प्रतिनिधी / कोल्हापूर
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी विद्यमान राज्यमंत्री आणि जयसिंगपूरचे अपक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर भाजपला मदत करण्यासाठी दबाव आणला होता, असा गौप्यस्फोट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. आता या आरोपाला यड्रावकर यांनीही दुजोरा दिला आहे. शुक्ला यांनी फोन करून भाजपसोबत राहा. लागेल ती मदत करू, असे सूचित केल्याचे स्पष्टीकरण यड्रावकर यांनी दिले आहे. मात्र, आपण मतदार संघातील जनतेचे ऐकून महाविकास आघाडीसोबत गेल्याचे यड्रावकर यांनी सांगितले.
मला मतदारांनी अपक्ष म्हणून निवडून दिल्यामुळे मी एकटा निर्णय घेऊ शकत नव्हतो. त्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातील सूचनेप्रमाणे आघाडी सरकार सोबत राहण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र भाजपला समर्थन देण्याबाबत अधिकारी रश्मी शुक्ला यांचा फोन आला होता ही बाब मात्र खरी आहे, असे यड्रावकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग हे गोपनियतेच्या कायद्याचे उल्लंघन आहे. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्यावर कारवाईचा प्रयत्न केला. त्यानंतर रश्मी शुक्ला यांनी पाया पडून माफी मागितली होती. माणुसकीच्या नात्याने त्यांना मंत्र्यांनी माफ केले. मात्र, त्या मोठ्या कटाचा भाग असल्याचे नंतर लक्षात आले. सरकार अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडले हे कबूल करावे लागेल, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.


previous post