Tarun Bharat

भाजपमध्ये जाणार नाही, काँग्रेसमध्ये राहणार नाही!

कॅप्टन अमरिंदर सिंग यांची स्पष्टोक्ती : पुढील राजकीय वाटचालीचे गूढ कायम

चंदिगढ / वृत्तसंस्था

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगत असतानाच आता या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार नसल्याचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जाहीर केले आहे. तसेच अनेक वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये आहे, मात्र आता मी काँग्रेसमध्ये राहणार नाही, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली आहे. अशा परिस्थितीत अमरिंदर सिंग आपला नवा पक्ष सुरू करू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी म्हणजे महात्मा गांधी जयंतीला ते आपल्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पंजाबच्या राजकारणात आजकाल घटना वेगाने बदलत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आपण काँग्रेस सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या घोषणेमुळे काँग्रेसचा ताण वाढला आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्विटर बायोमधून ‘काँग्रेस’ हा शब्द काढून टाकला आहे. 18 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर करतानाच त्यांनी आपल्यासाठी सर्व पर्याय खुले असून योग्यवेळी निर्णय घेणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. आता त्यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबतची उत्कंठा अधिकच वाढवली आहे.

काँग्रेसमध्ये राहून काय फायदा ?

काँग्रेस आमदारांची बैठक बोलावल्याचे मला ऐनवेळी सांगण्यात आले. त्याचवेळी मी मुख्यमंत्रिपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले होते. माझ्यावर कोणाचा विश्वासच नसेल तर माझा पक्षात राहून फायदा काय. तसेच आता मी माझा अपमान सहन करणार नाही. माझ्यासोबतचे काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांचे वर्तन योग्य नव्हते, असेही ते म्हणाले. तसेच पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाची लोकप्रियता घटत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आगामी निवडणुकीत चुरस दिसणार

पंजाबमध्ये होणारी पुढील विधानसभा निवडणूक रंगतदार असणार असून ती चुरशीची होईल. सध्या राज्यात काँग्रेसची लोकप्रियता घटत असतानाच आम आदमी पक्षाची लोकप्रियता वाढत आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस, अकाली दल आणि आम आदमी पक्षामुळे चुरस निर्माण झाल्यामुळे पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणूक नेहमीपेक्षा वेगळी असणार आहे, असे त्यांनी सांगितले

नवीन पक्ष स्थापनेचे संकेत

अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये सामील होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने ते येत्या काही दिवसांमध्ये आपल्या नवीन पक्षाची घोषणा करतील, अशी अटकळ बांधली जात आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान ते 2 ऑक्टोबर रोजी मास्टरस्ट्रोक खेळू शकतात. ते बिगर राजकीय संघटना स्थापन करून पंजाबच्या राजकारणात एक नवीन डाव खेळण्याचे भाकीतही व्यक्त केले जात आहे. ही संघटना दिल्ली सीमेवर वर्षभरापासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन संपुष्टात आणेल असाही अंदाज आहे.

अमरिंदर यांची गेल्या काही दिवसातील रणनीती बघितली तर भाजपमध्ये सामील होणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही, पण त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो. ते तिन्ही कृषी कायद्यांचे कट्टर विरोधक आहेत आणि त्यांनी शेतकऱयांच्या आंदोलनाला पाठिंबाही दिला होता. या चळवळीत पंजाबमधील शेतकरी मोठय़ा संख्येने असून ते काँग्रेसला पाठिंबा देत आहेत, त्यामुळे अमरिंदर यांनी निवडणुकीपूर्वी त्यांची नाराजी घेणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे राज्यातील बळीराजाला ते दुखावतील असे मुळीच वाटत नाही.

यापूर्वीही नव्या पक्षस्थापनेचा ‘अनुभव’

आता अमरिंदर यांच्याकडे नवीन पक्ष सुरू करण्याचा पर्याय उरला आहे. यापूर्वी 1984 मध्ये त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारच्या विरोधात काँग्रेसशी संबंध तोडले होते. ते काही काळ अकाली दलात होते. पक्षापासून फारकत घेतल्यानंतर 1992 मध्ये त्यांनी अकाली दल पंथिक पक्षाची स्थापना केली. मात्र 1998 मध्ये त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता

काँग्रेसची डोकेदुखी वाढणार

सद्यस्थितीत अमरिंदर यांनी आपला नवा पक्ष पुन्हा सुरू केला, तर तो काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते. दिल्लीत अमित शाह आणि अमरिंदर सिंग यांच्यात निवडणुकीबाबतही चर्चा झाली. आगामी निवडणुकांमध्ये अमरिंदर यांना भाजप बाहेरून पाठिंबा देऊ शकते, अशी चर्चा आहे. अकाली दलाशी युती तोडल्यानंतर, भाजप पंजाबमध्ये अन्य मित्रपक्षाच्या शोधात आहे. अशास्थितीत अमरिंदर यांच्या नव्या पक्षाने भाजपशी जवळीक निर्माण केल्यास काँग्रेसची वाटचाल खडतर होऊ शकते.

Related Stories

हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तियावर छापे

Patil_p

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून गेहलोतांची माघार; निवडणूक लढणार नसल्याचं केलं स्पष्ट

Archana Banage

लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण राजकीय हेतूने प्रेरित- खासदार अधीर चौधरी

Abhijeet Khandekar

शाहरुखचा मुख्यमंत्री सरमा यांना रात्री 2 वाजता फोन…केली ‘ही’ मागणी

Abhijeet Khandekar

कटमनीचा तृणमूलला हिशेब द्यावा लागणार

Patil_p

पिकानंतरच्या क्रांतीची आवश्यकता – मोदी

Patil_p