Tarun Bharat

भाजपासमोर बंडखोरीचे संकट

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या दौऱयात मिळाले संकेत : विविध मतदारसंघांत सध्या वाक्ययुद्ध.काही ठिकाणी मतदारांचा आमदारांवर रोष

प्रतिनिधी /पणजी

आगामी विधानसभा निवडणूक 2022 मध्ये भारतीय जनता पक्षाला गोव्यात अनेक मतदारसंघांत बंडखोरीचा सामना करावा लागणार, अशी चिन्हे दिसत असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांना विविध मतदारसंघांतून केलेल्या दौऱयात तसे संकेतही मिळाले आहेत.

भाजपचे वरील दोन्ही नेते गेल्या 15 दिवसांपासून उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील विविध मतदारसंघात निवडणूक पूर्व दौरे करीत असून तेथे त्यांना अनेक मतदारसंघात बंडखोरी होण्याची लक्षणे आतापासून दिसू लागली आहेत. यामुळे बंडखोरी रोखण्यासाठी आता काय करावे, याचा विचार भाजपच्या प्रमुख नेतेमंडळींनी सुरु केला आहे.

भाजपमधीलच गटाचा विरोधी आवाज

भाजपचे जे विद्यमान आमदार, मंत्री आहेत त्यांच्या विरोधात भाजपमधीलच गट आवाज उठवत असल्याचे प्रकार उघड होत असून उमेदवारीसाठी एकमत होणे किंवा करणे भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी भाजपला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचे चित्र समोर आले असून मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे या दोघांनी त्याचा अनुभव विविध मतदारसंघातील दौऱयात घेतला आहे.

बाबुश, झांटय़े यांना होतोय विरोध

राजधानी पणजीत आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधात त्यांचेच खंदे समर्थक तथा माजी महापौर उदय मडकईकर यांनी दंड थोपटले असून ताळगांवात महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या विरोधात माजी महापौर टोनी रॉड्रिग्स यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. मये मतदारसंघात तेथील आमदार प्रवीण झांटये यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत जनतेने आवाज उठवला आणि त्यांना पोलीस सुरक्षेत बाहेर पडण्याची पाळी आली.

कुंभारजुवे मतदारसंघात विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांनी उमेदवारीसाठी दावा केला असून तो करताना ते केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व त्याचे पुत्र सिद्धेश नाईक यांच्यावर घसरले. त्याचे प्रत्युत्तर त्यांना मिळाले. कुठ्ठाळी आणि दाबोळी मतदारसंघातील विकासकामांवरुन तेथील भाजपच्या दोन आमदारांमध्ये जुंपल्याचे समोर आले आहे. हे सर्व प्रकार फक्त उमेदवारी मिळविण्यासाठी होत असून तेच आता भाजपच्या मुळावर उठले आहेत.

मांद्रेत पार्सेकर, सोपटेंमध्ये मतभेद की मनभेद

मांद्रे मतदारसंघातील दौऱयात डॉ. सावंत यांच्या स्वागतासाठी माजी मुख्यमंत्री व तेथील माजी आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर आलेच नाहीत. त्यांनी वेगळी बैठक घेतली. तेथे डॉ. सावंत यांनी हजेरी लावली. तेथे स्थानिक आमदार दयानंद सोपटे यांची हजेरी नव्हती तर डॉ. सावंत यांच्या स्वागतास मात्र ते हजर होते. हे सर्व प्रकार भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात बंडखोरी होणार असल्याचे संकेत देत असून ती रोखण्यासाठी आता भाजप नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. या कामासाठी भाजपचे काही केंद्रातील नेते येण्याची शक्यता असल्याचे पक्षीय सूत्रांनी सूचित केले.

गणेशचतुर्थीनंतर दौऱयांचा दुसरा टप्पा

गणेशचतुर्थीपूर्वीच्या पहिल्या टप्प्यात डॉ. सावंत आणि तानावडे यांनी सुमारे 20 ते 22 मतदारसंघांचा दौरा केला. ते दोघे आता गणेश चतुर्थीनंतर दुसऱया टप्प्यात उर्वरित 18 ते 20 मतदारसंघात फिरणार आहेत. तेथेही त्यांना अशा प्रकारचे अनुभव येण्याची शक्यता असून बंडखोरी थोपविण्यासाठी भाजपला आता काहीतरी उपाययोजना करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

Related Stories

ऍबकस वेदिक गणित स्पर्धेत कनक बागकर व अत्रेय गवसचे यश

Patil_p

जुने गोवेत हवा रेल्वे ओव्हरब्रीज

Amit Kulkarni

सहकारी संस्थांच्या कर्जावरील व्याज 10 टक्क्यांपेक्षा कमी असावे

Amit Kulkarni

पाळोळे येथील प्रसाधनगृहाचे उद्या उद्घाटन

Amit Kulkarni

वास्को काँग्रेसमधील माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षाचा राजीनामा

Amit Kulkarni

‘पोगो’ विधेयक विधानसभेत मांडणार

Amit Kulkarni