माजी आमदार अलिना साल्ढाणा यांचे प्रतिपादन : ’आप’मध्ये प्रवेश केल्यानंतर भावनांना केली वाट मोकळी ’आप’ची ताकद वाढेल : केजरीवाल
प्रतिनिधी /पणजी
प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार घेत असलेल्या लोकविरोधी निर्णयामुळे प्रचंड घुसमट होत होती. त्याशिवाय अन्य अनेक कारणे होती. भाजपला आपल्या तत्त्वांचा विसर पडला आहे. हा पक्ष आता स्व. मनोहर पर्रीकरांचा राहिलेला नाही. त्यामुळेच आपण बाहेर पडले व सामान्य लोकांच्या हितासाठी काम करणाऱया ’आप’मध्ये सामील झाले, असे प्रतिपादन कुठ्ठाळीच्या दोनवेळच्या आमदार तथा माजी वन आणि पर्यावरण मंत्री अलिना साल्ढाणा यांनी केले.
दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या बोलत होत्या. भाजपच्या जनविरोधी कार्यपद्धतीला आपण प्रचंड कंटाळले होते. या पक्षात आपली घुसमट होत होती, असे त्यांनी पुढे सांगितले. साल्ढाणा यांच्या रुपाने भाजपने आपला पहिला आमदार गमावला असून भाजप सोडणाऱया त्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत.
मोले जैवविविधता हॉटस्पॉटमधून जाणाऱया तीन प्रकल्पांना विरोध करण्या बरोबर रेल्वे दुपदरीकरणाला आपण प्रखर विरोध केला होता. भाजपच्या लोकविरोधी उद्दिष्टांमध्ये आपण अडथळा आणत आहे असे त्यांना वाटत होते. आपण लोकांसोबत होते, त्यामुळे भाजपसोबत राहू शकत नव्हते.
म्हणूनच ’आप’ पक्षात येण्याचा निर्णय घेतला. या पक्षावर माझा विश्वास आहे. केजरीवाल सरकारने दिल्लीत केलेली प्रगती मी पाहिली आहे. त्यातून प्रभावित होऊन मी ’आप’मध्ये सामील झाले आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.
डबल टेकिंग केल्यास विनाश होईल, आम्ही लोकांची घरे उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरणार, कोळशाच्या धुळीमुळे वायू आणि जलप्रदूषण होणार आहे म्हणून अशा प्रकल्पांना विकास प्रकल्प म्हणता येणार नाही. कारण हे प्रकल्प लोकविरोधी आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून मी लोकांच्या पाठीशी उभं राहायला हवे हे माझे कर्तव्य वाटले. मी शेवटच्या श्वासापर्यंत तेच करेन. कारण माझ्या नवऱयाने तेच केलं असते, असे साल्ढाणा म्हणाल्या.
त्यावेळी बोलताना श्री. केजरीवाल यांनी, ’गोव्यातील लोकांना विचारल्याशिवाय, त्यांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन दिले. मर्जीतील भांडवालदार कंपन्यांना फायदा व्हावा यासाठीच केंद्र सरकार हे प्रकल्प गोमंतकीयांच्या माथी मारत आहे. आम्ही या विरोधात आहोत. आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यास गोव्यातील जनतेच्या संमतीशिवाय कोणतेही काम होणार नाही. आज गोव्यात काँग्रेस आणि भाजपवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे. आप ही एकमेव आशा आहे, असे श्री. केजरीवाल यांनी पुढे सांगितले.