82 हजार कोटीच्या ठेवी आणि 30 हजार कोटीचे बजेट असणाऱया मुंबई महापालिकेत गेली 30 वर्षे शिवसेनेचे वर्चस्व आहे, मात्र आता भाजपने त्यांचा भगवा महापालिकेवर फडकवण्यासाठी जोरदार कंबर कसली असून शिवसेनेची सत्ता उलथवुन टाकण्यासाठी किमान 100 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यासाठी भाजपला वरिष्ठ नेत्यांनी साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राज्य सरकारवर सतत आरोप करत हे सरकार जनता झोपेत असतानाच पडेल असे सांगणाऱया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत प्रदेश कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सरकार कधी येणार याच्या चर्चा आता बंद करा आपल्याला प्रखर विरोधीपक्ष म्हणून काम करायचे असे सांगितले, त्यामुळे गेले अनेक दिवस सरकार पाडण्याच्या तारीख पे तारीख देणाऱया भाजपने आता मुंबई महापालिका निवडणुकीवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे.


मुंबई महापालिकेत गेली 30 वर्षे शिवसेनेची सत्ता आहे, भाजपला 2017 चा अपवाद वगळता 40 पर्यंत पण मजला मारता आली नाही 2017 च्या पालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढताना 82 नगरसेवक निवडून आणले होते. त्यामागे 2014 च्या नरेंद्र मोदी यांनी मिळविलेले घवघवीत यश, मोदींचा करीष्मा हे कारण नक्कीच होते. मात्र त्यानंतर गेल्या 5 वर्षात पुलाखालुन बरेच पाणी गेले असून गेल्याच आठवडय़ात केंद्र सरकारला शेतकरी विरोधी असलेले तीन कायदे शेतकऱयांच्या आंदोलनामुळे मागे घ्यावे लागले. नुकत्याच झालेल्या काही राज्यातील आणि महाराष्ट्रातील देगुलर विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपचा पराभव झाला. एकीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे महाराष्ट्रातील सरकार उखडून टाकण्याची भाषा करत असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आता प्रभावी विरोधीपक्ष म्हणून काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करतात. आता भाजपने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांवर आपले लक्ष्य केंद्रीत केले असून शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी भाजप पूर्ण तयारी करत असल्याचे दिसत आहे. 2022 च्या महापालिका निवडणुकीत हे चित्र पालटण्यासाठी भाजप जंग जंग पछाडत आहे. शिवसेनेच्या कारभारावर रोज टिका केली जात आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची रोज एक एक प्रकरणे माध्यमांसमोर आणली जात आहेत. मात्र हे सगळं करत असताना भाजपने संघटनात्मक बांधणीला प्राधान्य दिले पाहिजे. आज शिवसेनेच्या तुलनेत मुंबईत भाजपची तशी ग्राऊंड पातळीवर यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी गटप्रमुख ते शाखाप्रमुख अशी रचना आणि शाखेच्या माध्यमातून लोकांशी थेट जनसंपर्क अशी सेनेची बांधणी असल्याने मुंबईत शिवसेनेचे नेहमीच वर्चस्व राहीले आहे. त्या तुनलेत भाजपात 2014 च्या नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यानंतर अनेक महत्वकांक्षी लोक आले, गर्दी जमवण्यात भाजप यशस्वी झाली. संघटनात्मक बांधणी आणि थेट जनसंपर्कात भाजप कमी पडताना दिसते. मुंबईत उत्तर भारतीयांची मोठी मते असल्याने कधी काळी काँग्रेसमध्ये उत्तर भारतीयांचे प्रतिनिधीत्व केलेले माजी आमदार कृपाशंकर सिंग आणि राजहंस सिंग हे आज भाजपमध्ये आहेत. मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने राजहंस सिंग यांच्या नावाची घोषणा केली. राजहंस हे काँग्रेसमध्ये असताना नगरसेवक तसेच पालिकेत अनेक वर्षे विरोधीपक्ष नेते होते. त्यामुळे त्यांचा पालिकेतील प्रश्नांचा आणि राजकारणाचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे सिंग यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. तर शिवसेनेनेदेखील सुनिल शिंदे यांना मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेतून उमेदवारी दिली आहे. शिंदे हे 2014 ला वरळी विधानसभेतून शिवसेनेचे आमदार होते. माजी विधानसभा अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांचे कट्टर कार्यकर्ते असलेले शिंदे हे महापालिकेत नगरसेवक देखील होते. त्यामुळे यावेळी शिवसेना आणि भाजपने नगरसेवक असलेल्यांना यंदा उमेदवारी दिली आहे जे नगरसेवकांचे विधानपरिषदेत प्रतिनिधीत्व करतात. यापूर्वी शिवसेनेचे रामदासभाई कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप असे दोन भाई मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार होते जे कधीच नगरसेवक नव्हते. दुसरीकडे भाजपने मुंबई भाजपचे अध्यक्ष राहिलेल्या आणि मुंबई पालकमंत्री असलेल्या विनोद तावडे यांची थेट भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी याचा मोठा फायदा भाजपला होऊ शकतो. 2019 ला भाजपने ज्या विद्यमान आमदारांची तिकीट कापली होती, त्यात विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांचा समावेश होता. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेतून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांचेही पुनर्वसन केले आहे. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती मतांचे समीकरण बघता प्रकाश मेहता यांचे कसे पुनर्वसन केले जाणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
मुंबई भाजपातही धुसफुस असून मुंबई भाजपची नुकतीच बैठक झाली. या बैठकीच्या प्रसिध्दीपत्रकात मुंबई भाजपचे प्रभारी असलेले आमदार अतुल भातखळकर यांचे नाव नसल्याने याच्या बातम्या झाल्या. भाजपने अंतर्गत मतभेद थांबवून आयात उमेदवारांना तिकीट देण्यापेक्षा निष्ठावंतांचा विचार केला पाहीजे. आज मुंबईतील महत्वाचे 4 आमदार निलंबित आहेत. त्यातील योगेश सागर, पराग अळवणी आणि आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रभावी काम केले आहे. आज हेच आमदार निलंबित आहेत. मुंबईच्या भागातून प्रतिनिधीत्व करणारे हे आमदार पोटतिडकीने पालिकेची पोलखोल सभागृहात करत असत. आता या अधिवेशनात हे आमदारच नसल्याने भाजपला सभागृहातही मुंबईच्या प्रश्नावरुन बोलताना मर्यादा येणार आहेत. महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर एकत्र येताना दिसते पण भाजपसोबत असलेले मित्रपक्ष रासप, रीपाई आणि शिवसंग्राम यांना भाजपकडून स्थानिक पातळीवर विचारात घेतले जात नसल्याची या पक्षाची तक्रार असल्याने भाजपने आगामी काळात या सर्व बाबींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. तरच जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत दिलेला भाजपा येणार मुंबई घडवणार हा भाजपचा नारा सत्यात उतरेल !
प्रवीण काळे