कोळसा हब होऊ दिले जाणार नाही

गोव्यात जर काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आले तर गोव्याला कोळसा हब होऊ दिले जाणार नाही. त्याच बरोबर मोले येथील ‘थ्री लिनियर’ प्रोजेक्ट रद्द केले जातील अशी ग्वाही पी. चिदंबरम यांनी दिली. कोळशा संदर्भात बोलताना ते म्हणाले की, केवळ गोव्याला जेव्हढय़ा कोळशाची गरज असेल तेव्हढाच कोळसा आणला जाईल. येथून शेजारील राज्यांनी कोळशाची वाहतूक करू दिली जाणार नाही. गोव्याच्या जनतेला हवे तेच काँग्रेस सरकार करतील. लोकांच्या भावनाच्या विरोधात जाऊन कुणीच कृती करणार नाही.

गोव्यातील युवक-युवतींना याच ठिकाणी रोजगार प्राप्त करून दिला जाईल. आज दरवर्षी गोव्यातून मोठय़ा संख्येने लोक बाहेर जात आहे. त्यामुळे गोव्यातील प्रतिभावंत डॉक्टर, इंजिनियर तसेच इतर गोव्यातून रोजगारासाठी बाहेर जातात हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून गोव्याची प्रतिभा गोव्याबाहेर जाऊ नये याची काळजी काँग्रेस सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार आश्वासनाची पूर्तता करीत नाही

राज्यातील भाजप सरकारने अनेक आश्वासने जनतेला दिली होती. त्या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही असा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला. पेट्रोल 60 रूपयांनी व गॅस सिलिंडर 450 रूपयांनी देण्याची घोषणा मनोहर पर्रीकर यांनी केली होती. मात्र, आज काय परिस्थिती आहे याचा जनतेने विचार करावा. दहा वर्षे सेवा देणाऱया शिक्षकांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांना आत्ता न्याय मिळत नाही. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकऱया देण्याचे आश्वासन दिले. परंतु, या आश्वासनाची पूर्तता सरकारने केलेली नाही. आज सर्व घटक आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहे. जनेतला न्याय मिळत नाही. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते, तेही फसले. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन विना लोकांचा बळी गेला. याला जबाबदार कोण असा सवालही श्री. कामत यांनी उपस्थित केला. या सरकारला सर्व स्थरातून विरोध होत असून आत्ता जनतेने त्यांना घरी बसवावे असे आवाहन श्री. कामत यांनी केले. त्यांनी आम आदमी व तृणमूल काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली.

Related Stories

कुंकळळीतील ‘क्वालिटी फुड्स’च्या विरोधात गुन्हा दाखल

Patil_p

टॅक्सी मालकांना 14 पर्यंत मुदतवाढ

Amit Kulkarni

वीज दरवाढ प्रस्ताव लागू करु नये

Omkar B

भाजपचे बहुतांश उमेदवार निश्चित

Amit Kulkarni

केपे विभागीय कृषी कार्यालयाकडून झेंडू लागवडीला चालना

Omkar B

सत्तरी तालुका शेतकरी, गवाणे सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक गणेश चतुर्थी नतर शक्य.

Amit Kulkarni
error: Content is protected !!