तृणमुल काँग्रेसकडील युतीचा मगोला फटका : पराभवाच्या भीतीने उमेदवार भाजपच्या मार्गावर.लाभ उठविण्याच्या प्रयत्नात भाजप


प्रतिनिधी /पणजी
एका नाटय़मय घडामोडीत तृणमूल काँग्रेसकडे युती केल्यामुळे मगो पक्षातील काही उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थेतून पेडणेचे मगोचे उमेदवार प्रविण आर्लेकर हे भाजपच्या मार्गावर आहेत तर भाजपमधील कार्यकर्त्यांचा इशारा लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्याचबरोबर कोटय़वधी रुपयांच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरती घाटोळय़ामुळे सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांची उमेदवारी धोक्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे मयेसह भाजपच्या तीन विद्यमान आमदार-मंत्र्यांना उमेदवारी नाकारली जाणार आहे.
मगो-तृणमूल यांच्यादरम्यानच्या युतीची महत्त्वपूर्ण अधिकृत घोषणा आज मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने मगोला जोरदार धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. पेडणेचे भाजप आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, सावर्डेचे भाजप आमदार व सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर तसेच मयेचे आमदार प्रविण झांटय़े या तिघांच्या उमेदवारी धोक्यात आल्या आहेत. भाजपने पेल्या सर्वेक्षणात विद्यमान उमेदवारांबाबत तीव्र नाराजी आहे. यामुळे भाजपने या तिन्ही भागातील उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
आजगांवकरच्याऐवजी आर्लेकर
मगो पक्षाबरोबर युती करण्यात भाजपला अपयश आल्यानंतर भाजपने मगोला धडा शिकवण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच मगो पक्षाने तृणमूलकडे केलेल्या युतीने मगोच्या काही उमेदवारांना निवडून येण्याची शक्यता कमीच वाटू लागली आहे. त्याचा पूरेपूर लाभ उठविण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. पेडणेचे मगो उमेदवार प्रवीण आर्लेकर यांना भाजपात ओढण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न जारी केले आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांची उमेदवारी रद्द करून प्रवीण आर्लेकर यांना देण्याचा निर्णय लवकरच जाहीर होणार आहे.
मयेत झांटय़ेंच्याऐवजी प्रेमेंद्र शेट
मगोने तृणमूल काँग्रेसकडे युती केल्याने मगोचे मयेचे उमेदवार प्रेमेंद्र शेट (भाजपचे स्व. अनंत शेट यांचे बंधू) यांनाही निवडणूक जड वाटू लागल्याने भाजपने त्यांना दिलेली ऑफर ते स्वीकारण्याच्या तयारीत आहेत.
सावर्डेत पाऊसकरऐवजी गणेश गावकर
सावर्डेचे आमदार आणि सार्वजनिक बांकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांच्या संदर्भात पक्षाने आता गांभीरपणे विचार चालविला आहे. नोकरभरती घोटाळा उघड झाल्याने पक्षाची संपूर्ण गोवाभर नाचक्की झाली. त्यामुळे अशा नेत्याला उमेदवारी देऊ नये असे बहुतेकांचे म्हणणे असल्याने माजी आमदार गणेश गावकर यांना भाजप उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
पाऊसकर दिल्लीकडे रवाना
दरम्यान पाऊसकर यांना सोमवारी सायंकाळी अचानकपणे भाजप हायकमांडने दिल्लीत बोलावून घेतल्याने ते तेथे रवाना झाले आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
चर्चिल आलेमावची जोरदार खेळी
राष्ट्रवादी काँग्रेस विलीन केल्याचे पत्र सभापतींना सादर
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी आमदारकीचा राजीनामा न देताच राष्ट्रवादी विधिमंडळ गटाचे तृणमूल काँग्रेस पक्षात विसर्जन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला आणि तृणमूल काँग्रेस पक्षाला निवडणुकीपूर्वीच एक आमदार प्राप्त झाला. या प्रकारामुळे मात्र आलेमाव यांच्याविरोधात जोरदार कडवट प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.
चर्चिल आलेमाव हे मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर बाणावलीमधून विजयी झाले होते. त्यानंतर ते सातत्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या छताखाली वावरत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात युती व्हावी व आपल्याला बाणावलीमधून तर आपली कन्या वालांका आलेमाव यांना नावेली मधून उमेदवारी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केला होता. तथापि एका घरात दोन उमेदवारी देण्यास काँग्रसने विरोध केला आणि चर्चिल यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे रागाने आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोवा विभागाचे तृणमूल पक्षात विसर्जन केले.
सभापती राजेश पाटणेकर यांची आलेमाव यांनी सोमवारी सकाळी भेट घेतली. त्यांनी आपला लेखी निर्णय सभापतीना कळविला. सभापतीनी हा प्रस्ताव दाखल करून घेतला. मात्र प्रस्तावाला अद्याप मान्यता दिलेली नाही. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीफ डिसोझा यांनी सांगितले की चर्चिल मालेमाव यांचा निर्णय हा एकतर्फी आहे. यामुळे पक्ष लवकरच या अनुषंगाने पुढे काय करावे याचा विचार करीत आहे.
निवडणूक जवळ आलीय, हे काँग्रेसने लक्षात घ्यावे
गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांचा इशारा
गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न केल्यानंतर विजय सरदेसाई आता संतप्त बनले आहेत. त्यांनी काँग्रेसला निवडणुका जवळ पोचलेल्या आहेत एवढे लक्षात ठेवा आणि निर्णय घ्या अन्यथा माझ्याजवळ सर्व पर्याय खुले आहेत, असे जाहीर आव्हान दिले आहे.
गेले अनेक कित्येक दिवस काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षादरम्यान युतीची बोलणी सुरू आहे. मात्र काँग्रेस पक्ष गंभीर नाही आहे असे विजय सरदेसाई यांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला आता गंभीरपणे वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिलेला आहे.
निवडणुकीतबाबत काँग्रेस गंभीर नाही
या संदर्भात विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या बाबतीत किंवा विरोधी पक्ष या नात्याने मुळीच गंभीर नाही. त्यामुळे काँग्रेसला आम्ही स्पष्ट इशारा दिला आहे की युतीसंदर्भात लवकर काय तो निर्णय घ्या. नाहीतर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. काँग्रेसमुळे आपण तृणमूल काँग्रेसच्या प्रस्तावाचा त्याग केला होता. तथापि काँग्रेस नेत्यांना त्याची पर्वा नसावी, असे दिसते. आता काँग्रेसने या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेऊन तसे कळवले तर चांगले होईल, अन्यथा आम्हाला देखील कोणताही निर्णय घेण्यास मार्ग मोकळा होईल. या प्रकरणी काँग्रेसने अत्यंत जबादारीपणाने वागण्याची गरज होती, असा इशारा विजय सरदेसाई यांनी दिल्यामुळे काँग्रेस-गोवा फॉरवर्ड यांच्या दरम्यानची युती अद्याप अडचणीत आहे हे स्पष्ट होते.